सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
आतां बहु बोलोनी सांगावें । तें एकिहेळा घे पां आघवें । सतासतही जाणावें । मीचि पैं गा ॥299॥ म्हणोनि अर्जुना मी नसें । ऐसा कवणु ठाव असे । परि प्राणियांचें दैव कैसें । जे न देखती मातें ॥300॥ तरंग पाणियेंवीण सुकती । रश्मि वातीविण न देखती । तैसे मीचि ते मी नव्हती । विस्मो देखे ॥301॥ हें आंतबाहेर मियां कोंदलें । जग निखिल माझेंचि वोतिलें । कीं कैसें कर्म तयां आलें । जे मीचि नाहीं म्हणती ॥302॥ परि अमृतकुहां पडिजे । कां आपणयातें कडिये काढिजे । ऐसें आथी काय कीजे । अप्राप्तासि ॥303॥ ग्रासा एका अन्नासाठीं । अंधु धांवताहे किरीटी । आडळला चितामणि पायें लोटी । आंधळेपणें ॥304॥ तैसें ज्ञान जैं सांडूनि जाये । तैं ऐसी हे दशा आहे । म्हणोनि कीजे तें केलें नोहे । ज्ञानेंविण ॥305॥ आंधळेया गरुडाचे पांख आहाती । ते कवणा उपेगा जाती । तैसें सत्कर्माचे उपखे ठाती । ज्ञानेंवीण ॥306॥
त्रैविद्या मां सोमपा: पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते । ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान् दिवि देवभोगान् ॥20॥
देख पां गा किरीटी । आश्रमधर्माचिया राहाटी । विधिमार्गा कसवटी । जे आपणचि होती ॥307॥ यजन करितां कौतुकें । तिहीं वेदांचा माथा तुके । क्रिया फळेंसि उभी ठाके । पुढां जयां ॥308॥ ऐसे दीक्षित जे सोमप । जे आपणचि यज्ञाचें स्वरूप । तिंहीं तया पुण्याचेनि नांवें पाप । जोडिले देखें ॥309॥ जे श्रुतित्रयातें जाणोनि । शतवरी यज्ञ करूनि । यजिलिया मातें चुकोनि । स्वर्गु वरिती ॥310॥ जैसें कल्पतरुतळवटीं । बैसोनि झोळिये पाडी गांठी । मग निदैव निघे किरीटी । दैन्यचि करूं ॥311॥ तैसे शतक्रतूं यजिलें मातें । कीं ईप्सिताति स्वर्गसुखांतें । आतां पुण्य कीं हें निरुतें । पाप नोहे ॥312॥ म्हणोनि मजवीण पाविजे स्वर्गु । तो अज्ञानाचा पुण्यमार्गु । ज्ञानिये तयातें उपसर्गु । हानि म्हणती ॥313॥ एऱ्हवीं तरी नरकींचें दुःख । पावोनि स्वर्गा नाम कीं सुख । वांचूनि नित्यानंद गा निर्दोष । तें स्वरुप माझें ॥314॥
हेही वाचा – Dnyaneshwari : आकाशें सर्वत्र वसावें, वायूनें नावभरी उगें नसावें…
अर्थ
आता फार बोलून जे सांगावयाचे ते सर्व एकदाच सांगतो. लक्षात ठेव; तर विनाशी आणि अविनाशी म्हणून जे पदार्थ आहेत ते मीच आहे, असे समज. ॥299॥ म्हणून अर्जुना, जेथे मी नाही, असे कोणते ठिकाण आहे? परंतु या प्राण्यांचे दुर्दैव कसे आहे ते पाहा. मी सर्वव्यापी असूनही, ते मला कोठेही पाहात नाहीत. ॥300॥ लाटा या (जलरूप) असून (त्या) जलाशिवाय (वृक्षादिकांप्रमाणे) सुकून जाव्यात, तसेच प्रकाशरूप जी सूर्य किरणे, त्यांना दिव्याशिवाय दिसू नये, त्याप्रमाणे सर्व प्राणी मद्रूपच असून, त्यास आपण भगवद्रूप आहोत असे वाटत नाही, हे केवढे आश्चर्य आहे, पाहा! ॥