अध्याय आठवा
पैं वेदाचें बहुवसपण । देखेचिना जयाचें आंगण । हें गगनाचें पांघरूण । होय देखा ॥190॥ ऐसें जाणूनि योगीश्वर । जयातें म्हणती परमपर । जें अनन्यगतीचें घर । गिंवसीत ये ॥191॥ जें तनूवाचाचित्तें । नाइकती दुजिये गोष्टीतें । तयां एकनिष्ठेचें पिकतें । सुक्षेत्र जें ॥192॥ हें त्रैलोक्यचि पुरुषोत्तमु । ऐसा साचु जयांचा मनोधर्मु । तयां आस्तिकांचा आश्रमु । पांडवा गा ॥193॥ जें निगर्वाचें गौरव । जें निर्गुणाची जाणीव । जें सुखाची राणिव । निराशांसी ॥194॥ जें संतोषियां वाढिलें ताट । जें अचिंतां अनाथांचें मायपोट । भक्तीसी उजू वाट । जया गांवा ॥195॥ हें एकैक सांगोनि वाया । काय फार करूं धनंजया । पैं गेलिया जया ठाया । तो ठावोचि होइजे ॥196॥ हिंवाचिया झळुका । जैसें हिंवचि पडे उष्णोदका । कां समोर जालिया अर्का । तमचि प्रकाशु होय ॥197॥ तैसा संसारु जया गांवा । गेला सांता पांडवा । होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाचि ॥198॥ तरि अग्नीमाजीं आलें । जैसें इंधनचि अग्नि जाहालें । पाठीं न निवडेचि कांही केलें । काष्ठपण ॥199॥ नातरी साखरेचा माघौता । बुद्धिमंतपणेंही करितां । परि ऊंस नव्हे पंडुसुता । जियापरी ॥200॥ लोहाचें कनक जहालें । हें एकें परिसें केलें । आतां आणिक कैचें तें गेलें । लोहत्व आणी ॥201॥ म्हणोनि तूप होऊनि माघौतें । जेवीं दूधपणा न येचि निरुतें । तेवि पावोनियां जयातें । पुनरावृत्ति नाहीं ॥202॥ तें माझें परम । साचोकारें निजधाम । हें आंतुवट तुज वर्म । दाविजत असें ॥203॥
हेही वाचा – Dnyaneshwari : एऱ्हवीं त्रैलोक्य हें धनुर्धरा, तिये गांवींचा गा पसारा…
अर्थ
चारी वेदांचा विस्तार त्या परमात्म्याचे अंगणही पाहू शकत नाही. हे चैतन्य आकाशाचे(ही) पांघरुण आहे. ॥190॥ वर सांगितल्याप्रमाणे या पुरुषांचे स्वरूप आहे, असे जाणून श्रेष्ठ योगी ज्याला (पुरुषाला) सर्वात पलीकडची गती असे म्हणतात आणि जो परमात्मा एकनिष्ठ भक्ताचे घर शोधित येतो. ॥191॥ जे कायावाचामनाने परमात्म्यावाचून दुसरी गोष्टच ऐकत नाहीत, त्य़ा एकनिष्ठांच्या एकनिष्ठतेचे पीक देणारे जे चांगले शेत आहे, ॥192॥ हे त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे, अशी ज्यांची पक्की समजूत आहे, त्या आस्तिकांचे अर्जुना, जे (परमात्मस्वरूप) राहण्याचे ठिकाण आहे ॥193॥ जे गर्वरहित पुरुषांचे मोठेपण आहे, जे गुणातीत पुरुषांचे ज्ञान आहे आणि निरिच्छ पुरुषांस जे सुखाचे राज्य आहे, ॥194॥ जे संतोषी पुरुषांस वाढलेले ताट आहे, जे संसाराची चिंता न करणारे असून ज्यांना माझ्यावाचून दुसरा कोणी मालक नाही, अशा भक्तांचे मायपोट आहे आणि ज्या गावाला पोहोचण्याला भक्ति हीच रसाळ वाट आहे. ॥195॥ अर्जुना हे एकेक सांगून व्यर्थ विस्तार कशाला करू? परंतु ज्या ठिकाणी गेले असता, ते ठिकाणच आपण होतो. ॥196॥ थंडीच्या झुळुकांनी जसे ऊन-पाणीच थंड होते अथवा सूर्यासमोर अंधार आला असता, तो अंधारच प्रकाश होतो, ॥197॥ अर्जुना, त्याप्रमाणे ज्या परमात्मस्वरूपी मुक्कामाला हा (दु:खरूप देहबुद्ध्यादिसंघातरूप्) संसार पोहोचला असता, तो संसार सर्व बाजूंनी मोक्षच (दु:खशून्य आणि सुखरूप असा) होऊन राहातो. ॥198॥ तरी ज्याप्रमाणे लाकूड अग्नीत गेले म्हणजे अग्निरूपच होते आणि ते अग्निरूप झाल्यावर पुन्हा लाकडाप्रमाणे निराळे काढू म्हटले तरी ते जसे निराळे निघतच नाही ॥199॥ अथवा उसाची साखर झाल्यावर त्या साखरेचा मूळचा ऊस करण्याचे जरी बुद्धिमान पुरुषाने मनात आणले तरी, पुन्हा ऊस होणे ज्याप्रमाणे शक्य नाही, ॥200॥ परिसाने लोखंडाचे सोने केले, आता आणिक दुसरा पदार्थ कोठे आहे की, जो नाहीसे झालेले लोखंड पुन्हा आणील? ॥201॥ म्हणून ज्याप्रमाणे दुधाचे तूप झाल्यावर पुन्हा तुपाला दूधपणा खात्रीने येत नाही, त्याप्रमाणे ज्या परमात्मस्वरूपास पावल्यावर पुनर्जन्म नाही. ॥202॥ असे जे स्वरूप, ते माझे स्वत:चे खरोखर श्रेष्ठ ठिकाण आहे, ही अंतरंगातील गुप्तगोष्ट तुला दाखवीत आहे. ॥203॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : पाहें पां तरंग होत जात, परि तेथ उदक तें अखंड असत…
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


