माधवी जोशी माहुलकर
भाग – 2
मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे ताडोबाच्या जंगलाने पहिल्याच भेटीत आमच्या मनावर गारुड केलं होतं. त्यामुळे चंद्रपुरला कोणी पाव्हणे आले की, आमची ताडोबा भेट ही नक्की ठरलेली असायची. ताडोबाच्या जंगलाचा एरिया हा जवळपास 625 कि.मी. स्क्वेअर एवढा पसरलेला आहे. ताडोबा अंधारी हा महाराष्ट्र राज्यातील एक नंबरचा व्याघ्र प्रकल्प आहे. जैवविविधतेच्या बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण असे हे जंगल आहे. ऐन, खैर, सागवान, हिरडा, बेहडा अशा अनेक औषधीयुक्त वनस्पतींनी परिपूर्ण असे वन आहे, पण मुख्यत्वेकरून बांबूची झाडे या जंगलात मोठ्या प्रमाणावर आहेत. या जंगलात फुलपाखरांच्या विविध जाती आहेत… यासुद्धा माझ्या पाहण्यात आल्या. जंगलातील उंच मचाणावर वाघ पाहायला बसलो असताना वाघ तर दिसला नाही, पण ही सुंदर मनमोहक फुलपाखरं मात्र मनाला भावून गेली. लाल, निळी, काळी, करडी, जांभळी, पांढरी, पिवळी, हिरवी, पोपटी अशी अनेक रंगांची फुलपाखरं त्या मचाणाखाली बागडत होती आणि त्यांच्या मनमोहक रंगांनी मात्र आमच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
जेव्हा जेव्हा आम्ही ताडोबाला जायचो त्या त्या वेळेस त्याचं एक नवीन रूप दृष्टीस पडायचं. अशी सलग पाच वर्षं मी ताडोबाला गेले… सगळे प्राणी दिसायचे, पण ज्याच्यासाठी जायचो तो वाघ मात्र आम्हाला काही दर्शन देत नव्हता. त्याची आमच्यावर नाराजी होती म्हणा किंवा आमच्या नशिबात वाघ पाहाणे नव्हते म्हणा, पण खरंच दरवेळेस आमची निराशा व्हायची. शेवटी आमची तिथून बदली झाली, पण व्याघ्रदर्शन मात्र काही झाले नाही!
चंद्रपूरनंतर गडचिरोली, वर्धा, नागपूर येथे असतानाही अनेक वेळा ताडोबाला गेलो; पण ताडोबाचा वाघोबा काही दिसला नाही… त्यामुळे आमच्यासोबतचे ग्रुपमधील लोक आम्हाला म्हणायला लागले की, “अरे, इनके साथ सफारी करेंगे तो टायगर अपने को भी देखने को नहीं मिलेगा…” हे बोलणं ऐकलं की, आमच मनं खट्टू व्हायचं… वाटायचं की, आपलेच नशीब इतके बेकार आहे का, की सलग पाच वर्षांत एकदाही आपल्याला वाघ दिसू नये! लोकांच्या जेव्हा गप्पा ऐकायचो की, आम्हाला तीन वाघ दिसले… चार दिसले… छाव्यांसोबत वाघीण दिसली… तेव्हा तर असं वाटायचं की, आता ताडोबाला परत कधीच जायचं नाही! पण मनामध्ये आत कुठेतरी जाणवायचं की, आपली निराशा होणार नाही… एक ना एक दिवस नक्कीच आपल्याला वाघ दिसेल…! आणि मग काय आमची परत ताडोबाला जाण्याची तयारी सुरू व्हायची. वाघ दिसला नाही तरी, ताडोबाच्या त्या विशिष्ट गंधमिश्रित हवेने मन मात्र ताजेतवाने व्हायचे. म्हणूनच आमच्या ताडोबाच्या वाऱ्या काही चुकल्या नाहीत… उलट त्या वाढल्या! पण आम्हाला काय माहीत होतं की, आमची सतत पाच वर्षांची तपस्या जवळपास पंधरा-वीस वर्षांनी फलित होणार होती!