301॥ हे सर्व जग आतबाहेर माझ्याच रूपाने कोंदून भरले आहे. जग हे केवळ माझेच ओतलेले आहे; परंतु प्राण्यांचे कर्म त्यांच्यावर कसे ओढवले आहे की, ते मीच (देवच) नाही, असे म्हणतात! ॥302॥ परंतु, अमृताच्या आडात पडावे आणि आपण आपल्याला काठावर का काढावे? परंतु, ते ज्याला अप्राप्त आहे, अशाला असेच होते, त्याला काय करावे? ॥303॥ अर्जुना, एका घासभर अन्नाकरिता एक आंधळा रस्त्याने धावत असता चितामणी रत्नाला ठेच लागून अडखळला; (पण) तो आंधळा होता, म्हणून त्याने तो चिंतामणी लाथेने उडविला. ॥304॥ त्याप्रमाणे जेव्हा जीवाला ज्ञान सोडून जाते, त्यावेळी जीवाची वरील आंधळ्यासारखी अवस्था होते. म्हणून जे काही ज्ञानाशिवाय करावे, ते केल्यासारखे होत नाही. ॥305॥ आंधळ्याला जरी गरुडाचे पंख असले, तरी त्याला ते कोणत्या उपयोगा पडतील? त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय सत्कर्माचरणाचे श्रम केले असता व्यर्थ जातात. ॥306॥
तीन वेद जाणणारे, (यज्ञामध्ये) सोमपान करणारे (व तेणेकरून) पाप नष्ट झालेले याज्ञिक, हे यज्ञांनी माझे यजन करून स्वर्गगती मागतात; पुण्याचे फल असा जो देवेंद्राचा लोक, तो प्राप्त करून, ते या स्वर्गलोकी दिव्य असे देवांचे भोग भोगतात. ॥20॥
अरे अर्जुना, आश्रमधर्माच्या आचरणाने विहित मार्गाला जे आपणच कसोटी होतात (ज्यांच्या आचरणावरून वागण्याचा विधि कळतो). ॥307॥ ते सहज लीलेने यज्ञ करावयास लागले असता, तिन्ही वेद आपली मान डोलवितात आणि ज्यांच्यापुढे ती यज्ञक्रिया आपल्या फलासह मूर्तिमंत येऊन उभी राहाते. ॥308॥ याप्रमाणे जे यज्ञात सोमरसाचे पान करणारे यज्ञकर्ते आहेत आणि जे आपण स्वतःच यज्ञमूर्ती झाले आहेत, त्यांनी यज्ञापासून होणाऱ्या त्या पुण्याच्या नावाने वास्तविक पापांचा लाभ पदरात पाडून घेतला, असे समज. ॥309॥ कारण की, त्यांनी ऋग्वेदादी तिन्हीं वेदांना जाणून, शंभरापर्यंत यज्ञ करून, माझे आराधन करून मला अजिबात विसरून ते स्वर्गच पसंत करतात. ॥310॥ कल्पवृक्षाच्या खाली बसून अभागी पुरुष भीक मागण्याच्या झोळीला गाठी मारतो आणि मग अर्जुना, तो अभागी पुरुष ज्याप्रमाणे भीक मागावयासच निघतो, ॥311॥ त्याप्रमाणे शंभर यज्ञ करून त्यांनी माझे आराधन केले आणि मग ते स्वर्गातील सुखांची इच्छा करू लागले. आता हे पुण्य आहे का? (तर) खरोखर हे पाप नव्हे काय? ॥312॥ म्हणून माझी प्राप्ती करून न घेता, स्वर्गाची प्राप्ती करून घेणे हा अज्ञानी लोकांचा पुण्यमार्ग आहे. ज्ञानी लोक या मार्गाला विघ्न आणि नाश करणारा म्हणतात. ॥313॥ एरवी नरकाच्या दुःखाकडे दृष्टी देऊन स्वर्गाला सुख हे नाव आले आहे; वास्तविक पाहिले असता अर्जुना, निर्दोष असा जो त्रिकालाबाधित आनंद, ते माझे स्वरूप आहे. ॥314॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : मीचि गा पांडवा, या त्रिभुवनासि वोलावा…


