वैद्य विष्णू देविदास सावंत
निसर्ग जेव्हा जुनी पाने गाळून नव्या पालवीने नटतो, आम्रवृक्ष जेव्हा मोहराने बहरतात आणि कोकिळेचा कुहू-कुहू स्वर कानी पडतो, तेव्हा समजावे की ‘ऋतूराज’ वसंताचे आगमन झाले आहे. वसंतोत्सव हा केवळ निसर्गाचा उत्सव नसून तो मनाला आणि शरीराला नवचैतन्य देणारा काळ आहे. आयुर्वेदानुसार, प्रत्येक ऋतू आपल्यासोबत शरीरात काही बदल घेऊन येतो. शिशिर ऋतूत (थंडीत) शरीरात साठलेला ‘कफ’ वसंतातील सूर्याच्या उष्णतेने वितळू लागतो. ज्याप्रमाणे हिमालयातील बर्फ वितळून नद्यांना पूर येतो, तसेच शरीरातील कफ वितळल्याने अग्निमांद्य, सर्दी, खोकला, आळस आणि पचनाचे विकार उद्भवू शकतात.
आपल्या पूर्वजांनी ‘वसंतोत्सव’ केवळ आनंदासाठी नाही, तर आरोग्यासाठीही आखला आहे. होळीच्या धगीतून मिळणारी उष्णता असो किंवा गुढीपाडव्याला खाल्लेला कडुनिंब, या सर्वांमागे एक शास्त्रशुद्ध ‘ऋतुचर्या’ दडलेली आहे.
हेही वाचा – कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
नक्की काय घडते या दिवसांत? (आयुर्वेदीय दृष्टिकोन)
- हिवाळ्यातील कफ संचय : हिवाळ्यात (शिशिर ऋतूत) आपण थंडीपासून बचाव करण्यासाठी आणि वाढलेल्या भुकेमुळे जड, स्निग्ध आणि गोड आहार भरपूर घेतो (उदा. लाडू, सुकामेवा). थंडीमुळे हा कफ शरीरात बर्फासारखा घट्ट होऊन साठून राहतो.
- वसंतातील कफ प्रकोप : आता जसा वसंत ऋतू सुरू होतो आणि सूर्याची उष्णता वाढते, तसा हा हिवाळ्यात गोठलेला कफ ‘वितळू’ लागतो.
याचा शरीरावर काय परिणाम होतो?
हा वितळलेला कफ संपूर्ण शरीरात पसरतो आणि आपल्या पचनशक्तीला (अग्नीला) मंद करतो. म्हणूनच या दिवसांत खालील त्रास मोठ्या प्रमाणावर दिसतात :
- वारंवार सर्दी आणि खोकला (Viral Infections)
- दम्याचा (Asthma) आणि ॲलर्जीचा त्रास वाढणे
- प्रचंड आळस, झोप आणि जडपणा जाणवणे
- भूक न लागणे आणि अपचन
हेही वाचा – सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका!
या वाढलेल्या कफाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी आपल्या आहारात कोणते सोपे बदल करावेत? हे आपण पुढील लेखात पाहूया!
तोपर्यंत निरोगी राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या!
श्री समर्थ आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक
A 201, वृंदावन सावली, सावली धाब्यासमोर,
नांदेड फाटा, पुणे 68.
मोबाइल – 7798172713


