“बरी होईल ना रे ती?”
राहुलने भावूक होऊन, माझ्या कुशीत शिरून विचारले…`
“अर्थात, नक्की बरी होणार आहे ती!” मी राहुलच्या पाठीवर हळुवारपणे थोपटत म्हणालो. नंतर मी त्याला सायलीच्या बाजूच्या बेडवर बसवले. “मी आलो आहे ना आता तुझ्या सोबतीला, मग तू आता स्वतःला सावर.” राहुलने मग सायलीची फाइल माझ्या हातात दिली. मी झर्रकन त्यावर नजर टाकली. त्यातले विशेष काही समजले नाही. पण बऱ्याच ठिकाणी ‘नॉर्मल’ हा शब्द दिसला, त्यावरून प्रकरण गंभीर नसावे, असा अंदाज बांधला.
दोन दिवसांपूर्वी रात्री अचानक राहुलचा फोन आला सायली आजारी असून नामांकित इस्पितळात दाखल असल्याची बातमी सांगणारा. मी फोनवरच त्याला धीर दिला आणि शक्य तितक्या लवकरच्या फ्लाइटने मुंबईला येत असल्याचे सांगितले. दोन तासांच्या त्या विमान प्रवासात मला कॉलेजचे दिवस आठवले…
माणसाने व्यावहारिक असावे का भावनिक? या मुद्द्यावरून आमच्यात कायम भांडण सुरू असायचे आणि शाब्दिक लढाई व्हायची. राहुल आयुष्यात कायम फक्त व्यावहारिक असावे, यावर ठाम असायचा आणि मी प्रसंगानुसार माणसाने ठरवावे, या मताचा होतो. इतके भांडून सुद्धा आमच्या मैत्रीत कधीही कटुता आली नाही. उलट आमची मैत्री आणखी घट्ट होत गेली. कॉलेज संपले आणि रोजचा संवाद संपला. व्यावहारिक विचार करणाऱ्या राहुलने तशीच नोकरी शोधली. फक्त व्यवहार बघत उच्चपदस्थ झाला खरा. पण तिथे पोहोचताना तो कित्येकांशी शत्रुत्व पत्करत गेला नकळत! प्रत्येक बढतीच्या वेळी त्या पदासाठी असलेल्या दावेदार इच्छुकांच्या भावनांचा विचार त्याने कधी केलाच नाही आणि बघता बघता एकेक पायरी वर चढत गेला वरिष्ठांसोबत फक्त व्यवहार करत… पण म्हणतात ना की, जेवढे शत्रू आपण जन्माला घालतो, आपल्या नकळत तेवढीच संकटे देखील आपण वाढवतो.
राहुलचे देखील तेच झाले. नियतीचे फासे उलटे पडले. कंपनीतील सगळे शत्रू एकत्र येऊन कंपनीला मिळालेल्या एका करोडो रुपयांच्या कंत्राटात मुख्य कंत्राटदाराला हाताशी धरून राहुलला बेमालूमपणे जाळ्यात अडकवले आणि कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचे दर्शवण्यात सगळ्यांना यश आले. मुख्य कागदपत्रात लिहिलेल्या काही अटी आणि तरतुदी बदलण्यात आल्या शेवटच्या क्षणी… आणि त्या न वाचता राहुलने त्यावर सही देखील केली विश्वासाने! झाले… राहुलवर कंत्राटदारासोबत साटेलोटे असल्याचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप झाला. त्याने त्याचे निरपराध असल्याचे सिद्ध करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. पण बऱ्याच कागदपत्रांवर त्याच्याच सह्या असल्याने सुरुवातीच्या चर्चेमधून ठरल्यापेक्षा कमी नफ्यात कंपनीला कंत्राट पूर्ण करून द्यावे लागणार होते. साऱ्या प्रकरणाचा ठपका अर्थातच राहुलवर आला आणि कंपनीने कायदेशीर कारवाई करून त्याला नोकरीतून मुक्त केले.
