स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये मसाला वांगी, फ्लॉवरची भाजी, पातळ पालेभाजी करताना या टिप्स वापरून पाहा.
- पालेभाज्या पातळ करावयाच्या असतील तर मिक्सरमधून काढून पीठ लावून फोडणीस टाकल्यास त्यातील जीवनसत्त्वे कमी होत नाहीत आणि पाच मिनिटांत भाजी तयार होऊन इंधन वाचते.
- सर्व भाज्यांना सरसकट मोहरीची फोडणी देऊ नये. वेगवेगळ्या भाज्यांना वेगवेगळ्या फोडण्या द्याव्यात. उदा : फरसबीला तीळ आणि जिऱ्याची फोडणी द्यावी. कढीच्या फोडणीत लवंग, दालचिनी घालावी.
- मंडईत मधून मधून पालेभाज्या भरपूर येतात. यातील मेथी, हरभरासारख्या भाज्या नीट निवडून उन्हात अगर सावलीत वाळवून ठेवल्या असता हंगाम नसताना त्यांचा उपयोग होऊ शकतो.
हेही वाचा – Kitchen Tips : बटाटा वेफर्स, ब्रेडरोल अन् दहिवडे करताना या टिप्स वापरा
- पालेभाज्यांप्रमाणेच गवार, वाल, डिंगऱ्या याही निवडून, वाळवून ठेवता येतात. त्यांचाही उपयोग नंतर चांगला होतो.
- भेंडीची भाजी करताना ती बुळबुळीत होऊ नये म्हणून फोडणी करताना तेलात एक आमसूल टाका. भाजीला तार येत नाही. एक चमचा दाण्याचे कूट टाका. भाजी मोकळी, कुरकुरीत, खमंग होते.
- बटाटा, वांगी, भाजी अथवा उसळी बऱ्याच उरलेल्या असल्यास उसळीत कणीक, थोडे डाळीचे अथवा उडदाचे पीठ, लसूण-मिरची बारीक वाटून चवीला मीठ घालावे. सरसरीत पिठाचे डोसे करून सॉस, लोण्याबरोबर वाढावेत. मुलांना नक्कीच आवडतील.
- फ्लॉवरची भाजी करताना, त्याचे मोठमोठे तुकडे करावेत आणि ते तेलात तळून घ्यावेत. त्यामुळे फ्लॉवरची फुले गळून पडत नाहीत. ती अख्खी, तशीच्या तशीच राहतात आणि भाजीला चांगला स्वाद येतो.
हेही वाचा – Kitchen Tips : सुरळीच्या वड्या, खमंग कांदा भजी, स्वादिष्ट दहिवडे…
- शेपूची भाजी फारच चरबट असते. म्हणून त्यात भोपळ्याची दोन पाने चिरून घालावीत म्हणजे शेपूची भाजी मऊ आणि रुचकर लागते.
- मसाला वांगी करताना प्रथम वांगी थोड्या तेलात परतून एका भांड्यात ठेवावीत आणि त्यात पाणी न घालता कुकरमध्ये एका वाफेवर शिजवून घ्यावीत. नंतर शिजल्यावर त्यात चिरून मसाला भरून तेलात परतावीत. ती चवदार लागतात आणि वांगी सुकी झाल्याने प्रवासात नेण्यास पण चांगली होतात.
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


