Saturday, August 2, 2025

banner 468x60

Homeललितदी ब्युटिफुल ट्री

दी ब्युटिफुल ट्री

यश:श्री

सध्या देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात आणण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या महाराष्ट्रात सरकारी शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. मात्र, त्याला तामिळनाडूने कडाडून विरोध केला आहे. विशेषत:, तीन भाषांचे सूत्र त्यांना स्वीकारार्ह नाही. त्यांचा हा विरोध आताचा नाही. साधारणपणे 1930-40पासून तामिळनाडूची भूमिका ही हिंदी भाषेला विरोध आणि द्विभाषा सूत्राचा पुरस्कार अशीच राहिली आहे. याच सूत्रासाठी तिथे मोठी आंदोलनेही झाली आहेत.

याच पार्श्वभूमीवर ख्यातनाम साहित्यिक दुर्गा भागवत यांचा एक लेख वाचनात आला होता. त्यात त्यांनी आपल्या प्राचीन शिक्षण पद्धतीबद्दल महात्मा गांधी यांचे विचार मांडले आहेत. भारतात ब्रिटिश येण्यापूर्वी सनातन परंपरेने पाठशाळांमधून जे शिक्षण दिले जात होते, त्याला महात्मा गांधी यांनी ‘ब्युटिफुल ट्री’ असे संबोधले आहे. ‘दी ब्युटिफुल ट्री’ याचा सरळ अर्थ ‘ ते सुंदर झाड’. ब्रिटिशांनी ते आमचे सुंदर झाड नष्ट करून टाकले. यासंदर्भात त्यांनी ब्रिटनच्या तत्कालीन पंतप्रधानांशी 1931 सालापासून दीर्घकाळ पत्रव्यवहार केला. त्यात त्यांनी म्हटले – सध्याची शिक्षणपद्धती एवढ़ी वाईट आहे की, एक दिवस ब्रिटिशांना ‘येथून चालते व्हा’ असे म्हणावे लागेल, असे गांधी म्हणाले होते.

या पत्रव्यवहारानुसार ब्रिटिशांनी मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या इलाक्यातील शाळांचे तपशील पाठवायची सूचना संबंधित कलेक्टरांना दिल्या होत्या. हे तपशील धर्मपाल यांच्या ‘दी ब्युटिफुल ट्री’ या पुस्तकात आहेत, अशी माहिती दुर्गाबाईंनी दिली आहे.

तामिळनाडू इंग्रजी भाषेसाठी आग्रही आहे. ही भाषा जगाशी संवाद साधणारी आहे आणि संधीचे दरवाजे उघडणारी आहे, असे तामिळनाडूचे आधीपासूनचे म्हणणे आहे. इंग्रजी ही परकीय भाषा जरी असली तरी, त्या भाषेचे गारूड दोन मोठ्या भारतीय विद्वानांनी समस्त जगाला घातले आहे, हा इतिहास आहे. ते विद्वान म्हणजे, स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी!

महात्मा गांधी यांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाबद्दल दुर्गाबाई यांनी एक किस्साही त्याच लेखात सांगितला आहे. एकदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये महात्मा गांधी यांनी भाषण केले होते. ते भाषण ऐकून इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी म्हटले होते की,’ मी अनेकदा भाषणे केली आहेत आणि ऐकलीही आहेत. पण ‘बायबल’ मधल्या इंग्रजीसारखे सुंदर आणि शुद्ध इंग्रजीतील तुमच्यासारखे भाषण मी अजून ऐकलेले नाही.’ चर्चिल यांना साहित्याचे ‘नोबेल’ पारितोषिक मिळाले होते, हे उल्लेखनीय.

त्यांची इतर भाषांवरही चांगली पकड होती. दुर्गाबाई म्हणतात – गांधीजींची भाषासरणी हे भारताचे महान वैभव आहे. इंग्रजी असो, गुजराती असो, हिंदी असो… ते नेमके वेचक शब्द वापरत असत. एकदा काकासाहेब कालेलकर हे निष्णात साहित्यिक असून सुद्धा त्यांना ‘डेथ डान्स’ याला योग्य शब्द सापडेना. तेव्हा गांधीजींनी क्षणात सांगितलं की, ‘पतंग नृत्य’ हा शब्द वापरा. दिव्याची ज्योत आणि पंतगाचा संबंध आपल्याकडे पूर्वापार चालत आलेला आहे. ज्याला आपली भाषा सुधारायची असेल, त्यांनी गांधीजींचे गद्य आणि काव्यात्मक लिखाण वाचावे. गुजराती भाषेला जो डौल प्राप्त झाला आहे, तो गांधीजींमुळेच प्राप्त आहे. ‘सत्याग्रह’ हा शब्द गांधीजींनी अमेरिकेत हेन्री डेव्हिड थोरोने केलेला शब्दप्रयोग ‘पॅसिव्ह रेझिस्टन्स’ याचेच सुंदर रुपांतर आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!