परिणिता रिसबूड
आजकाल मी आयुष्य
आजकाल मी आयुष्य वाईंडप करायला घेतलंय
खूप झाले जमा खर्च, खूप झाल्या रीतीभाती
नको त्या गोष्टींनी जीवन वेढलंय
आजकाल मी आयुष्य वाईंडप करायला घेतलंय
एकदा मनसोक्त झोप काढायची आहे
सकाळची न्याहारी दुपारी करायची आहे
काहीही न करता दिवस घालवायचा आहे
रुटीनच्या नावा खाली जीवन बांधलंय
आजकाल मी…
एकदा नुसते विनाकारण हिंडायचे आहे
मैत्रिणीच्या घोळक्यात रमायचे आहे
हातावरचे घड्याळ बाजूला ठेवायचे आहे
काळवेळेचे चक्र जीवन पोखरत बसलंय
आजकाल मी…
पाहायचा राहिलाय निसर्गाचा सोहळा
पानाची पानगळ आणि फुलांचा बहर
आत दडलेले फुलपाखरु मोकळे सोडायचे आहे
शोभेल का हे असे वागणे या विचारताच जीवन अडकलंय
आजकाल मी…
काय माहीत किती श्वास
आता कशाचा धरावा ध्यास
माझी मला खरेतर भेटायचे राहिलंय
आज काल मी…
तुझा स्पर्श
तुझा स्पर्श मृदगंध
तरारलेले गवत
प्राजक्ताचा सडा विरक्त
तुझा स्पर्श मुका
घुमणार पारवा
तुझा स्पर्श
जुळलेल्या तारा
अनुभवला मी
स्पर्शील्याविना
हेही वाचा – Poetry : आवर्त, काही दिवस, गुंफण अन् मी…
जाईजुई
माझ्या जाईजुईला गं
तुझ्या मनगटाचा देठ
माझ्या लाजळूला स्पर्शीण्यास
तुझे ओठ
दारातल्या केळीला गं
तुझ्या श्वासाचेच रोमांच
कौलावरचे पाखरू
होई मनातच चिंब
हायकू
खच्चून भरलेल्या एसटीत
त्याने मला दिली ‘सीट’
मी त्याला म्हणाले थँक्यू
एवढ्यावरच त्याने लिहिला हायकू
वाऱ्याने आणला गंध
धरतीला लागली आस
वेलीचे शहारले अंग
अन् भरून आले आभाळ
चालता चालता बोलत होतो
बोलता बोलता आले वळण
तू वळल्यावर लक्षात आले
तुझ्या बरोबर गेले माझे मन
तू म्हणालास, काहीही माग
सर्वकाही तुझ्याचसाठी
मी म्हणाले, मागून मिळत नाही प्रीती
सक्तीने कधी होत नाही भक्ती
हेही वाचा – Poetry : बाई, अस्तित्व, स्माईल प्लिज…
(कवितासंग्रह – कवयित्री)
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.