भाग – 19
शरयू सोबत बोलत असताना त्या बालजीवाने जो प्रश्न उपस्थित केला त्यामुळे उमाचे अंतरंग ढवळून निघाले. उमा झोपण्यासाठी आडवी झाली खरी, पण तिला झोप लागेना. तिची चाललेली चुळबुळ आईच्या लक्षात आली. आई उठून बसली.
“व्हय गं पोरी, झ्वाप लागंना व्हय? दुकतंय का? पाय दाबू का वाईच? मंजी झ्वाप लागंल.”
“नाही गं. काही दुखत नाही. झोपच लागंना.”
“कसली काळजी करतीयास व्हय?”
आपल्या मनातील गोंधळ ओठांवर न आणता ती म्हणाली,
“कशाची काळजी करतेय? नाही लागत एखाद्या दिवशी झोप. त्यात काय एवढं?” असे म्हणत तिने कुस बदलली. आईला काळजी वाटू नये यासाठी तिने डोळे मिटून घेतले आणि ती शांत पडून राहिली. ती झोपली आहे, असा ग्रह झाल्याने आईने डोळे मिटले. दिवसभराच्या कामाने दमल्यामुळे तिचा चटकन डोळा लागला. आईची झोप लागली, हे पाहून तिला बरे वाटले. सकाळी कोंबडा आरवला तरी, तिला झोप काही लागली नाही. अंगावर वाकाळ घेऊन ती स्तब्ध पडून राहिली.
हेही वाचा – वंदूला झाली दुसरी मुलगीच अन्…
असेच चार दिवस गेले आणि तिचा उतरलेला चेहरा पाहून आईने विचारले,
“का गं? त्रास हुतूय का? जायाचं का दवाखान्यात?”
“पाय भरून आलेत गं. पोटात दुखतंय जरासं.”
अनुभवी असलेल्या आईने लेकीची लक्षणे पाहून पुढची तयारी सुरू केली. धुऊन ठेवलेल्या जुन्या साड्यांची बाळुती फाडली. तिला डोक्याला बांधायला एक नेटकं फडकं घेतलं. अंथरूण पांघरूणाची पिशवी तयार केली. चार दिवस दवाखान्यात राहावे लागेल, त्यासाठी लागणारे सगळे सामान भरले.
हेही वाचा – शरयूच्या प्रश्नाने उमाला चिंता
सगळे सामान भरून होईपर्यंत तिच्या कळा वाढल्या होत्या. आईने तिच्यासाठी भरपूर तूप घालून शिरा बनवला. थोडा डब्यात भरला आणि थोडा तिला जबरदस्तीने खायला लावला. ती अजिबात काही खायला तयार नव्हती… येणाऱ्या कळांनी बेजार झाली होती ती. आईने तिला समजावून थोडं खाऊ घातलं.
दाद्यानं तोपर्यंत जाऊन जीप गाडी आणली होती. आई आणि दाद्या दोघं मिळून तिच्यासोबत जीपमध्ये बसले.


