दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 04 नोव्हेंबर 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 13 कार्तिक शके 1948; तिथि : दशमी 11:02; नक्षत्र : पू. फाल्गुनी 27:29;
- योग : ब्रह्मा 08:00, ऐंद्र 30:25; करण : बव 22:46;
- सूर्य : तुळ; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:39; सूर्यास्त : 18:04;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
भारतातील पहिल्या महिला वनस्पतिशास्त्र जानकी अम्माल
टीम अवांतर
भारतातील पहिल्या महिला वनस्पतिशास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध सायटोजेनेटिक्स शास्त्रज्ञ डॉ. एदावलेत कक्कट जानकी अम्माल यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1897 रोजी केरळमधील थेलासरी (तेल्लीचेरी) येथे झाला. वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करण्याचा वारसा जानकी यांना त्यांचे आजोबा आणि वडिलांकडून मिळाला. थलासरीमधील ‘सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट’मध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण करून जानकीनं मद्रासच्या क्वीन मेरी कॉलेजमधून पदवी आणि प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले.
आशियाई महिलांना परदेशात संपूर्णपणे मोफत शिक्षण घेण्याची संधी देणारी बार्बोर स्कॉलरशिप अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठामार्फत दिली जायची. जानकी यांनी त्यांच्याशी संपर्क केला आणि ती स्कॉलरशिप त्यांना मिळाली. त्यामुळे मिशिगन विद्यापीठातून त्यांनी वनस्पतीशास्त्रात डॉक्टरेट मिळवली.
हेही वाचा – दोन हात मायेचे, दोन हात संरक्षणाचे
1932 मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी त्रिवेंद्रम येथील ‘महाराजा कॉलेज ऑफ सायन्स’मध्ये प्राध्यापकी सुरू केली. तीन वर्षे त्यांनी प्राध्यापकी केली, तरी त्यांचा मूळ पिंड संशोधकाचा होता. ती संधी त्यांना लवकरच मिळाली. कोईमतूर येथील ‘शुगर ब्रीडिंग सेंटर’मध्ये मुख्य जनुकशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम करायला सुरूवात केली.
इथे त्यांनी उसाच्या विविध जातींवर मोठ्या प्रमाणात संशोधन केले. गोड जातीच्या उसाच्या वाणाच्या निर्मितीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांनी बनवलेलं वाण जास्त गोड आणि त्या काळी जवळपास दुप्पट उत्पादन देणारं होतं. शेतकर्यांना ते खूपच फायदेशीर ठरलं, आणि उसाचं उत्पादन वाढलं. भारताला साखर उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यास यामुळे मोठी मदत मिळाली. विशेष म्हणजे या संस्थेत काम करणार्या जानकी या त्यावेळी एकमेव महिला संशोधक होत्या.
पुढे भारत सरकारकडून डायरेक्टर जनरल ऑफ बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या पदावर त्यांची नियुक्त करण्यात आली. त्यांनी लखनौ तसेच जम्मू येथील सुप्रसिद्ध बॉटनिकल गार्डनची निर्मिती केली. भारतातील विविध भागांतील वनस्पतींचे नकाशे तयार केले. त्यानंतर अलाहाबादच्या सेंट्रल बॉटनिकल गार्डनची धुरा त्यांनी सांभाळली. केरळमधील डोंगरमाथ्यावरील विविध वनस्पतींचा त्यांनी अभ्यास आणि संग्रह केला. त्यांनी सिरिल डीन डार्लिंग्टन यांच्यासह ‘द क्रोमोसोम अॅटलास ऑफ कल्टिव्हेटेड प्लांट्स’ या ग्रंथाचे सह-लेखन केले. त्या भारतीय विज्ञान अकादमीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होत्या.
वनस्पतीशास्त्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल भारत सरकारने 1957 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. त्याआधी 1956 मध्ये मिशिगन विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट प्रदान केली. सी. व्ही. रामन यांनी स्थापन केलेल्या ‘इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स’मध्ये त्यांना संस्थापक-सदस्य म्हणून मान देण्यात आला. 1957 मध्ये ‘इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी’च्या सभासदपदी त्या निवडून आल्या.