हेही वाचा – ताडोबा आणि वाघोबा…
दरवर्षी ताडोबाला जाण्यात मात्र मध्यंतरीच्या काळात खंड पडला, मुलांची शिक्षणं, बदल्या अशा या ना त्या कारणाने ताडोबाला जाणे टळत होते… परंतु कोणी ताडोबाला जाऊन आलो म्हटलं की, मनामध्ये तीव्र इच्छाशक्ती जागृत व्हायची. ‘उम्मीद पर दुनिया कायम है…’ असं म्हणतात ना तसंच काहीसं आमच्याबाबतीत झालं.
1995 साली वाघ पाहाण्याची ओढ निर्माण झाली ती पूर्ण व्हायला 2016 साल उजाडावं लागलं. त्यामुळे तर खरंच खात्री पटली की, वाघ ज्याच्या नशिबात असेल त्यालाच दिसतो. वाघ आम्हाला दिसला, पण तो ताडोबाच्या नव्हे तर, नागपूरजवळच्या उमरेड करांडला या जंगलात आणि तेव्हा तर आमचं नशीब खूपच जोरावर होतं, असं म्हणावं लागेल… कारण, आम्हाला त्या जंगलात जो वाघ दिसला, तो काही साधासुधा नव्हता तर, त्या वेळेसचा आशिया खंडातील सर्वात मोठा आणि देखणा वाघ ‘जय’! हो, तो ‘जयचंद’च होता!! काय वर्णन करू त्याचं? उंच, देखणा, धष्टपुष्ट, पिवळाधम्मक रंग आणि त्यावर काळे पट्टे असलेला तो वाघ पाहून आम्ही तर चक्रावूनच गेलो. इतकी वर्षं वाघ दिसला नाही आणि आता दिसला तोपण इतका नितांत सुंदर जयसारखा वाघ! खरंच, आमची तपश्चर्या फळास आली होती… परंतु ताडोबात नाही तर, उमरेड करांडला या जंगलात. त्यानंतर वाघ दिसण्याची जी श्रृंखला सुरू झाली ती आजतागायत थांबली नाही!
त्यानंतर कान्हा, खुर्सा पार या जंगलातही वाघ दिसला, पण ताडोबा काही अजून आम्हाला व्याघ्रदर्शन होत नव्हतं. किती गमतीशीर होतं नाही सगळं! पण आम्हीपण ताडोबातील वाघ पाहण्याचा जणू चंगच बांधला होता. सरतेशेवटी 2017 साली आम्ही एकदा परत ताडोबाला जाण्याची सिद्धता केली… मनातं वाघ दिसेलच असा दृढ विश्वास घेऊन आम्ही ताडोबाकडे रवाना झालो…. गाडीने जसा वेग पकडला तसे आमचे मन अधिक वेगाने ताडोबाकडे धावू लागले.
आता आम्ही आमच्या गाडीने नव्हे तर जंगल सफारीच्या जिप्सीने ताडोबात शिरलो आणि परत एकदा त्या ओल्या, मातकट सुगंधाने आमच्या मनाचा ठाव घेतला. यावेळेस मात्र पहिल्याच भेटीत वाघ दिसेल, असं वाटत होतं. त्यामुळे आम्ही सगळेच खूप उत्साहात होतो. जंगलात शिरल्यानंतर नेहमीप्रमाणे चितळं, सांबर, नीलगाय यासारखे प्राणी दिसायला लागले. गाईडची अखंड बडबड सुरू होती. तो आम्हाला तीच ती माहिती पुरवत होता, जी आम्हाला आता तोंडपाठ झाली होती! त्यामुळे आम्ही त्याच्याकडे कानाडोळा करत होतो. जवळपास एक तासानंतर हरणांचा कॉल आला आणि आम्ही कान टवकारले… वाघ तिथेच जवळपास कुठेतरी होता. आमच्या ड्रायव्हरने गाडी जोरात पुढे पळवायला सुरुवात केली आणि दहा मिनिटांत आम्ही वाघ होता, त्या पाणवठ्यावर जाऊन पोहचलो. दोन-तीन गाड्या आमच्या आधीच तिथे जाऊन पोहचल्या होत्या. पण हे असं चालणारच कारण सगळ्यांनाच वाघाला मुक्त संचार करताना पाहायला आवडतं. सगळीकडे नीरव शांतता होती. हरणांचे एकमेकांना alert calls देणं सुरू होतं. तेवढाच काय तो आवाज… गाईडने आम्हालाही शांत बसण्याचा सल्ला दिला. आमच्या बाजूला discovery Channel ची गाडी होती. त्यांचे भलेमोठे कॅमेरे सरसावून ते बसले होते. सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. गाईडने आम्हाला इशारा केला आणि एका झुडुपाकडे बोट दाखवत पुटपुटला, “आ रहा हैं, आ रहा हैं…” आम्ही गाडीच्या सीटवर उभं राहून डोळे ताणून त्या दिशेने पाहायला लागलो. विशिष्ट अंतरावर गाड्या उभ्या असल्याने त्याचे व्यवस्थित दर्शन व्हायला हवे म्हणून आमचा आटापिटा चालला होता. जसा तो गाईडला दिसला तसा तो म्हणाला, “अरे ये तो माया हैं!”
