रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… ‘फूड कॉर्नर’मध्ये पालक किंवा मेथी पराठे तसेच कोबी, नवलकोल, दुधी भोपळ्याची थालिपीठ भाजी करण्यासंदर्भात दिलेल्या या टिप्स वापरून पाहा.
- दोडकी (शिराळी) काही वेळा कडू निघण्याचा संभव असतो. ती चाखूनच भाजी करावी लागते. अशा वेळी त्याच्या देठासह भाजी केल्यास कडू लागत नाही.
- टोमॅटोचे सूप बनवण्याच्या वेळेस टोमॅटो उकडून नंतर मिक्सरमध्ये फिरवताना त्यात ब्रेडचे एक-दोन स्लाइस टाकून मिक्स करणे, त्यामुळे सूप जाड होईल आणि टेस्ट (स्वाद) पण चांगली येईल.
- कोबी आणि फ्लॉवर चिरून झाल्यावर भाजी करतेवेळी गरम पाण्याने धुऊन घ्यावेत. कोबीचा थोडा उग्र वास असतो, तो निघून जातो आणि फ्लॉवरमध्ये न दिसणाऱ्या बारीक अळ्या निघून जातात. भाज्यांना चवही चांगली येते.
हेही वाचा – Kitchen Tips : कोबीची भाजी, मसालेभात, पालक-पनीर बनवताना हे करून पाहा…
- मेथी, पालकाचे पराठे करताना निम्मी कच्ची जुडी, त्यात सात-आठ पाकळ्या लसूण, मिरची, एक कांदा चिरून घालावा आणि सगळे मिक्सरमधून काढून घ्यावे. तर, उरलेली जुडी बारीक चिरावी आणि दोन्ही एकत्र करून कणीक भिजवावी. पराठ्यांना छान हिरवा रंग येतो आणि चवही छान लागते.
- भाजीसाठी वांगी घेताना त्याची डेखे न फेकता सुकवून ठेवावीत. सांबार अगर रसम् करताना घरात वांगे नसेल तर सांबार उकळताना त्यात 4-5 वांग्याची डेखे उकळीत टाकल्यास सुरेख स्वाद येतो.
- कोबी, नवलकोल, दुधी भोपळा, लाल भोपळा, मुळा अशा ‘नावडत्या’ भाज्या किसून त्यांची थालिपीठ भाजणी पेरून भाजी करावी. उपयुक्त अन्नघटक असलेली ही भाजी थालिपिठाच्या आवडीने खाल्ली जाते.
हेही वाचा – Kitchen Tips : पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स
- बहुतेक वेळा कांदा चिरताना कांदे तिखट असल्यामुळे डोळ्यांतून गंगा-जमुना सारख्या वाहात असतात. तेव्हा ‘नको हा कांदा’ असे वाटायला लागते. परंतु कांद्याशिवाय कशालाही चव लागत नाही. त्यावर उपाय म्हणून कांद्याच्या वरची साल काढून त्याचे दोन-दोन भाग करून एका बंद प्लॅस्टिक डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी तो कांदा चिरायला घ्यावा. अजिबात तिखटपणा जाणवत नाही आणि डोळ्यांतून पाणीही येत नाही. शिवाय, कांदे एकदम सोलून ठेवल्यामुळे गडबडीच्या वेळेस फ्रीजमधून कांदा काढून पटकन चिरता येतो आणि वेळेची बचत होते.
- फणस कच्चा चिरण्यापेक्षा सालासकट दोन-तीन तुकडे करून कुकरमध्ये डाळभाताबरोबर उकडावा. नंतर साले काढून बारीक चिरावा.
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