4 फेब्रुवारी 1984 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या कार्याला मानवंदना म्हणून भारत सरकारने ‘ई. के. जानकी अम्मल राष्ट्रीय पुरस्कार’ 1999 पासून सुरू केला आहे. वनस्पतीशास्त्र संशोधनातील उत्कृष्ट कार्यास प्रोत्साहन मिळावं, या उद्देशाने दरवर्षी हा पुरस्कार जागतिक पर्यावरणदिनी दिला जातो. लंडनमधील ‘जॉन इनिस सेंटर’मध्ये विकसनशील देशातील संशोधक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून जानकी अम्मल यांच्या नावानं शिष्यवृत्ती दिली जाते. जम्मू येथील बोटानिकल गार्डनला जानकी अम्मल नाव देण्यात आलं आहे. या ठिकाणी 25 हजार वनस्पतींच्या प्रजाती जतन केल्या आहेत.
आजचे राशिभविष्य
मेष – आज जोडीदाराला कामाच्या ठिकाणी मोठे यश, सन्मान किंवा बढती मिळू शकते, ज्यामुळे घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होऊ शकते. संततीच्या भविष्याबद्दल कुटुंबात महत्त्वाच्या चर्चा होतील आणि तुम्हाला त्यांच्या शिक्षण किंवा करिअरबाबत एक मोठा निर्णय घ्यावा लागेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण किंवा नवीन अभ्यासक्रमाबाबत चांगली बातमी मिळू शकते. गरजेच्या वस्तूंची आज खरेदी कराल. सरकारी योजनेचा लाभ मिळण्याचीही शक्यता आहे.
वृषभ – आज कामाच्या ठिकाणी एक महत्त्वाचे काम सोपवले जाऊ शकते, ज्यामुळे तुमची क्षमता सिद्ध करण्याची चांगली संधी मिळेल. सरकारी योजना किंवा लाभांचा फायदा होण्याचीही शक्यता आहे. तुम्ही बऱ्याच काळापासून स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असाल, तर आज या दिशेने सकारात्मक पाऊले पडू शकतात. कर्ज किंवा आर्थिक मदत मिळण्याचीही शक्यता आहे. फक्त मोठे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी संयमाने पुढे जा आणि सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा.
मिथुन – आज स्वतःच्या जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करण्याच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी आपले प्राधान्यक्रम स्पष्ट ठेवा आणि एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करा. व्यावसायिकांना उत्पादनांच्या आणि सेवांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असेल. उच्च गुणवत्तेमुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि तुमची प्रतिष्ठा मजबूत होईल. विरोधक किंवा टीकाकारांच्या मतांनी प्रभावित होण्याऐवजी, तुमच्या अनुभवावर आणि विवेकबुद्धीवर आधारित निर्णय घ्या.
कर्क – काम करण्यातील शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे तुम्ही यशाच्या जवळ जाल. अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. स्वतःच्या आरोग्याची आणि तंदुरुस्तीची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. कामात व्यस्त असताना आहाराकडे आणि दैनंदिन दिनचर्येकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक व्यवहार करताना विशेष सावधगिरी बाळगा आणि महत्त्वाच्या करारांची किंवा देयकांची लेखी नोंद ठेवा. कोणत्याही कायदेशीर बाबतीत घाईने निर्णय घेण्यापूर्वी, सर्व तथ्ये काळजीपूर्वक समजून घ्या.
सिंह – चैनीच्या वस्तू आणि वैयक्तिक गरजांवरील खर्च आज वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक परिस्थितीचा विचार करूनच खरेदी करा. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली घरगुती कामे पूर्ण करण्यासाठीही आजचा दिवस चांगला ठरू शकतो. स्वतःच्या जबाबदाऱ्यांचे योग्य नियोजन केल्यास अनेक कामे सोपी होतील. अनावश्यक कामांवर वेळ वाया घालवण्याऐवजी, खरोखर महत्त्वाच्या असलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करा. आज योग्य नियोजन केल्यास तुम्हाला मनःशांती आणि चांगले परिणाम दोन्ही मिळू शकतात.
