स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये भेंडीच्या बियांची चटणी, ग्रीन ग्रेव्ही भाजी, खुसखुशीत कटलेट अन् पडवळाची कोशिंबीर करताना या टिप्स वापरून पाहा.
- व्हेज कटलेट करताना शिजवलेल्या भाज्यांचे मिश्रण बरेच वेळा सैलसर होते, ज्यामुळे कटलेटचा आकार नीट होत नाही. अशा वेळी पोहे भाजून मिक्सरमध्ये त्याची रवाळ पूड करून आवश्यक त्या प्रमाणात भाज्यांच्या मिश्रणात घालावी, म्हणजे आकार व्यवस्थित होऊन कटलेटही खुसखुशीत होतात.
- कांद्याला मोड आल्यास ते सँडविच, चटणी, कोशिंबीर, सूप, सॅलेडमध्ये वापरावे, वेगळा स्वाद येतो.
- टोमॅटो सूप करताना बीटचा तुकडा टाकला, तर सूपला चांगला लाल रंग येतो.
हेही वाचा – Kitchen Tips : पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स
- चटणीचा रंग हिरवागार हवा असल्यास वाटताना पालकाची पाने घाला. त्यामुळे कोथिंबीर अगदी थोडी पुरते (स्वादापुरती); रंग मात्र आकर्षक येतो.
- भेंडी आणल्यावर पुष्कळ वेळा जून भेंडी त्यात असतात. त्या फेकून न देता, त्यातील बिया काढून त्या अर्धा चमचा तेलावर परताव्यात आणि पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये जाडसर वाटाव्यात. वाटताना त्यात हिरव्या मिरच्या, मीठ, अर्धा चमचा साखर घालावी. त्यात दही घालावे आणि हिंग घालून फोडणी द्यावी. थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालावी. ही चटणी फारच छान लागते. सहा-सात भेंडीतील बिया घेतल्या तरी, त्याची वाटीभर चटणी सहज होईल.
- कधी कधी भाज्यांना खूपच माती लागून येते किंवा काही भाज्या (आलं, कारली वगैरे) ज्यांच्या खाचाखाचांतून माती लागलेली असते. साध्या धुण्याने एकदम स्वच्छ होत नाही. अशा वेळेस त्या भाज्यांना एकदा धुऊन मग उभट भांड्यात, पाण्यात टाकून तुरटी फिरवून थोडा वेळ ठेवावं. सगळी माती तळाशी बसते. पुन्हा एकदा धुऊन वापरायला घ्याव्यात.
- वांग्याच्या भाजीत दाण्याचे कूट नसेल तेव्हा चुरमुरे किंवा चिवडा बारीक करून घालावा. फारच खमंग भाजी होते.
हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड…
- कोणतीही रसभाजी करताना, पालकाची सात-आठ पाने बारीक चिरून थोडे पाणी घालून मिक्सरच्या छोट्या भांड्यात वाटावी आणि भाजीत घालावी, म्हणजे ग्रीन ग्रेव्ही व्हेजिटेबल तयार होते.
- काकडी जेव्हा महाग होते, तेव्हा पडवळ घ्या. तो किसा आणि घट्ट पिळून पाणी काढून टाका, त्यात नेहमीप्रमाणे दाण्याचे कूट, साखर, मीठ, दही, कोथिंबीर घाला. अगदी काकडीच्या कोशिंबिरीसारखी ही कोशिंबीर लागते.
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


