परिणिता रिसबूड
आभाळ
आभाळ भरून आले बाई
आभाळ भरून आले
ढगाचे सावळे रूप हळुवार करून गेले
आभाळ वयात आले बाई
आभाळ वयात आले
मन असे कसे नववधु झाले
आभाळ अधीर झाले
अगदी अधीर झाले
गर्भारशीच्या पोटात दुखू दुखू लागले
वेलीचे मन कसे पालवू पालवू लागले
लव्ह बर्ड
आठवतायत का तुला ते दिवस
जेव्हा आपण love birds होतो
तेव्हापासूनच होती मला
आकाशाची ओढ
वाटलं असे की तुझ्या पंखाची
मिळाली मला जोड
म्हणूनच आपण एक घरटे बांधले
वाटले असे की आता, मला सगळे साधले
पण, तुझ्या पंखांना होती
अहंकाराची धार
त्यांनी माझ्या पंखांना
छेद गेला आरपार
आता मन पक्षी, स्वप्नातच भराऱ्या मारतो
आठवतायत का तुला ते दिवस
जेव्हा आपण love birds होतो
हेही वाचा – Poetry : हाऊस वाइफ, हुरहूर अन् नातं
पावसाची पहिली सर
पहिली सर आली भर भर
वाहून गेले मनातील मळभ
पहिली सर आली लचकत
कोवळ्या मनात उगीच खळबळ
पहिली सर आली मुसळधार
हलका करून गेली दुःखाचा भार
पहिली सर उगीचच पाण्याची शिंपडन
लहान मुलांचे जणू बोबडे बोल
पहिली सर आली अचानक
प्रिय व्यक्तीचा जसा येतो निरोप
पहिली सर आली भरभरून
फुल पटकन गेले फुलून
उगवले बिंब
तुझ्या बकुळ आठवणी
दरवळल्या माझ्या अंगणी
वेचल्या ओंजळी ओंजळी
भरभरून घेतल्या श्वासात
शरीरभर उठल्या सुगंध लहरी
तुझ्या स्पर्शाची सोन किरणे
उजळतात माझे शरीर शरीर
मिलनाचे मधुर पहाट गाणे
हलकेच येते माझ्या ओठावर
तृप्त मनाच्या संधीप्रकाशी
नयनी तरळतात दवाचे थेंब
माझ्या अंतरंगात उगवते
तुझेच तुझेच बिंब
हेही वाचा – Poetry : आवर्त, काही दिवस, गुंफण अन् मी…
(कवितासंग्रह – कवयित्री)
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.