जंगलात राहून निसर्गाचं आणि प्राणीसृष्टीचं जवळून निरीक्षण करून अभ्यास करून लिहिलेले ‘एका रानवेड्याची शोधयात्रा’ हे कृष्णमेघ कुंटे यांनी लिहिलेलं पुस्तक. यात लेखकाने स्वतःला आलेले अनुभव शब्दबद्ध केले आहेत. जंगलात किंवा अभयारण्यात पर्यटक फिरायला जातात, त्यावेळी बरेचदा त्यांना वाघ पाहायचा असतो, खरंतर ती तास दीड, तास फार तर दोन तासांची जीप सफारी किंवा जंगल सफारी असते. मात्र या पुस्तकात लेखकाने लिहिलेले अनुभव वाचल्यावर आपले जंगल पाहणे लुटुपुटुचे किंवा बागेत फिरून आल्यासारखे वाटते. थरार, भीती आणि तितकेच समाधान, आनंद आणि मनःशांती या सगळ्या भावनांचा अनुभव घ्यायचा असेल तर, असेच भटकायला हवे. अर्थात, ये हर किसी के बस की बात नही.
मिलिंद वाटवे या प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. ती वाचायलाच हवी. त्याशिवाय हे पुस्तक पूर्ण कळणार नाही. त्यांनी लेखकाला मदुमलाईच्या जंगलात जायला उद्युक्त केलं, ज्याला ते त्यांचा कृष्णमेघला वनवासात पाठवायचा ‘कैकयीहट्ट’ म्हणतात! त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितेच्या काही ओळी लिहिल्या आहेत त्यातली शेवटची ओळ लेखकाचं यथार्थ वर्णन करते-
अश्या खुळ्यांच्या जमावातुनी या, महाखुळे ते येती,
जनावरांतुनी माणसास जे, पुढे जरासे नेती.
महाखुळे ते होते, असती, म्हणून आपण सारे,
रुपयांसह पेटीत ठेवतो दोन-चार हे तारे.
“चाकोरीतल्या अपयशाने मुळीच खचून न जाता चाकोरीबाहेरचा छंद मनापासून जोपासणाऱ्या एका पोरसवदा तरुणानं लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे निसर्गप्रेमाचा आगळा आविष्कार आहे. काही पुस्तकं निव्वळ वाचायची नसतात तर अनुभवायची असतात,” मलपृष्ठावरचे हे लिखित शब्दश: खरं आहे. लेखकाच्या आई वडिलांनी हवे ते करण्याची पूर्ण मोकळीक दिली होती, अभ्यास करण्यासाठी बंधने घातली नव्हती. त्यांचं योगदान मोठं आहे असं मला वाटतं.
हेही वाचा- Bookshelf : मनात रेंगाळणारा श्रीनिंचा… ‘डोह’
त्यांची रानवेडा होण्याची सुरवात ‘फ्रेंड्स ऑफ अॅनिमल’ या डॉ. विवेक परांजपे यांच्या संस्थेबरोबरच्या अंदमान सहलीबरोबर झाली. मी शाळेत असताना याच संस्थेबरोबर एक सहल केली होती आणि डॉ. परांजपे अजूनही आठवतात, त्यांचे ‘आपली सृष्टी आपले धन’ या पुस्तकांचे खंडही वाचनीय आहेत.
लेखक मदुमलाईच्या जंगलात पहिल्यांदा राहिले ते वाटवे सरांसाठी हत्तीच्या विष्ठेचे नमुने गोळा करण्याच्या कामासाठी. लहानपणापासून प्राण्याचं आणि निसर्गाचंही वेड होत. दीडशे दोनशे किलोमीटर जंगलात मनसोक्त भटकता आलं, कारण संशोधकांना जंगलात फिरायला कुठेही मज्जाव नसतो. त्यांच्या बरोबर मागकाढ्या असायचा. आणखी काही अभ्यासक सुद्धा होते. त्यातले एक रानकुत्र्यांवर संशोधन करत होते. लेखक हत्तींची विष्ठा गोळा करण्यासाठी त्यांचा माग काढत जंगलात हिंडत असत. हत्तींच्या शिकारीमुळे त्यांची संख्या कमी झाली आहे. त्यांचे देखणेपण शाप बनले आहे. मोठे सुळे असलेले कुडकोम्बन हत्ती हस्तिदंताच्या लोभामुळे आणि कोणाचीही भीती न उरलेल्या शिकाऱ्यांमुळे मारले गेले किंवा जातात.
