Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : मुडाहूनि बीज काढिलें, मग निर्वाळलिये भूमी पेरिलें…

Dnyaneshwari : मुडाहूनि बीज काढिलें, मग निर्वाळलिये भूमी पेरिलें…

सार्थ ज्ञानेश्वरी

अध्याय नववा

श्री भगवानुवाच : इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे । ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥1॥

नातरि अर्जुना हें बीज । पुढती सांगिजेल तुज । जें हें अंतःकरणींचें गुज । जीवचिये ॥34॥ येणें मानें जीवाचें हियें फोडावें । मग गुज कां पां मज सांगावें । ऐसें कांहीं स्वभावें । कल्पिशी जरी ॥35॥ तरी परियेसीं प्राज्ञा । तूं आस्थेचीच संज्ञा । बोलिलिये गोष्टींची अवज्ञा । नेणसी करुं ॥36॥ म्हणोनि गूढपण आपुलें मोडो । वरि न बोलावेंही बोलावें घडो । परि आमुचिचे जीवींचें पडो । तुझां जीवीं ॥37॥ अगा थानीं कीर दूध गूढ । परि थानासीचि नव्हे कीं गोड । म्हणोनि सरो कां सेवितयाची चाड । जरी अनन्य मिळे ॥38॥ मुडाहूनि बीज काढिलें । मग निर्वाळलिये भूमी पेरिलें । तरि तें सांडीविखुरीं गेलें । म्हणों ये कायी ॥39॥ यालागीं सुमनु आणि शुद्धमती । जो अनिंदकु अनन्यगती । पैं गा गौप्यही परी तयाप्रती । चावळिजे सुखें ॥40॥ तरि प्रस्तुत आतां गुणीं इहीं । तूं वांचूनि आणिक नाहीं । म्हणोनि गुज तरी तुझां ठायीं । लपवूं नये ॥41॥ आतां किती नावानावा गुज । म्हणतां कानडें वाटेल तुज । तरि ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेंसी ॥42॥ परि तेंचि ऐसेनि निवाडें । जैसें भेसळलें खरें कुडें । मग काढिजे फाडोवाडें । पारखूनियां ॥43॥ कां चांचूचेनि सांडसें । खांडिजे पय पाणी राजहंसें । तुज ज्ञान विज्ञान तैसें । वांटूनि देऊं ॥44॥ मग वारयाचियां धारसां । पडिला कोंडा कां नुरेचि जैसा । आणि अन्नकणाचा आपैसा । राशि जोडे ॥45॥ तैसें जें जाणितलेयासाठीं । संसार संसाराचिये गांठी । लाऊनि बैसवी पाटीं । मोक्षश्रियेचां ॥46॥

हेही वाचा – Dnyaneshwari : बाळक बापाचिये ताटीं रिगे, रिगौनि बापातेंच जेवऊं लागे…

अर्थ

श्रीकृष्ण म्हणाले, आतां अत्यंत गुह्य असे हे (ब्रह्माचे) ज्ञान, प्रपंचज्ञानासह, असूयारहित अशा तुला सांगतो. हे जाणल्याने तू अशुभ संसारापासून मुक्त होशील. ॥1॥

अथवा अर्जुना, हेच वर्म, जे माझ्या अंत:करणातील जीवाची गोष्ट आहे, ती तुला पुन्हा सांगतो. ॥34॥ एवढी जीवाच्या आतली गोष्ट बाहेर काढून, मग ती गुप्त गोष्ट मला का सांगावी, अशी काही कल्पना तुझ्या मनात सहज जर आली असेल, ॥35॥ तर बुद्धिमान अर्जुना, ऐक. तू ज्ञानप्राप्तीच्या तीव्र इच्छेचीच खूण (मूर्ती) आहेस आणि त्याचप्रमाणे सांगितलेल्या गोष्टीचा अनादर करणे तुला माहीत नाही. ॥36॥ म्हणून आमचे गुप्तपण मोडले तर मोडो! शिवाय न बोलण्याची (अशी) जी गोष्ट तीही बोलली जावो! पण आमच्या अंत:करणातील गुप्त गोष्ट तुझ्या मनात उतरो. ॥37॥ बा अर्जुना, स्तनात खरोखर दूध गुप्त असते, पण त्याची गोडी स्तनास नसते. याकरिता एकनिष्ठ सेवन करणारा (आपले लेकरू) जर प्राप्त झाला तर त्या सेवन करणाऱ्याची इच्छा स्तनपान करून तृप्त होईना का! ॥38॥ कणगीतून बी काढले आणि मग ते निर्मळ केलेल्या जमिनीत पेरले तर ते सांडण्या-लवंडण्यात गेले असे म्हणता येईल काय? ॥39॥ याकरिता चांगल्या मनाचा तसेच शुद्ध बुद्धीचा आणि निंदा न करणारा तसेच एकनिष्ठ असा श्रोता जर मिळाला तर त्यास आपली गोष्ट गुह्य (गुप्त) असली तरी खुशाल सांगावी. ॥40॥ तर आता सध्या या गुणांनी युक्त तुझ्यावाचून दुसरा कोणी दिसत नाही, म्हणून जरी गुह्य गोष्ट असली तरी, तुझ्या ठिकाणी ती लपवून ठेवता येत नाही. ॥41॥ आता वारंवार ‘गुह्य, गुह्य’ असे म्हटले असता तुला चमत्कारिक वाटेल. तर आता तुला सहजच प्रपंचज्ञानासहित आत्मज्ञान सांगेन. ॥42॥ परंतु जसे खरेखोटे एकत्र मिसळले असता, ते परीक्षा करून निरनिराळे काढावे, त्याप्रमाणे निवाडा करून (स्पष्टतेने) ज्ञानविज्ञान (तुला) सांगेन. ॥43॥ अथवा ज्याप्रमाणे राजहंसाने आपल्या चोचीच्या चिमट्याने एकत्र मिसळलेले दूध आणि पाणी वेगळे करावे, त्याप्रमाणे तुला ज्ञान आणि विज्ञान हे स्वच्छ वेगवेगळे सांगू. ॥44॥ मळणी करून एकत्र मिसळलेले कण आणि भूस वार्‍याच्या धारेवर उफणले असता, मग जसा कोंडा उडून जाऊन धान्याची आपोआप रास जमते, ॥45॥ त्याप्रमाणे जे ज्ञान जाणल्यामुळे, ते ज्ञान संसार संसाराच्या गाठी लावून (अनात्मतत्वाचे धर्म, अनात्मतत्वाच्या ठिकाणी ठेवून) मोक्षरूपी लक्ष्मीच्या पटावर (जाणणाऱ्यास) बसवते. ॥46॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : अहो चंद्रकांतु द्रवता करि होये, परि ते हातवटी चंद्री कीं आहे

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!