‘माया’ ही ताडोबाच्या जंगलातील राणी! अख्ख एक चॅप्टर डिस्कव्हरी चॅनलने जिच्यावर शूट केलं आहे… तीच ती माया समोरच्या पाणवठ्यावर डौलात उभी ठाकली. अप्रतिम! केवळ हाच शब्द तिला लागू होतं होता. एकदम दिमाखदार आणि सुंदर दिसत होती. कान टवकारून सावध नजरेने सगळीकडे पहात होती. ती त्या पाणवठ्यावर असेस्तोवर बाकीच्या एकाही प्राण्याची तिथे यायची हिंमत नव्हती. ती पाणी प्यायली आणि तिथेच पाण्यात बसली. ती किती वेळ त्या पाण्यात बसेल, ते काहीच सांगता येत नव्हतं. पण आम्हाला आता वेळेशी काही देणंघेणं नव्हतं… तिला न्याहाळत बसणं बस इतकंच माहीत होतं! थोड्या वेळात आमच्या आजूबाजूच्या तीन-चार गाड्या तिथून निघाल्या… पण आम्ही तिथेच थांबून मायाच्या हालचाली टिपता होतो, कारण ताडोबामध्ये आम्हाला इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाघ दिसला होता… नव्हे! जगप्रसिद्ध ‘माया’ वाघीण दिसली होती!! तिला पाहण्याची ही सुवर्णसंधी आम्हाला दवडायची नव्हती. अस म्हणतातं ना की, ‘सब्र का फल मीठा होता हैं’! तसाच काहीसा अनुभव आम्हाला या ताडोबाने दिला होता. थोड्या वेळात माया पाण्यातून उठून उभी राहिली आणि कान टवकारून आमच्याकडे पाहायला लागली होती… जणू ती आम्हाला म्हणतं होती, “झालं का समाधान? आता माझं राज्य असलेलं हे ताडोबा तुम्हाला कधीच निराश करणार नाही! जवळपास वीस वर्षं तुम्ही ताडोबातील वाघ पाहण्याची तपश्चर्या केलेली आहे, ती आता वाया जाणार नाही. माझी जादू तुम्हाला या जंगलाच्या प्रेमातून बाहेर पडू देणार नाही. आता जेव्हा केव्हा तुम्ही इथे याल, तेव्हा मी नाही दिसले तरी, इतर वाघोबा तुम्हाला निश्चितच दिसतील…” ती आमच्या गाड्यांकडे आपली नजर रोखून पहात होती आणि वारंवार आमच्या मनाची खात्री करून देत होती की, ‘मै हूं ना!!’ दोन कान उभे करून तिने आमच्याकडे परत एकदा मान वर करून पाहिलं आणि मोठ्या डौलाने चालत ती झुडपात निघून गेली. पण तिने आम्हाला जी ग्वाही दिली होती, ती तंतोतंत खरी ठरली होती… कारण त्यानंतर आम्ही जेव्हा केव्हा ताडोबाला गेलो तेव्हा वाघ दिसला नाही, अस व्हायचं नाही. मायाने जणू त्यांना ऑर्डर दिल्या होत्या की, आता यांना कधीच निराश करायचं नाही. मायाने दर्शन दिल्यानंतर तर जास्तीत जास्त वाघिणींच आम्हाला पाहायला मिळाल्या होत्या. कॉलरवाली, तारा आणि तिची मुलगी छोटी तारा, डब्ल्यू, मधू अशा वाघिणींचं दर्शन अनेक वेळा झाले. त्यानंतर आस लागली होती ‘मटकासुर’ला पाहण्याची! माया प्रमाणेच हादेखील ताडोबाचा अनभिषिक्त सम्राट… 2018मध्ये हीपण इच्छा पूर्ण झाली…
हेही वाचा – नागपूरची प्रसिद्ध काळी पिवळी मारबत!
