सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
जो बहुवें विषयविलासें गुंफें । तो म्हणती उवायें पडिला सापें । जो अभिलाषभारें दडपे । तयातें सज्ञान म्हणती ॥509॥ जयाचें आयुष्य धाकुटें होय । बळ प्रज्ञा जिरोनि जाय । तयाचे नमस्कारिती पाय । वडिल म्हणोनि ॥510॥ जंव जंव बाळ बळिया वाढे । तंव तंव भोजें नाचती कोडें । आयुष्य निमालें आंतुलियेकडे । ते ग्लानीचि नाहीं ॥511॥ जन्मलिया दिवसदिवसें । हों लागे काळाचियाचि ऐसें । कीं वाढती करिती उल्हासें । उभविती गुढिया ॥512॥ अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती । परि असतें जात न गणिती । गहिंसपणें ॥513॥ दर्दुर सापें गिळिजतु आहे उभा । कीं तो मासिया वेटाळी जिभा । तैसे प्राणिये कवणा लोभा । वाढविती तृष्णा ॥514॥ अहा कटा हें वोखटें । मृत्युलोकींचें उफराटें । एथ अर्जुना जरी अवचटें । जन्मलासी तूं ॥515॥ तरि झडझडोनि वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग । जिया पावसी अव्यंग । निजधाम माझें ॥516॥
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु । मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण: ॥34॥
तूं मन हें मीचि करीं । माझां भजनीं प्रेम धरीं । सर्वत्र नमस्कारीं । मज एकातें ॥517॥ माझेनि अनुसंधानें देख । संकल्पु जाळणें निःशेख । मद्याजी चोख । याचि नांव ॥518॥ ऐसा मियां आथिला होसी । तेथ माझियाचि स्वरूपा पावसी । हें अंतःकरणींचें तुजपासीं । बोलिजत असे ॥519॥ अगा आवघिया चोरिया आपुलें । जें सर्वस्व आम्हीं असे ठेविलें । तें पावोनि सुख संचले । होऊनि ठासी ॥520॥ ऐसें सांवळेनि परब्रह्में । भक्तकामकल्पद्रुमें । बोलिलें आत्मारामें । संजयो म्हणे ॥521॥
हेही वाचा – Dnyaneshwari : अंगावरी पडतां पाषाण, न सुवावें केविं वोडण…
अर्थ
जो अनेक विषयविलासात निमग्न असतो, तो सध्या सुखात आहे, असे म्हणतात आणि जो लोभाने ग्रस्त झालेला आहे, त्यास या जगात ज्ञानी म्हणतात. ॥509॥ ज्याचे आयुष्य थोडे उरले आहे आणि त्याचप्रमाणे ज्याची बल आणि बुद्धी नाहीशी झाली आहेत, अशा म्हातार्यास वडील म्हणून नमस्कार करतात. ॥510॥ जसजसे मूल वयाने वाढत जाते (वयाने मोठे होते) तसतसे त्याचे आईबाप वगैरे आनंदाने आणि कौतुकाने नाचतात. पण वरून जरी (ते मूल) मोठे वाढताना दिसले तरी, वास्तविक पाहिले तर, आतून (त्याचे) आयुष्य सरून जात आहे, त्याची (त्यांना) खंतच नाही. ॥511॥ जन्मल्यापासून दिवसेंदिवस ते मूल अधिकाधिक काळाच्या तावडीत जाते, असे असून (आईबाप) आनंदाने त्याच्या वाढदिवसाचा उत्सव करतात आणि आनंदप्रदर्शक गुढ्याही उभारतात. ॥512॥ अरे अर्जुना, कोणी कोणाला ‘तू मर’ असे म्हटले तर, ते त्यास सहन होत नाही आणि (त्याच्या निवृत्तीचा उपाय न करता) मेल्यावर रडत बसतात. पण असलेले आयुष्य व्यर्थ जात आहे, हे त्यांना मूर्खपणाने समजत नाही. ॥513॥ बेडूक सापाकडून उभा गिळाला जात असताना देखील, तो बेडूक उडत असलेल्या माशांना पकडण्याकरता जीभ बाहेर काढून वेटाळीत असतो, तशाच तर्हेने प्राणी कोणात्या लोभाने तृष्णा वाढवतात कोण जाणे? ॥514॥ अरेरे, हे वाईट आहे! मृत्युलोकातील सर्वच न्याय उफराटा आहे. अर्जुना, तू जरी येथे अकस्मात जन्मला आहेस, ॥515॥ तरी या मृत्युलोकाच्या राहाटीतून झटकन मोकळा हो आणि या भक्तीच्या मार्गाला लाग की, ज्या भक्तीच्या योगाने माझे निर्दोष स्वरूप पावशील. ॥516॥
माझ्या ठिकाणी मन अर्पण केलेला हो, माझा भक्त हो, माझे यजन करणारा हो, (सर्वत्र) मला (एकाला) वंदन कर. अशा रीतीने मत्परायण होत्साता (माझे ठिकाणी) चित्त योजल्यावर तू माझ्याप्रतच येशील. ॥34॥
तू आपले मन मद्रूप कर. माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर आणि सर्व ठिकाणी माझेच स्वरूप आहे, असे समजून मला एकाला नमस्कार कर. ॥517॥ पाहा, जो माझ्या वेधाने संकल्प पूर्णपणे जाळतो, त्यालाच माझे चांगले भजन करणारा म्हणावे. ॥518॥ याप्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील, तेव्हा मद्रूपास पावशील; ही माझ्या अंत:करणातील (गुप्त गोष्ट) तुझ्याजवळ मी सांगत आहे. ॥519॥ अरे, सर्वांपासून लपवून ठेवलेले असे जे आमचे सर्व भांडवल, ते तुला प्राप्त झाले आहे. त्यामुळे तू सुखरूप होऊन राहाशील ॥520॥ भक्ताचे मनोरथ पूर्ण करणारे कल्पतरू जे मेघ:श्याम परब्रह्म श्रीकृष्ण, ते असे बोलले, असे संजय म्हणाला. ॥521॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जिये लोकींचा चंद्र क्षयरोगी । जेथ उदयो होय अस्तालागीं…


