Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : मग तया सुखाची किरीटी, करूनियां गा पाउटी…

Dnyaneshwari : मग तया सुखाची किरीटी, करूनियां गा पाउटी…

अध्याय आठवा

वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् । अत्येति तत् सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥28॥

जरी वेदाध्ययनाचें जालें । अथवा यज्ञाचें शेतचि पिकलें । कां तपोदानांचें जोडलें । सर्वस्व हन जें ॥261॥
तया आघवियांचि पुण्याचा मळा । भारु आंतौनि जया ये फळा । जें परब्रह्मा निर्मळा । सांठी न सरे ॥262॥ जें नित्यानंदाचेनि मानें । उपमेचां कांटाळां न दिसे सानें । पाहा पां वेदयज्ञादि साधनें । जया सुखा ॥263॥ जें विटे ना सरे । भोगितयाचेनि पवाडें पुरे । पुढती महासुखाचें सोयरें । भावंडचि ॥264॥ ऐसें दृष्टीचेनि सुखपणें । जयासी अदृष्टाचें बैसणें । जें शतमखींहि आंगवणें । नोहेंचि एका ॥265॥ तयातें योगीश्वर अलौकिकें । दिठीचेनि हाततुकें । अनुमानिती कौतुकें । तंव हळुवट आवडे ॥266॥ मग तया सुखाची किरीटी । करूनियां गा पाउटी । परब्रह्माचिये पाठीं । आरूढती ॥267॥ ऐसें चराचरैकभाग्य । जें ब्रह्मेशां आराधनायोग्य । योगियांचे भोग्य । भोगधन जें ॥268॥ जो सकळ कळांची कळा । जो परमानंदाचा पुतळा । जो जिवाचा जिव्हाळा । विश्वाचिया ॥269॥ जो सवर्ज्ञतेचा वोलावा । जो यादवकुळींचा कुळदिवा । तो कृष्ण जी पांडवा- । प्रती बोलिला ॥270॥ ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतु । संजयो रायासी असे सांगतु । तेचि परियसा पुढां मातु । ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ॥271॥

॥ आठवा अध्याय समाप्त ॥

हेही वाचा – Dnyaneshwari : जो विष अमृत वोळखे, तो अमृत काय सांडू शके…

अर्थ

वेदाध्यन, यज्ञ, तपश्चर्या अथवा दान यामध्ये जे जे पुण्यकारक फल सांगितले आहे, त्या सर्व फलांहून अधिक फल हे (जीव ब्रह्म यांचे ऐक्यरूपी ज्ञान) आहे, हे जाणून योगी त्यात (वरील वेदाध्ययनादिकांच्या मार्गाने प्राप्त होणारी स्वर्गसुखासारखी फले त्यास) मागे टाकून अत्यंत श्रेष्ठ अशा स्थानाप्रत जातो. ॥28॥

जरी वेदाच्या अध्ययनाने मिळणारे पुण्य प्राप्त झाले अथवा यज्ञरूप शेतच पिकले किंवा तपाचे अथवा दानाचे असलेले सर्वस्व पुण्य मिळाले ॥261॥ (तरी) त्या सर्वच पुण्याच्या मळ्याला पुष्कळ पीक येऊन जे फळ येते, ते फळ नित्य शुद्ध परमात्म्याच्या तुलनेला येत नाही. ॥262॥ जे स्वर्गसुख, नित्यानंदाच्या मानाने उपमेच्या ताजव्यात घालून पाहिले असता लहान दिसत नाही, पाहा की, ज्या सुखाच्या प्राप्तीकरता वेदयज्ञादि साधने आहेत ॥263॥ जे (स्वर्गसुख) विटत नाही आणि संपत नाही, भोगणार्‍याच्या इच्छा पुरविते आणि शिवाय जे स्वर्गसुख ब्रह्मसुखाचे धाकटे भावंडच आहे ॥264॥ अशा तर्‍हेचे दिसण्यातच जे सुख आहे आणि ज्याला अदृष्टाचा (संस्काररुपाने असलेल्या धर्माचा) आधार आहे आणि जे शंभर यज्ञ करून देखील कित्येकांना साध्य होत नाहीच. ॥265॥ त्या स्वर्गसुखाला योगेश्वर (आपल्या) लोकोत्तर विचारदृष्टिरूपी हातावर लीलेनेच वजन करून त्या स्वर्गसुखाच्या योग्यतेचे अनुमान करतात, तो ते त्यास अगदीच हलके दिसून येते. ॥266॥ अर्जुना, मग ते योगेश्वर त्या स्वर्गसुखाची पायरी करून परब्रह्माच्या पटावर बसतात. ॥267॥ याप्रमाणे स्थावरजंगमात्मक जगाचे जे एक भाग्य, जे ब्रह्मदेव आणि शंकर यांनाही आराधना करण्यास योग्य आणि जे योग्यांना भोगण्याला योग्य, असे भोगरूपी ऐश्वर्य आहे, ॥268॥ जो (परमात्मा) सर्व कळांची कळा आहे, जो परमानंदाची मूर्ती आहे आणि जो विश्वाच्या जीवाचा जिव्हाळा आहे. ॥269॥ जो परमात्मा सर्वज्ञतेचे जीवन आहे, जो यादवांच्या कुलाचा कुलदीप आहे, असा श्रीकृष्ण अर्जुनास असे बोलला. ॥270॥ अशी ही कुरुक्षेत्रावरील हकीकत संजय, राजा धृतराष्ट्राला सांगत होता. तीच गोष्ट पुढे तुम्ही ऐका, असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ॥271॥

॥ आठवा अध्याय समाप्त ॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : याकारणें पंडुसुता, तुवां होआवें योगयुक्ता…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!