कामिनी व्यवहारे
केळफुलाची स्वादिष्ट भाजी तयार होते, हे सर्वांनाच माहीत आहे. पण काही असेही आहेत, ज्यांना या केळफुलाची माहिती नसेल. केळ्यांच्या घडाने आकार घेतला म्हणजे त्याच्या टोकाला असलेले केळफूल त्या घडातील केळ्यांच्या शेवटच्या फणीपासून थोड्या अंतरावर कापून काढून घेतात. त्याच केळफुलाचा भाजीसाठी उपयोग होतो. शिवाय ते काढून घेतल्यामुळे घडातील केळी चांगली पोसून त्यांचे वजन वाढते. आरोग्याच्या दृष्टीने केळफूल फायदेशीर आहे. यात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. यात फायबर, प्रथिने, पोटॅशिअम, कॅल्शियम, तांबे, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि ई जीवनसत्त्व असते, असे तज्ज्ञ सांगतात. याच केळफुलाचे खमंग वडेही तयार करता येतात. पाहूयात त्याची रेसिपी –
पुरवठा संख्या – 4 ते 5 व्यक्तींसाठी
साहित्य
- मध्यम आकाराचे केळफूल – 1
- चणाडाळ – अर्धी वाटी
- कांदा – 1 मोठा
- नारळाचा किस (चव) – पाव वाटी
- हिरव्या मिरच्या – 5 ते 6
- आले – 1 इंच
- गरम मसाला – 1 चमचा
- हळद – अर्धा चमचा
- मीठ – चवीपुरते
- चिरलेली कोथिंबीर – मुठभर
- तेल – तळण्यासाठी
हेही वाचा – Recipe : खमंग हिरवे वडे (प्रोटिनयुक्त वडे)
कृती
- चणा डाळ 2 तास भिजत ठेवावी.
- केळफूल नीट धुऊन, निवडून बारीक चिरून घ्यावे.
- चिरलेले केळफूल मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे.
- नंतर भिजवलेल्या चणाडाळीतील पाणी काढून टाकल्यानंतर, पाणी न घालता थोडी जाडसर वाटून घ्यावी.
- चिरलेले केळफूल पाणी न घालता बारीक वाटून घ्यावे.
- आले, मिरच्या आणि नारळ वाटून घ्यावे.
- कांदा बारीक चिरून घ्यावा.
- नंतर सर्व वाटण आणि कांदा मिक्स करून त्यात चवीपुरते मीठ, हळद, गरम मसाला, कोथिंबीर घालून छोटे छोटे चपटे गोळे करून घ्यावेत.
- कढईत तेल तापत ठेवावे. तेल कडकडीत तापले की, वडे तळून घ्यावेत.
हेही वाचा – Recipe : बटाट्याची खमंग शाही करी
टीप
- वडे हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करावेत.
- लसूण आवडत असेल तर, मिरच्या आणि नारळाबरोबर 3 ते 4 पाकळ्या घालाव्यात.
एकूण कालावधी – सुमारे 3 तास
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या या वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या जातील.
अवांतर, रेसिपी, Recipe, Banana flower Vada, केळफूल, केळफूल वडे, केळफुलाचे वडे, Kelphul Vade,


