नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते… पुन्हा तुमच्या भेटीला आलेय. गोष्ट आहे, सदाफुली झाडाची!
बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा… बालपणीचा काळ सुखाचा… हे सगळं ऐकायला किती छान वाटतं… पण मोठेपणीच! लहान असताना नाही.
लहान मुलांना नाही म्हटलं तरी, सतत काही ना काही प्रश्न पडत असतात. मलाही पडायचे. पण त्याची उत्तरे काही मिळायची नाहीत. ‘गप्प बस, काय सारखं डोकं खाते…,’ असेच म्हणायचे सगळे मला. पण तेच सर्व, माझी मुले मोठी होत असताना मला मात्र, सांगायचे की, ‘मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देत जा, टाळू नको!!’
हल्लीच्या मुलांना प्रश्न पडला तर, त्यांना उत्तर द्यायलाय गूगल बाबा किंवा गूगळीण मावशी आहेच!
गिरगावातलं आमचं घर तसं लहान होतं. लहान घर खूप माणसे अशी स्थिती होती. त्यांची अडचण वगैरे कळायची अक्कल नव्हती. पण माझं आवडतं घर म्हणजे, खेतवाडी आठव्या गल्लीतलं नाना आजोबांचं घर… चांगलं मोठं घर… पुढला दरवाजा, मागचा दरवाजा, घरात शिरलं की, डाव्या हाताला मोठी खिडकी… खिडकीमध्ये सदाफुलीचं झाडं होतं… आणि खिडकीला लागूनच भिंतीमध्ये मोठा देव्हारा होता.
घरात नाना आजोबा, मामी आजी खूप सारे लाड करायला होतेच! दादा काका म्हणजे सदानंद. अप्पाच (माझे बाबा) फक्त त्यांना सदा म्हणायचे. बाकी सगळे दादा म्हणायचे. माई आत्याला वना आणि राजू काकाला राजू म्हणत असे. त्या घराने मला खूप सारं प्रेम दिलं, माझे खूप लाड केले. ‘पपी’ किंवा ‘पपे’ हे तिथलं हक्काचं नाव होतं.
हेही वाचा – मॉन्टेसरीतच माझा स्मार्टनेस दाबला गेला…
एक बाळसुलभ प्रश्न होता… जो मला त्या घरात पाय ठेवला की, पडायचा… विचारायचं का कोणाला? जाऊ दे, कोणी ओरडलं तर? लाड करणारे ओरडले तर जास्त वाईट वाटतं.
एकदा मी धीर करून विचारलंच… तुमच्या घरी फक्त सदाफुलीचंच झाड आहे? माईफुली आणि राजूफुलीचं का नाही?
झालं… उत्तर मिळालंच नाही! पण ती रजनी ताई, ज्योती ताई आणि भारती ताई केवढ्या फिस्स करून मला हसल्या होत्या. त्यावेळी खूप राग आला होता त्यांचा. आज कदाचित सगळेजण विसरेलही असतील. पण अजूनही अधूनमधून हा किस्सा आठवला की, मी सुद्धा स्वत:वर अशीच हसते… सदाफुली, माईफुली आणि राजूफुली!
हेही वाचा – तो आला, तो बोलला… पण…
[…] हेही वाचा – सदाफुली, माईफुली अन् राजूफुली… […]