हेही वाचा – दुसऱ्यांना जगण्याची ताकद देणारा ‘अन्नसोहळा’
राहुलवर झालेल्या कारवाईची माहिती जसजशी मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांना समजत गेली, तसे सायलीवर त्याचे मानसिक दडपण आले आणि तिची तब्येत बिघडत गेली. आजवर फक्त व्यवहारी राहिलेल्या राहुलच्या मदतीला जवळचे कोणी नातेवाईक आले नाहीत. साठी उलटून गेलेले आई-वडील कोकणात राहात होते आणि एकुलत्या एका मुलाला त्याने अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवले होते. राहुलच्या अचानक घरी बसण्याचा सायलीने फारच धसका घेतला. तिचा रक्तदाब अचानक वाढून तिच्या मेंदूवर त्याचा थोडा परिणाम झाला आणि सायली घरातच काम करत असताना कोसळली. वेळीच हॉस्पिटलमध्ये दाखल करून तिच्यावर तातडीचे उपचार सुरू झाले म्हणून थोडक्यात सगळं निभावले. सायली बोलताना थोडी अडखळत होती. तिच्या डाव्या पायाची हालचाल मंदावली होती. फिजिओथेरेपी आणि स्पीचथेरेपी सुरू करून आठवडा झाला होता आणि पाहिजे तेवढी प्रगती सायलीची झाली होती.
राहुल एव्हाना बराच सावरला होता. दुपारी जेवण झाल्यावर हाताच्या, बोलण्याच्या व्यायामासाठी सायलीला नर्स घेऊन गेली आणि मला हवा होता तसा निवांत वेळ राहुलबरोबर बोलण्यासाठी मिळाला…
“राहुल, आजवर फक्त स्वतःचा विचार केलास तू. सुरुवातीपासूनच तू चुकत गेलास. एवढ्या मोठ्या कंपनीत निव्वळ शिक्षणाच्या जोरावर मिळालेली नोकरी सर्वांना सोबत घेऊन टिकवता नाही आली. कंपनीत तू एकेक पायरी चढत असताना नकळतपणे स्वत:साठी खड्डा खणायला सुरुवात केली होतीस तू, हे तुला कधी समजलंच नाही. किंबहुना, गुर्मीमध्ये त्याकडे दुर्लक्ष केलेस. कंपनीत आपण केलेली प्रगती आपल्या एकट्याची कधीच नसते, तर त्यात हाताखाली काम करणाऱ्या प्रत्येकाचा खारीचा वाट असतो. म्हणूनच त्या प्रत्येकाला प्रोत्साहन देत आणि दरवर्षी होणाऱ्या पगारवाढीत योग्य तो सन्मान देण्याची जबाबदारी तुझी होती. पण आपल्या प्रगतीची फळे तू एकटाच खात गेलास, सहकाऱ्यांना उपाशी ठेवलंस. इथेच तुझ्याबद्दलची असूया त्यांच्या मनात नकळतपणे रुजत गेली. जसजसा तू वरच्या पदावर जात राहिलास तसतशी ही असूया वाढतच गेली आणि ती शेवटी तुला नाहक भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकवून गेली. तुझ्या सहकाऱ्यांच्या भावनांचा किंचितही विचार आणि आदर न करता फक्त स्वतःच्या प्रगतीचा तू केलेला व्यवहार शेवटी तुला जमीनदोस्त करून गेला. व्यावसायिक जगात तुझी प्रतिमा डागाळली गेली असेल आणि नवीन नोकरी मिळण्याचा आड ती येऊ देखील शकेल, हे विसरू नकोस.”
“खूप चुकलो रे मी… माझ्यामुळे कंपनीला होणाऱ्या फायद्याच्या नशेत आणि मस्तीत मी बेभान झालो होतो. मी जे मागीन ते मला मिळत होते आणि त्याच झंझावातात मी इतका वाहात गेलो की, पाणी नाकातोंडाशी आल्यावर माझी नशेची धुंदी खाडकन उतरली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. एका दिवसाच्या नोटीसवर मला नोकरीतून मुक्त करण्यात आले. मला माझे हक्काचे पैसे मिळाले. पण आज मी खूप काही गमावून बसलो आहे, याची जाणीव मला खूप उशिरा झाली.”