लेखनाच्या ओघात वीरप्पन येतो. आपल्या अनमोल वनसंपदेबद्दल दिसून येणारी तीव्र अनास्था येते. आणि सरकारची हतबलता येते. लेखक मोयार गोर्जमध्ये रानकुत्र्यांच्या गुहा शोधत असताना त्यांनी तीस फुटावरून खाली उडी मारली होती. तिथे जर काही दुखापत झाली असती तर कुठलीही मदत मिळाली नसती. मागकाढे आदिवासीही अशी उडी मारायला आधी तयार नव्हते. पण मोयारमध्ये त्यांना जे पाहायला, अनुभवायला मिळालं ते मिळालं नसतं हे तितकंच खरं. आदिवासी जंगलाचा भाग झालेले असतात कारण त्यांना कुठेही राहायची, काहीही खायची सवय असते. झाडावर राहायचे, प्रसंगी किडेसुद्धा खायचे, मध पळवायचा वगैरे, इतके ते निसर्गाशी एकरूप झालेले असतात.
लेखक लिहितात, “जसे जेन गुडालला चिम्पान्झी त्यांच्यातली एक समजायला लागले होते तसे रानटी हत्तींनाही मी आपला वाटायला हवा! हे साधेल त्या दिवशी मी खरोखरीच सर्वस्वी या जंगलाचा बनून जाईन. मी रानाचाच गंध, स्पर्श बनेन. माझं आयुष्य आनंदी गाणं होऊन जाईल.” जंगलात राहून एक पूर्ण ऋतुचक्र अनुभवायची इच्छा असल्यामुळे त्यांनी तसं एक वर्षं तिथे काढले. त्या आठवणी त्यांनी लिहिल्या आहेत. पण आवर्जून सांगितले आहे की सारी निरीक्षणं कागदाच्या आणि भाषेच्या चौकटीत बसवता येण्याजोगी नाहीत. ती मारून मुटकून बसवण्यात अर्थ नाही.
हेही वाचा- Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी
जंगलात राहण्याचे (आपल्या दृष्टीने!) धोकादायक आयुष्य त्यांना का आवडते याचं उत्तर त्यांनी लिहिलं आहे. आपल्याकडून जराशी चूक किंवा गाफीलपणा झाला तर जीवावर बेतू शकत हे माहित असूनही आपण यात गुंतत गेलो. कारण त्यांना जीवन मरणाच्या खेळात गंमत वाटते. तो थरार, एक नशा होऊन जाते. एकदा लेखक एकटेच जंगलात फिरत असताना, मागकाढ्या सुद्धा बरोबर नसताना एक हत्ती पाठी लागला होता तो प्रसंग वाचून थरार म्हणजे काय समजते. त्याही परिस्थितीत पळताना त्यांनी कॅमेरा आणि तिकाटणं सोडलं नव्हतं. कालव्याजवळ बसून चित्र काढत रमून गेलेले असताना सुभग पक्षाची शीळ ऐकू आली. त्यानंतर तशीच शीळ घालून त्याची नक्कल करत त्याच्याबरोबर केलेली गंमत वाचताना असा निखळ आनंद केवळ तिथेच सापडू शकतो हे जाणवत. लेखक मदुमलाई जंगलाबद्दल त्यांना वाटणाऱ्या भावना एका वाक्यात सांगतात -माझ्या झेपेचा पूर्ण साक्षात्कार मला हत्तींच्या मदुमलईत झाला, जसा गौतमासाठी एक बोधीवृक्ष होता, माझ्यासाठी एक अखंड जंगल होतं.
हलका फुलका विनोद करत, तोही सहज ओघात आलेला, मनाला भिडणारे अनुभव सांगण्याची त्यांची खास शैली, त्यामुळे पुस्तक कधी वाचून संपलं कळत नाही. फोटो इतके जिवंत आहेत की नजर हटत नाही. एका वेगळ्याच विश्वाची सफर आपल्याला घडलेली असते. असे जग जे आपण राहतो त्याच पृथ्वीवर, त्याच देशात आहे पण आपल्याला पूर्णपणे अपरिचित आहे. आपल्या जगण्यापेक्षा अस्सल आहे, जीवन म्हणावे असे आहे. जिथून आपले पूर्वज आले ते जग, ज्याच्याशी असलेली नाळ आपण स्वतः कधीच तोडली आहे. आपण सुख, आनंद, समाधान वगैरे सेल्फ हेल्प पुस्तकांत शोधत आहोत जे तिथे सापडणारच नाही कारण आपलं पाकीट जिथे हरवलं असतं तिथेच शोधावं लागतं. तसं या गोष्टी जिथे हरवल्या आहेत तिथेच त्या शोधाव्या लागतील नं!
यासाठीच रानवेड्याने शिकवलेले शहाणपण असलेली अंतर्मुख करणारी ही शोधयात्रा वाचायला हवी.


