दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 09 मार्च 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 18 फाल्गुन शके 1947; तिथि : षष्ठी 23:26; नक्षत्र : विशाखा 16:10
- योग : व्याघात 07:35; करण : गरज 10:16
- सूर्य : कुंभ; चंद्र : तुळ 09:29; सूर्योदय : 06:53; सूर्यास्त : 18:45
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
श्री एकनाथ षष्ठी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन
टीम अवांतर
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. संगीताचा वारसा त्यांना घरातूनच लाभला होता. वडील विख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखाँ (रख कुरेशी) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीताचे धडे घेतले. झाकीर हुसेन यांनी पहिला व्यावसायिक तबलावादनाचा कार्यक्रम 1963 मध्ये वयाच्या बाराव्या वर्षी केला.
तर, आपल्या तबलावादनातील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस त्यांनी 1970 मध्ये प्रारंभ केला. त्या एका वर्षात साधारणपणे 150 तबलावादनाचे कार्यक्रम त्यांनी भारतासह विविध देशांत सादर केले. याशिवाय सामूहिक तबलावादनासाठी विख्यात सरोदवादक आशीष खान यांच्यासोबत 1970 ‘शांतिगट’ आणि नंतर 1975 मध्ये पुढे इंग्रज गिटारवादक जॉन मॅक्लॉफ्लिन आणि व्हायोलिनवादक एल्. शंकर यांसोबत ‘शक्तिगट’ स्थापन केला. शिवाय ते स्वतंत्र तबलावादनाच्या मैफली करत. त्यांच्या वादनशैलीने आणि सादरीकरणाने त्यांनी भारतात तसेच विदेशात तबला या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. परंपरा आणि नावीन्य यांचे सुंदर मिश्रण त्यांच्या वादनशैलीत आढळते. तबलावादनातील त्यांचा जोश, बोटांची किमया आणि बेभानपणा ठळकपणे जाणवतो.
गुरु-शिष्य परंपरेला ते महत्त्व देत. तबलावादनातील मेरुमणी ठरलेल्या झाकिर हुसेन यांनी अली अकबरखाँ, बिरजू महाराज, रविशंकर, शिवकुमार शर्मा आदी अनेक श्रेष्ठ गायक, वादक, नर्तक यांना तबलावादनाची साथ दिली. शिवाय, त्यांचा स्वतःचा मोठा शिष्यपरिवार आहे. ते स्टॅन्फर्ड विद्यापीठात 2005-06 मध्ये भारतीय शास्त्रीय संगीताचे प्राध्यापक आणि 2007 साली अभ्यागत प्राध्यापक होते.
हेही वाचा – रस्ता क्रॉस करण्याची अशी पण एक मज्जा…
भारताच्या स्वातंत्र्याला साठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 2007 साली त्यांच्याकडे केंद्र शासनाने राष्ट्रगीताची संगीतरचना करण्याची जबाबदारी दिली होती. त्याआधी अटलांटा (अमेरिका) येथील 1996 च्या उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा-सामन्यांच्या उद्घाटनाची संगीतरचना त्यांनी केली. तबलावादनास त्यांनी दिलेले मोहक रूप मैफलीचे आकर्षण ठरले. त्यांनी अनेक हिंदी-इंग्रजी चित्रपटांतून तबलावादनाची साथ दिली आहे.
झाकिर हुसेन यांच्या सांगीतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारचा पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, इंडो-अमेरिकन वॉर्ड, नॅशनल हेरिटेज फेलोशिप, अमेरिका, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान, ग्रॅमी ॲवॉर्ड, कोनारक नाट्यमंडप (ओडिशा) यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्कार आदी मानसन्मान त्यांना लाभले. तसेच विविध संगीत महोत्सवांतून जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. झाकिर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी फुफ्फुसाच्या आजाराने अमेरिकेच्या सॅन फ्रॅन्सिस्को येथे 15 डिसेंबर 2024 रोजी निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस काहीसा व्यग्र राहील. कामाच्या ठिकाणी अचानक नवीन कामे उद्भवू शकतात, ज्यामुळे सुरुवातीला दबाव येऊ शकतो. अर्थात, कठोर परिश्रमाने गोष्टी हळूहळू स्थिर होतील. अनावश्यक खर्च टाळणे चांगले. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला रिलॅक्स वाटेल. आरोग्याच्या दृष्टीने विचार करता आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो, म्हणून विश्रांती घ्या.
