सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
पैं स्थूलदृष्टी देखती मातें । तेंचि न देखणें जाण निरुतें । जैसें स्वप्नींचेनि अमृतें । अमरा नोहिजे ॥144॥ एऱ्हवीं स्थूलदृष्टी मूढ । मातें जाणती कीर दृढ । परि तें जाणणेंचि जाणणेया आड । रिगोनि ठाके ॥145॥ जैसा नक्षत्राचिया आभासा- । साठीं घातु झाला तया हंसा । माजीं रत्नबुद्धीचिया आशा । रिगोनियां ॥146॥ सांगे गंगा या बुद्धी मृगजळ । ठाकोनि आलियाचें कवण फळ । काय सुरतरु म्हणोनि बाबुळ । सेविली करी ॥147॥ हा निळयाचा दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा । कां रत्ने म्हणोनि गारा । वेंची जेविं ॥148॥ अथवा निधान हें प्रगटलें । म्हणोनि खदिरांगार खोळे भरिले । कां साउली नेणतां घातलें । कुहां सिंहें ॥149॥ तेविं मी म्हणोनि प्रपंचीं । जिहीं बुडी दिधली कृतनिश्चयाची । तिहीं चंद्रासाठीं जेविं जळींची । प्रतिमा धरिली ॥150॥ तैसा कृतनिश्चय वायां गेला । जैसा कोण्ही एकु कांजी प्याला । मग परिणाम पाहों लागला । अमृताचा ॥151॥ तैसें स्थूलाकारीं नाशिवंते । भरंवसा बांधोनि चित्तें । पाहती मज अविनाशातें । तरी कैंचा दिसें ॥152॥ काइ पश्चिमसमुद्राचिया तटा । निघिजत आहे पूर्विलिया वाटा । कां कोंडा कांडतां सुभटा । कणु आतुडे ॥153॥ तैसें विकारलें हें स्थूळ । जाणितलेया मी जाणवतसें केवळ । काइ फेण पितां जळ । सेविलें होय ॥154॥ म्हणोनि मोहिलेनि मनोधर्में । हेंचि मी मानूनि संभ्रमें । मग येथिचीं जियें जन्मकर्में । तियें मजचि म्हणती ॥155॥ येतुलेनि अनामा नाम । मज अक्रियासि कर्म । विदेहासि देहधर्म । आरोपिती ॥156॥
हेही वाचा – Dnyaneshwari : दीपु ठेविला परिवरीं, कवणातें नियमी ना निवारी…
अर्थ
ज्याप्रमाणे स्वप्नातील (सेवन केलेल्या) अमृताने अमर होता येत नाही (कारण ते पिऊनही न प्यायल्याप्रमाणे आहे), त्याप्रमाणे मी देहधारी आहे, अशी बुद्धी ठेऊन जे माझ्याकडे पाहतात, त्यांचे ते पहाणे खरोखर न पाहण्यात जमा आहे, असे समज. ॥144॥ एरवी मी स्थूल आहे, अशा दृष्टीने माझ्याकडे पाहणारे जे मूर्ख लोक, ते आपल्या समजुतीप्रमाणे खरोखरी पूर्णपणे जाणतात; परंतु त्यांचे ते जाणणेच माझ्या स्वरूपाच्या खऱ्या ज्ञानाच्या आड येते. ॥145॥ ज्याप्रमाणे पाण्यातील नक्षत्रांच्या प्रतिबिंबाला पाहून ती रत्ने आहेत, अशा समजुतीने त्याविषयी लोभ धरून आणि पाण्यात शिरून (ती खाण्याच्या आशेने पाण्यातील खडकावर चोच आपटून) जसा एखाद्या हंसाने आपला घात करावा. ॥146॥ अर्जुना सांग, ही गंगा आहे, अशा समजुतीने मृगजळाजवळ येऊन पोहोचलो तर, त्याचे फळ काय? अथवा कल्पवृक्ष म्हणून बाभळीचा आश्रय केला तर, ती बाभळ इच्छिलेले फळ देईल काय? ॥147॥ हा नीलमण्यांचा दोन पदरी हार आहे, या बुद्धीने तो घेण्याकरिता सापाला उचलून घेण्यास तयार व्हावे अथवा ही रत्ने आहेत अशा समजुतीने जशा गारगोट्या वेचाव्यात, ॥148॥ किंवा द्रव्याचा ठेवाच प्रगट झाला आहे, असे समजून खैराचे निखारे आपल्या पदरात भरावेत अथवा ही आपली पडछाया आहे, असे न समजता सिंहाने विहिरीत उडी घालावी, ॥149॥ त्याप्रमाणे ज्यांनी मी परमात्मा देहधारी आहे, असा आपल्या बुद्धीमध्ये कृतनिश्चय केला, त्यांनी खरा चंद्र म्हणून पाण्यातील प्रतिबिंब घेतल्यासारखे आहे. ॥150॥ तसा परमात्मा देहधारी आहे, असा त्यांचा ठाम निश्चय व्यर्थ गेला, (हे कसे झाले?) तर ज्याप्रमाणे कोणी एखाद्याने भाताची पेज पिऊन मग अमृताचा परिणाम पाहावा (त्याप्रमाणे). ॥151॥ तसे नाशिवंत जो स्थूल आकार तेच माझे खरे स्वरूप, असा आपल्या मनामध्ये निश्चय करून ते जर मला अविनाशाला पाहू जातील तर, त्यांना मी कसा दिसेन? ॥152॥ अर्जुना, पूर्वेच्या मार्गाला निघून कोणाला पश्चिम समुद्राच्या किनार्यास पोहोचता येईल काय? अथवा अर्जुना, कोंडा कांडून त्यापासून दाणे प्राप्त होतील काय? ॥153॥ त्याप्रमाणे आकाराला आलेले हे शरीर, हेच मी, असे मला जाणले असता, माझे केवळ (खरे) स्वरूप जाणले जाईल काय? फेस प्यायल्याने पाणी प्यायल्यासारखे होईल काय? ॥154॥ म्हणून मोहित झालेल्या मनोवृत्तीने हे स्थूल शरीरच मी (परमात्मा) आहे असे मानून, मग या देहाची जी जन्मादि कर्मे, ती ते माझ्यावर लादतात. ॥155॥ यामुळे नाव नसलेल्या मला ते नाव देतात. वस्तुत:, मी क्रियाशून्य असून मी क्रिया करतो, असे म्हणतात आणि देहादी मर्यादेने रहित असलेल्या मला जन्ममरणादिक जे देहधर्म, त्यांचा संबंध लावतात. ॥156॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : एऱ्हवीं अनुमानाचेनि पैसें, आवडे कीर कळलें ऐसें…


