सुनील शिरवाडकर
अलीकडचीच गोष्ट. एक तिशीचा तरुण दुकानात आला. चांदीचा ताईत त्याला हवा होता. एक ताईत घेतला त्याने. सहजच चौकशी केली, कशासाठी वगैरे… त्याने जे सांगितलं, त्यानं अचंबित झालो!
हिरावाडीमध्ये रहात होता तो. पूर्वी कुठेतरी भद्रकालीत राहायचा… त्यांचा जुना वाडा आहे तिथे. शेजारी काका-काकूंचे घर… म्हणजे तेही घरचेच! त्यांच्याकडे खायला-प्यायला हे तिघे भाऊ जात. काका-काकूंची मुलेही यांच्याकडे येत. तर, यांचा असा समज की, ती काकू आपल्या वाईटावर आहे. कोणी आजारी पडले की… त्या काकूनेच काहीतरी ‘करणी’ वगैरे केली… हे डोक्यात फिटट्!
ते घर सोडून आता हिरावाडीत रहातात.
“मग आता काय त्रास होतो तुला?” मी विचारले.
“त्या काकूनेच काहीतरी केलंय… अंगात घुसतं माझ्या!”
“म्हणजे?”
“ते असं वढतं मला…”
सुरुवातीला काही कळेचना. मग हळूहळू लक्षात आले तो काय सांगतो ते… त्याचा असा पक्का समज झाला आहे की, आपल्याला ‘बाहेरची बाधा’ झालीय. कधीतरी मधूनच ‘ते’ त्याला त्रास द्यायला सुरुवात करतं… खांदे मागे ओढले जातात… त्याला कुणीतरी खेचायला लागतं… मग भयंकर भूक लागते…
“अवं, ते खायाला मागतं. मं मी निसता खात सुटतो… धा धा पंध्रा पंध्रा पोळ्या खाऊन टाकतो… मग ‘ते’ जरा शांत व्हतं!”
तो अगदी गंभीर होऊन सांगत होता. “लय उपाय केल्याचे,” तो सांगत होता. मोठे दोनही भाऊ असेच घरात पडून असतात… काही करत नाही. हा थोडेफार कमावतो. शिवाजी रोडवर ‘सुरुची’च्या समोरच्या कट्ट्यावर गॉगल्स, बेल्ट विकतो.
हेही वाचा – तीन पिढ्यांची कहाणी…
…आणि हे सगळं झालं काकूमुळे, असा त्याचा ठामसमज. लहानपणी तिनं काही काही ‘खाऊ घातलं’ त्यामुळेच ‘ते’ अंगात घुसलंय.
“मग आता काय करणार आहेस?”
“बाबा बोल्ले बाधा हाय! टाइम लागंल… लय जुनं हाय ना ते… पण निगल बायर!”
आता तो कुठल्या तरी बाबाकडे चालला होता. तिकडे कुठेतरी पाटील गल्ली का, कुंभारवाडा आहे. तिथला बाबा आपल्याला बरे करणार याची त्याला खात्री दिसली. त्या बाबाने दिलेलं तांब्याचं कडं त्याच्या हातात होतं. त्याच्या म्हणण्यानुसार ‘ते’ आता वारंवार त्रास देत नाही…
या सगळ्याची त्याला आता सवय झाल्यासारखी वाटली… कधीही ‘ते’ अंगात घुसतं… मग कधी तो रस्त्यावर असला तर गाडी थांबवतो… कधी तिकडे त्याच्या दुकानात असतो… ‘ते’ अंगात आलं की, खा खा करतो… आजूबाजूच्या दुकानदारांनाही हे सर्व माहीत झालंय! तो मोठमोठ्याने ओरडू लागला, रडू लागला की ते समजतात. मग त्याला ते कुठल्यातरी वडापावच्या गाडीवर नेतात… त्याला खाऊ घालतात. थोड्या वेळाने तो शांत होतो. मग त्याच्या लक्षात येते… ‘ते’ गेलं!! आता कुंभारवाड्यातला तो बाबा मंत्र मारून ताईत देईल. मग हळूहळू आपला त्रास कमी होईल…
हेही वाचा –
“टायम तर लागणारचं ना. लय जुनं हाय ते”
हेच तो पुन्हापुन्हा सांगत निघून गेला.
विज्ञानवादी युगात… एकविसाव्या शतकात अशीही माणसं! तीही तरुण पिढीतील आहेत हे बघून मला मात्र खंत वाटली. या सर्वांवर एकच उपाय… ‘मानसोपचार तज्ज्ञाकडे जा,’ असे पुन्हापुन्हा सांगूनही त्याला ते काही पटले नाही.


