Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…
रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ बनविताना या टिप्स वापरून पाहा.
- रात्रीचा भात उरला असल्यास किंवा ताजा भात मोकळा शिजवून घेऊन असा नवीन पुलाव करून पाहा – एका पसरट भांड्यात भात फोडून घ्यावा. त्यात टोमॅटो सॉस, चिली सॉस, थोडे तिखट, मीठ, साखर, लिंबाचा रस टाकावा. एका कढईत कांदा परतून घेऊन बाजूला काढावा. कोबी परतून घेऊन बाजूला काढावा. इतर काही भाज्या असल्यास त्याही परतून घेऊन बाजूला काढाव्यात. शेवया तुपावर तळून घ्याव्यात. एका पातेल्यात तूप घ्यावे आणि एक थर भाताचा आणि एक थर भाजीचा असे रचत जावे. वर शेवया घालाव्यात. थोडी चेरी घालावी आणि वाफ द्यावी. तिखट आणि सॉसमूळ भाताचा रंग लाल होईल. हा भात चवीला खूपच छान लागतो.
हेही वाचा – Kitchen Tips : दह्याची कोशिंबीर, वांग्याचे भरीत आणि टोमॅटो प्युरी करताना…
- पुलाव अथवा बिर्याणीवर तळलेला कांदा पसरतो. त्यासाठी खूपसा कांदा उभा चिरून कडकडीत उन्हात वाळवून बरणीमध्ये भरून ठेवावा. खूप दिवस टिकतो आणि आयत्या वेळी पटकन तळून घेता येतो. हा कांदा तापलेल्या तेलात घालताच लगेच ब्राऊन होतो आणि कुरकुरीतसुद्धा. त्यामुळे गॅसची बचत होते आणि या कांद्यात पाण्याचा अंश नसल्याने तळताना तेल आजूबाजूला उडत नाही.
- सांबारास उकळी आल्यानंतर त्यात सांबार मसाल्याबरोबर थोडा पाव-भाजीचा मसाला टाकावा. त्यामुळे सांबाराची चव उत्तम लागते.
- कटाच्या आमटीत शेवग्याच्या शेंगा असल्याशिवाय आमटीला चव येत नाही. पण प्रत्येक वेळी पुरण घालू तेव्हा शेवग्याच्या शेंगा मिळतातच, असे नाही. म्हणूनच शेवग्याच्या शेंगा भरपूर मिळतात तेव्हाच बाजारातून आणाव्यात. आळूची देठं सोलतो त्याप्रमाणे शेंगांची साले सोलून काढावीत आणि शेंगांच्या बारीक बारीक चकत्या करून वाळवून ठेवाव्यात. मिक्सरवर फिरवून पूड करून ठेवावी. म्हणजे हवे तेव्हा आमटी, सांबार यात घालता येते. शेवग्याचा छान वास, स्वाद येतो.
हेही वाचा – Kitchen Tips : भेंडीच्या बियांची चटणी, ग्रीन ग्रेव्ही भाजी अन् पडवळाची कोशिंबीर…
- छोले-भटुऱ्यामधील काबुली चणा कुकरमध्ये शिजवल्यानंतर त्यात लगेचच एक टी-बॅग ठेवून 15-20 मिनिटे चणे तसेच झाकून ठेवावे. मग ही बॅग पिळून फेकून द्यावी. चणे छान काळपट तपकिरी होतात.
- वाटली डाळ खाताना ती कोरडी होते. त्याकरिता एक वाटी हरभऱ्याची डाळ भिजवताना दुसऱ्या एका वाटीत दोन टीस्पून साबुदाणा भिजवावा. डाळ वाटून फोडणीस टाकताना बरोबर भिजलेला साबुदाणा टाकावा आणि दूध किंवा ताकाचा शिपका द्यावा. वाटली डाळ अगदी मऊ मोकळी होते.
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.
(‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)