कन्या – अविवाहित व्यक्तींचे आज विवाह ठरण्याची शक्यता आहे. नोकरदार जातकांचे सहकारी आणि वरिष्ठांशी चांगले संबंध राहतील आणि त्यांना आपली कामे पूर्ण करण्यात आनंद मिळेल. गुंतवणुकीतून भरीव आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक एखादा मोठा करार पूर्ण करू शकतात, ज्यामुळे त्यांना मोठा नफा मिळेल. घरी एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. संततीसोबत संध्याकाळ घालवण्याचा आनंद घेता येईल.
तुळ – जर तुम्ही दीर्घकालीन आजाराने त्रस्त असाल, तर आज प्रकृतीत सुधारणा होऊ शकते. तुम्हाला कुटुंबाकडून भरपूर प्रेम आणि आनंद मिळेल. समाजात तुमच्याबद्दलचा आदर लक्षणीयरीत्या वाढेल. व्यवसायात चांगला नफा होईल आणि आर्थिक लाभ मिळवण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना, स्वतःसाठीही वेळ काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजची संध्याकाळ एखाद्या धार्मिक स्थळी घालवाल.
वृश्चिक – ज्या कामाचा तुम्ही बऱ्याच काळापासून पाठपुरावा करत होतात, ते काम आज पूर्ण होईल. सकाळी कामाची धावपळ असेल, पण तरीही तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवू शकता. आज कोणत्याही स्वरूपातील आर्थिक व्यवहार टाळा. उद्योजकांसाठी दिवस सामान्य असेल. सासरच्या एखाद्या व्यक्तीसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. त्यामुळे आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
हेही वाचा – … तर लाइक कराच!
धनु – घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घेतल्याने काम नेमकं कसं करायचं याचं चित्र स्पष्ट होईल. जोडीदाराकडून देखील प्रोत्साहन मिळेल. सभोवतालच्या क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करा; फक्त महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करा. वादविवाद टाळा, कारण त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. व्यावसायिकांचा व्यवसाय सध्या जोरदार सुरू असेल, यातून मोठा आर्थिक फायदा होईल. संध्याकाळ कुटुंबासोबत घालवाल.
मकर – आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि काळजीपूर्वक गाडी चालवा. एखादा जुना मित्र भेटायला येऊ शकतो, ज्यामुळे आनंद मिळेल आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. जोडीदाराकडून एक सुखद आश्चर्याची भेट मिळू शकते. संततीकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे काही काळ घरातील वातावरण त़ंग असेल. पण ही परिस्थिती लवकरच निवळेल.
कुंभ – बऱ्याच काळापासून भेट न झालेल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याशी आज भेट होईल आणि त्याचा तुम्हाला आनंद होईल. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. घरातील एखाद्या सदस्याच्या लग्नाची चर्चा पुढे सरकू शकते, ज्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. स्वतःची जीवनशैली बदला आणि आरोग्य सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करा. संध्याकाळ कुटुंबातील सदस्यांसोबत महत्त्वाच्या चर्चांमध्ये जाईल.
मीन – आज घरी काही खास पाहुण्यांचं आगमन होऊ शकते. त्यानिमित्ताने मिष्ठान्न भोजनाचा आस्वाद घेता येईल. आर्थिक स्थिरतेसाठी गुंतवणूक कराल. संततीच्या आरोग्याबद्दल थोडी चिंता वाटू शकते. नोकरी करणाऱ्या जातकांना दुसऱ्या कंपनीत मुलाखतीसाठी बोलावणे येईल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल आणि त्यांचे व्यावसायिक उपक्रम पूर्ण होतील. सरकारी अधिकाऱ्याच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेण्यास मदत होईल. संध्याकाळ मित्रासोबत घालवू शकता.


