सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय दहावा
नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा । पराप्रमेयप्रमदा- । विलासिया ॥1॥ नमो संसारतमसूर्या । अप्रतिमपरमवीर्या । तरुणतरतूर्या- । लालनलीला ॥2॥ नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना । सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥3॥ नमो चतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा । श्रुतिगुणसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥4॥ नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना । विश्वोद्भवभुवना । श्रीगुरुराया ॥5॥ तुमचा अनुग्रहो गणेशु । जैं दे आपुला सौरसु । तैं सारस्वतीं प्रवेशु । बाळकाही आथी ॥6॥ दैविकी उदार वाचा । जैं उद्देशु दे नाभिकाराचा । तैं नवरसदीपांचा । थावो लाभे ॥7॥ जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी । जरी मुकेयातें अंगिकारी । तो वाचस्पतीशीं करी । प्रबंधुहोडा ॥8॥ हें असो दिठी जयावरी झळके । कीं हा पद्मकरु माथां पारुखे । तो जीवचि परि तुके । महेशेंशीं ॥9॥ एवढें जिये महिमेचें करणें । ते वाचाळपणें वानूं मी कवणें । का सूर्याचिया आंगा उटणें । लागत असे ॥10॥ केउता कल्पतरूवरी फुलौरा । कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा । ऐसा कवणें वासीं कापुरा । सुवासु देवों ॥11॥ चंदनातें कायसेनि चर्चावें । अमृतातें केउतें रांधावें । गगनावरी उभवावें । घडे केवीं ॥12॥ तैसें श्रीगुरूचें महिमान । आकळितें कें असे साधन । हें जाणोनि मियां नमन । निवांत केलें ॥13॥ तरी प्रज्ञेचेनि आथिलेपणें । श्रीगुरुसमर्था रूप करूं म्हणें । तरि मोतियासी भिंग देणें । तैसें होईल ॥14॥ कां साडेपंधरया रजतवणी । तैशीं स्तुतीचीं बोलणीं । उगियाचि माथां ठेविजे चरणीं । हेंचि भलें ॥15॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जन्मलिया दिवसदिवसें, हों लागे काळाचियाचि ऐसें…
अर्थ
स्पष्ट बोध करण्यात चतुर असलेल्या आणि विद्यारूपी कमलाचा विकास करणार्या आणि परावाणीचा विषय (स्वरूपस्थिती) हीच कोणी तरुण स्त्री, त्या स्त्रीशी विलास करणार्या, (श्रीगुरो), तुम्हास माझा नस्कार असो. ॥1॥ अहो, संसाररूपी अंधाराचा नाश करणाऱ्या सूर्या, निरुपम अशा श्रेष्ठ सामर्थ्याने युक्त, ज्वानीच्या भरात असलेल्या ज्ञानरूप चौथ्या अवस्थेचे स्नेहाने पालन करणे ही ज्यांची क्रीडा आहे, अशा श्रीगुरो, तुम्हास माझा नमस्कार असो ॥2॥ अहो, सर्व जगाचे पालन करणारे, कल्याणरूपी रत्नांची खाण असलेले, भक्तरूपी वनातील चंदन असलेले आणि पूजा करण्यास योग्य असलेले देव, तुम्हास माझा नमस्कार असो ॥3॥ शहाण्या चित्तरूपी चकोरास आनंद देणार्या चंद्रा, ब्रह्मानुभवाच्या राजा, वेदगुणांच्या समुद्रा आणि कामाला मोहित करणार्या, तुम्हाला माझा नमस्कार असो. ॥4॥ शुद्ध भावाने भजन करण्यास योग्य असणारे, संसाररूपी हत्तीच्या गंडस्थळाचा नाश करणारे आणि विश्वाच्या उत्पत्तीचे स्थान असणारे, अहो श्रीगुरुराया, तुम्हाला माझा नमस्कार असो ॥5॥ तुमची कृपा हाच कोणी गणेश, तो जेव्हा आपले सामर्थ्य देतो, तेव्हा सर्व विद्यांमध्ये बालकाचा देखील प्रवेश होतो. ॥6॥ आपण जे गुरुदेव, त्या आपली उदार वाणी जेव्हा ‘भिऊ नकोस’ असे आश्वासन देते, तेव्हा शांतादि नवरसरूपी दिव्यांचा ठाव लागतो (म्हणजे नवरसरूपी दिवे प्रज्वलित केले जातात.) ॥7॥ महाराज, आपले प्रेम हीच कोणी सरस्वती, तिने जर मुक्याचा अंगीकार केला, तर तो पैजेने बृहस्पतीबरोबर देखील वादविवाद करतो. ॥8॥ हे राहू द्या. ज्याच्यावर आपली कृपादृष्टी पडते अथवा आपला वरदहस्त ज्याच्या मस्तकावर ठेवला जातो, तो जीवच खरा, पण तो शिवाच्या बरोबरीला येतो. ॥9॥ एवढ्या सर्व गोष्टी ज्या सामर्थ्याने होतात, त्याचे मी कोणत्या विशेष बोलण्याने वर्णन करू? सूर्याचे शरीर चकाकित दिसावे म्हणून त्यास (लोखंडाच्या आरशाप्रमाणे) घासण्याची जरूर आहे काय? ॥10॥ कल्पतरूला फलद्रूप होण्यास मोहोर कशाला फुटावयास पाहिजे? क्षीरसमुद्राला कशाने पाहुणाचार करावा? त्याचप्रमाणे कोणत्या वासाच्या योगाने कापराला सुगंधित करावे? ॥11॥ चंदनाला कशाची उटी लावावी? अमृताचे पक्वान्न कसे तयार करावे? आकाशावर मांडव घालणे शक्य आहे काय? ॥12॥ त्याप्रमाणे श्रीगुरूंच्या मोठेपणाचे आकलन करणारे साधन कोठे आहे? (कोठेही नाही.) हे लक्षात घेऊन मी निमूटपणाने त्यांना नमस्कार केला. ॥13॥ जर बुद्धीच्या संपन्नतेवर समर्थ श्रीगुरूंचे यथार्थ वर्णन करू म्हणेन तर, ते माझे करणे मोत्यांना (चकाकी येण्याकरिता) अभ्रकाचे पूट देण्यासारखे होईल. ॥14॥ साडेपंधरा दराच्या बावन्नकशी सोन्याला ज्याप्रमाणे चांदीचा मुलामा द्यावा, त्याप्रमाणे मी केलेल्या स्तुतीच्या भाषणाचा प्रकार होणार आहे. म्हणून यापुढे काही न बोलता आपल्या पायावर मस्तक ठेवावे, हेच बरे. ॥15॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें…
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