वृषभ – कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम पाहायल मिळतील. वरिष्ठ तुमच्या मतांची प्रशंसा करू शकतात. आर्थिक बाबी संतुलित राहतील, तरीही खर्चाकडे थोडे लक्ष देणे आवश्यक असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. एखाद्या जुन्या मित्राचीही भेट होऊ शकते. आज आरोग्याच्या फारशा तक्रारी नसतील.
मिथुन – आजचा दिवस नवीन आकांक्षा घेऊन येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी काही चांगल्या संधी मिळू शकतात. ऑफिसमधील सहकाऱ्यांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे कामे पूर्ण करणे सोपे होऊ शकते. आर्थिक बाबींमध्ये हुशारीने पुढे जाणे उत्तम. आरोग्याच्या दृष्टीने आहाराची काळजी घ्या. बाहेरचे पदार्थ आणि फास्ट फूड खाणे टाळा.
कर्क – कामात हळूहळू प्रगती होण्याची अपेक्षा आहे. एखादे जुने काम पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक बाबी सामान्य राहतील. कोणताही मोठा खर्च करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे चांगले. कौटुंबिक पाठिंब्यामुळे मानसिक शांती मिळेल. आरोग्याबाबतचा निष्काळजीपणा मात्र टाळा. कोणताही आजार अंगावर काढू नका.
सिंह – दिवस धावपळीचा जाण्याची शक्यता आहे. कामाचा ताण वाढू शकतो आणि काही नवीन जबाबदाऱ्या देखील मिळू शकतात. ऑफिसमध्ये तुमचे विचार सुज्ञपणे व्यक्त करा. पैशांबाबत घाईघाईने निर्णय घेणे टाळा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मनःशांती मिळेल. उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम ही गुरुकिल्ली असेल.
हेही वाचा – कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
कन्या – आजचा दिवस तुमच्या योजना प्रत्यक्षात आणण्याचा असू शकतो. काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार देखील करू शकता. आर्थि क बाबी संतुलित राहू शकतात. मित्र किंवा आवडत्या व्यक्तीला भेटल्याने आनंद मिळू शकतो. आरोग्य सामान्य असेल, मात्र उन्हामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.
तुळ – आजचा दिवस सहकार्य आणि समजूतदारपणाने काम करण्याचा असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे कामे सोपी होत जातील. बऱ्याच काळापासून रखडलेले जुने काम पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक बाबींमध्ये थोडा संयम बाळगणे शहाणपणाचे ठरेल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. आरोग्य सामान्य राहील.
वृश्चिक – दिवस विचारपूर्वक निर्णय घेण्याचा असेल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती स्थिर राहू शकते. अनावश्यक आर्थिक खर्च टाळणे चांगले. कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केल्याने अनेक समस्या सोडवता येतात. सौहार्दपूर्ण संबंध राखण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची काळजी घ्या. हलका आहार आणि पुरेसे पाणी शरीरासाठी उत्तम औषध असेल.
धनु – आजची सुरुवात नवीन उर्जेने होऊ शकते. पूर्ण लक्ष कामावर केंद्रित कराल आणि काही चांगल्या संधी देखील मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते. आर्थिक बाबी चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आज वेळ मिळेल. यामुळे कुटुंबीय देखील आनंदी असतील.
मकर – आजचा दिवस प्रगतीचा असू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. व्यावसायिक आज नवीन योजना आखण्यास सुरुवात करू शकतात. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. कौटुंबिक आधार महत्त्वाचा असेल. जोडीदाराची देखील उत्तम साथ मिळेल. स्वतःच्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका. वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा.
कुंभ – आपण बरं, आपलं काम बरं अशा तऱ्हेने वागलात तर मानसिक शांतता मिळेल. कामात हळूहळू प्रगती होत असल्याचे दिसेल. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्याची योजना आखू शकता. आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे असेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने समाधान मिळेल. डोळ्यांची जळजळ होण्याची शक्यता आहे. गार पाण्याच्या कापसाच्या घड्या किंवा काकडीचे काप डोळ्यांवर ठेवलेत तर आराम वाटेल.
मीन – आजचा दिवस सकारात्मक असेल. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. आर्थिक बाबी संतुलित राहतील. कुटुंबासोबत वेळ घालवल्यासाठी संध्याकाळी एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचा निर्णय घ्याल.


