Monday, April 28, 2025
Homeमैत्रीणसुगंध त्या फुलातला या मनात कोंदला...

सुगंध त्या फुलातला या मनात कोंदला…

मानसी देशपांडे

आजचा लेख हा प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याच्या विषयावर लिहायचं ठरवलं. म्हटलं रोज वैचारिक, गहन विषयावर लिहितच असते. पण आज जरा हलकाफुलका विषय घेऊन लेखाची सुरुवात करावी. तर आजचा विषय आहे “गजरा…” बघा, नाव वाचता क्षणी एक प्रकारचा सुगंध पसरला नाही का…! आता, गजरा आणि नवरा-बायकोचे नाते याचा फार जवळचा संबंध असतो. आता व.पु. काळे यांनी जसं म्हटलं आहे, “हसतीखेळती बायको, हे केवढं वैभव आहे महाराजा!!” प्रत्येक नवरा-बायकोच्या आयुष्यात या गजऱ्याच्या काही ना काही आठवणी या असतातच. मुलगी जेव्हा कोणत्याही समारंभात सजून-धजून जाते तेव्हा साडीबरोबरच तिच्या सौंदर्यात भर घालतो तो गजरा. त्यात तो गजरा जर जोडीदाराने आणलेला असेल तर, ते एक वेगळेच प्रेम असते नाही का!

या गजऱ्यावरून व.पुं.चा अजून एक विचार आठवला, “प्रेम केल्यानेच प्रेम समजतं…” जोडीदार हा पैशाने श्रीमंत नसला तरी, तो मनाने श्रीमंत असणं गरजेचं असतं. त्याने लाखो रुपयांचा हार जरी, आणला तरी पानात गुंडाळून आणलेला गजरा स्त्रीला जास्त आकर्षित करतो. जाई-जुईची फुलं म्हणजे अतिशय नाजूक आणि सुवासिक… तशीच स्त्री असते किंवा आपण बघतो, गुलाबाच्या पाकळ्यांचा गजरा देखील आपल्याला प्रेमात पाडतो. पण या पाकळ्यांचा गजरा हा तयार करताना अतिशय नाजूक हाताने तो ओवावा लागतो, कारण सुईच्या टोकामुळे पाकळ्या लगेच गळून पडतात. पण जेव्हा हा गजरा तयार होतो, तेव्हा अतिशय सुंदर दिसतो. अशी साडी नेसून, गजरा घातलेली स्त्री समोर आली तर, कोणत्याही जोडीदाराच्या मनात एकाच गाण्याच्या ओळी येतील,

“मला वसंतसेना दिसली..”

व.पुं.नी आणखीन एक सुंदर विचार मांडला आहे, “गंध दान करून फुलांना कोमेजण्याचे बळ येते…” खरंच, फुलं असो किंवा गजरा, हातातून केसात जाईपर्यंतचा त्यांचा प्रवास हा सुगंधितच असतो. अहो, आपली ओंजळ इतकी सुगंधित होते की, मनाला एक प्रकारचा टवटवीतपणा येतो. काही नवरा-बायकोसाठी गजरा म्हणजे लग्नानंतरची पहिली भेट म्हणून खास असतो. तर काहींसाठी रुसवा काढण्याचे हे माध्यमच असते. प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवेळी I love you बोलले पाहिजे का? आता थोडं मागे गेलं तर, जुन्या काळात देखील प्रेम व्यक्त होतंच असेल की! पण ते कसे तर साडी आणून, गजरा आणून, अशा पद्धतीने. म्हणून, परमेश्वराने फुलांची निर्मिती केली असावी. घरात आजींसाठी कधीतरी आजोबांनी आणलेला गजरा, हा त्यांना त्यांच्या काळात नेल्याशिवाय राहत नाही. तोच गजरा त्यांच्याजवळ देताना एक गाणे रेडिओवर लागले तर, तो क्षण खूपच सुंदर साजरा होईल,

“जे जे हवेसे जीवनी ते सर्व आहे लाभले,
तरीही उरे काही उणे, तू पूर्तता होशील का…”

Loading spinner
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!