“राहुल अजूनही वेळ गेलेली नाही. घरात अडगळ नको म्हणून व्यावहारिक दृष्टिकोन बाळगून कोकणात पाठवलेल्या तुझ्या आई-वडिलांना परत बोलावून घे तातडीने. सायली घरी आल्यावर देखील तुला मानसिक बळ आणि आवश्यक तो आधार तुझे आई-वडीलच देऊ शकतील. ऐक माझं. तुझा ‘मी’पणा आता कायमचा विसरून जा आणि गावी जाऊन आईवडिलांना मोठ्या मनाने परत घेऊन ये. नातेवाईकांशी तुटक असलेली नाती परत जोडायचा प्रामाणिकपणे प्रयत्न कर. नात्यांच्या या विलोभनीय इंद्रधनुष्याला तुझ्या आयुष्याच्या अंगणात कायमचे सप्तरंग पाडू देत. तुझ्या हट्टाखातर अमेरिकेत शिकायला गेलेल्या तुझ्या सारंगशी रोज बोलायला सुरवात कर. त्याला इथे येऊन नोकरी किंवा व्यवसाय करायचा असल्यास त्याला परत बोलाव. मला गेल्यावर्षी त्याच्याबरोबर झालेले संभाषण आठवले. तो खूप उत्सुक आहे रे परत यायला. त्याने खूप प्रयत्न केले, पण तिथल्या वातावरणात तो नाही घेऊ शकला स्वतःला जुळवून! तुम्हा दोघांना एकमेकांच्या आधाराची खरी गरज आज आहे. तुझे घर परत पहिल्यासारखे भरून जाऊ देत. मग बघ सायलीची तब्येत कशी चुटकीसरशी सुधारते ते.”
हेही वाचा – आशेचे कंदील आणि जगण्याची दिवाळी!
राहुल, व्यवहार आणि भावना यांची सुरेख गुंफण आपले आयुष्य समृद्ध करते. भावना म्हणजे तरी काय असते? तर देवाने आपल्याला सर्वांसोबत राहण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी निर्माण केलेले ते एक माध्यम असते. ज्या माध्यमाद्वारे आपण एक दुसऱ्याशी ठराविक नात्यात जोडले जातो कायमचे! हीच सगळी नाती आपली आयुष्यभरासाठी जमा केलेली पुंजी असते आणि तीच गरज असते, तेव्हा आपल्या कामी येते. जगताना व्यवहार जरूर बघावा, पण तसे करताना नाती आणि त्यात अडकलेल्या भावनांना आपण दूर लोटता कामा नये, हे कायम लक्षात ठेव.”
एव्हाना सायली परत आली. चेहेऱ्यावरून ती बऱ्यापैकी दमलेली दिसली.
“भावोजी, झाल्या का पोटभर गप्पा राहुलबरोबर?”
“हो, झाल्या ना! व्यवहार की भावना? ही आमची कॉलेजपासून सुरू असलेली लढाई आज अखेर संपली. कोण हरलं त्यात ते महत्त्वाचे नाही, पण आमची घट्ट मैत्री आज आणखी घट्ट झाली, एवढे मात्र खरं. आमच्यातील बोलणे मी सायलीच्या कानावर घातले. भावनांचे गोकुळ लवकरच कोकणातून तुमच्या घरात अवतरणार आहे आणि सारंगच्या रूपातील अमेरिकेतला कृष्ण लवकरच या गोकुळात राहायला येईल, अशी आशा आहे मला.” राहुलने मला घट्ट मिठी मारून बहुतेक माझ्या विचारांवर त्याच्या होकाराची मोहोर उमटवली आणि सायलीच्या थकलेल्या चेहेऱ्यावरील समाधान माझ्या नजरेतून सुटले नाही.