‘मटकासुर’ नावाप्रमाणेचं मस्तवाल वाघ! तो आपल्याकडे अशी काही नजर फेकतो की, भीतीने आपली गाळणच उडते. अतिशय भेदक नजर आहे त्याची! माणसाला पाहून त्याच्या चेहऱ्यावर तुच्छतेचे भाव निर्माण होतात. कदाचित, मनुष्यप्राणी त्याच्या खिजगणतीतही नसावा. या ट्रीपमध्ये तर आम्हाला सहसा सहज नजरेस न पडणारं अस्वल आणि बिबटही दिसले. गेल्या वीस वर्षांत जो आनंद आम्हाला मिळाला नव्हता, तो या तीन वर्षांत ताडोबाच्या वाघिणींनी आम्हाला मिळवून दिला होता.
खुर्सा पारच्या जंगलात तर अगदी आमच्या जिप्सीच्या मागून गेली होती… तीच नाव नाही आठवत… आता करोनाच्या आधी केलेल्या सफारीत डब्ल्यू या वाघिणीने आपल्या तीन छाव्यांसह मस्त दर्शन दिलं. जंगलात रस्त्याच्या मध्यभागी उन्हात छान ठाण मांडून सगळे बसले होते. मन अगदी तृप्त झालं होतं. आता म्हणजे असं घडत होतं की, वाघ आमच्यासमोर आला की, हलायचं नावाचं घ्यायचा नाही. शेवटी वैतागून आम्ही मनात म्हणायचो की, ‘आता बसं झालं रे बाबा, डोळा भरून तुला पाहून झालं… आमची वाट सोड आता.’ म्हणतात ना. ‘भगवान देता है तो छप्पर फाडके देता है…’ तसंच काहीसं झालं होतं आमच्या बाबतीत!
त्या जंगलाच्या हवेत खरंच एक प्रकारची जादू आहे. एकदा ताडोबाला तुम्ही जाऊन आलात तर तिथे वारंवार जाण्यासाठी हे जंगल तुम्हाला साद घालतं आणि नकळत आपले मन ताडोबाकडे धाव घेऊ लागतं… ईराई डॅमचे बॅकवॉटर एन्जॉय करणं आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या पक्षांचे निरीक्षण करणं, हा देखील एक अवर्णनीय आनंद अनुभवण्यासारखा आहे.
ताडोबाने मात्र एक शिकवण आम्हाला नक्कीच दिली की, हव्यासापायी निसर्ग नष्ट करू नका… तुम्ही जंगल पाहा, फिरा… परंतू तिथे नांदणाऱ्या प्राण्यांच्या जीवाला इजा करू नका. तिथले नैसर्गिक सौंदर्य जपा, त्याचा व्यापार करून त्या मुक्या जीवांचे अधिवास धोक्यात आणू नका. ताडोबाचंही तसंच आहे. ताडोबा जंगलाचे सौंदर्य त्याचे वाघ आहेत! आपल्या भावी पिढीकरिता हा वारसा आपल्याला जपून ठेवायचा असेल तर, या जंगलाचे सौंदर्य अबाधित ठेवून ताडोबा आणि वाघोबा दोन्ही वाचवायला हवेत.
समाप्त


