‘मास्तरांची सावली’ हे सुप्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई नारायण सुर्वे यांनी लिहिलेले आत्मचरित्र आहे. शब्दांकन नेहा सावंत यांनी केलं आहे. लहानसंच पुस्तक असलं तरी फार मोठं आयुष्य त्यातून दिसत राहत. अनेक आव्हानांच्या, विपरीत परिस्थितीच्या नजरेला नजर भिडवून अर्थपूर्ण जगलेले हे सहजीवन आहे. कृष्णाबाई एकदा मास्तरांना म्हणजे नारायण सुर्वेंना म्हणाल्या होत्या, ‘तुमच्या सावलीच्या पाठी मी कायम उभी राहीन.’ त्या सावलीसारखी साथ देणाऱ्या सहचारिणी आहेतच, पण अंधारात सावली गडप झाल्यावरसुद्धा पाठ न सोडणारी, खंबीर उभी राहणारी ही पत्नी कृष्णाबाई आहे!
कृष्णाबाई अशिक्षित असल्यामुळे नेहा सावंत यांनी शब्दांकन करून दिले आहे. इतके सहज की, कृष्णाबाई स्वत:च सांगत आहेत, असे वाटते. त्यांचे आईवडील दोघेही, त्या दोन वर्षांच्या असताना गेले. त्यांच्या वडिलांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला. दारू पिणारे तीन-चार काका, काकू, त्यांची मुले आणि एक माघारी आलेली आत्या असे त्यांचे कुटुंब होते. आजीने मायेची पाखरण केली. पण डोळस माया केली. त्यांना शिक्षणाची गोडी नव्हती. आजीने सर्व घरकाम शिकवून, दुसऱ्या घरी काम करायला लावून अर्थार्जन करायला लावले आणि स्वत:च्या पायावर उभे राहायला शिकवले.
कृष्णाबाईचे पती नारायण सुर्वे अनाथ होते. गंगाराम सुर्वेंना ते कचराकुंडीजवळ सापडले होते. त्यांनी फार प्रेमाने त्यांचा सांभाळ केला. दोघांची घरे जवळ असल्याने येणे-जाणे असल्याने प्रेमबंध जुळले. कृष्णाबाईंनी त्यांना मागणी घातली, तो प्रसंग वाचण्यासारखा आहे. त्या म्हणतात, “प्रेमात इतकी ताकद असते की, अबोल मी चुरूचुरू बोलायला लागले.”
हेही वाचा – Bookshelf : ‘नाच ग घुमा’… लेखिकेला रिंगणाच्या बाहेर पडायचेच नाही!
अत्यंत विपरीत परिस्थितीत घरून विरोध असल्याने पळून जाऊन लग्न केले, तेव्हा सुर्वेंकडे ना नोकरी होती ना घर. पण कृष्णाबाईनी साथ सोडली नाही. अक्षरश: फुटपाथवर दिवस काढले. सुर्वे म्हणतात, झोकपट्टीत शेकावे, तसे आयुष्य छान शेकले. कृष्णाबाईंनी गरिबीचे जे वर्णन केले आहे, ते आपल्या कल्पनेत सुद्धा येऊ शकत नाही. सुर्वेंच्या प्रसिद्ध कवितेतली एक ओळ आहे – ‘भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली…’
बोगद्याच्या चाळीतली खोली साफ करून घेतल्यावर तीन दिवस जेवण गेले नाही. त्यांना प्रसूतीकळा आणि मास्तरांना (नारायण सुर्वे) ताप एकदम आले होते, तेव्हा दोघे एकाच वेळी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये होते. शाळेत शिपायाची नोकरी लागल्यावर त्या मुलाला घेऊन जात असत तेव्हा इन्स्पेक्शनला आलेल्या बाईने रांगत्या बाळाला पायाने दूर सारले होते, ती जखम मनावर कायम राहिली. माणूस मोठा असतो म्हणजे त्याच्याकडे जास्त पैसे असतात का? असा प्रश्न त्या विचारतात.
मास्तर तिसरीपर्यंत शिकलेले होते. कृष्णाबाईनी त्यांना सातवीपर्यंत शिकायला लावून डी.एड.सारखी परीक्षा द्यायला लावून खरोखर मास्तर केले. मास्तरांचे चळवळीचे काम, बाईंची बाळंतपणे, नोकरी, पैशांची चणचण, आजारपणे… सुरू होते. त्यांनी मास्तरांना संसारात अडकून ठेवले नाही. अशिक्षित असूनही स्वत: सगळे व्यवहार सांभाळले. मास्तरांवर जीवापाड प्रेम केले, पण त्यांना सिगरेट, दारूचे व्यसन लागण्याची शक्यता दिसल्यावर चांगलेच खडसावले. त्यांना काही कठीण प्रसंगांत नवऱ्याची साथ मिळाली नाही, पण त्या तक्रारीचा सूर लावत नाहीत. स्वत:च्या मुलाच्या लग्नात त्या शिपायाचा गणवेश असलेली साडी नेसून होत्या. नरहर कुरुंदकरांनी त्यांची ओटी भरून साडी दिली ती आयुष्यातली पहिली नवी साडी!
पुढे मास्तरांचे कवितांचे पुस्तक काढायची वेळ आली, तेव्हा जे थोडे सोने होते ते विकून पाचशे रुपये उभे केले आणि पुस्तक काढले. ‘ऐसा गा मी ब्रह्म’ या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. त्या लिहितात, ‘पुरस्काराचे हजार रुपये आणण्यासाठी मी पिशवी धुवून ठेवली होती.’ त्यांच्या भोळेपणाचे हसू येते, पण आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी चेक पाहिला. मास्तरांना रशियात पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांना कृतकृत्य वाटले. मोठा मुलगा रवी गेल्याच्या अकराव्या दिवशी मास्तरांना पद्मश्री मिळाल्याचे कळले. त्यांनी दु:ख दूर सारून त्यांना समारंभाला पाठवले. तात्यासाहेब शिरवाडकर त्यांना सून मानत. आचार्य अत्रे, शिरीष अत्रे, वासंती मुजुमदार,शांता शेळके, पु.ल. देशपांडे, उत्तम कांबळे वगैरे नामवंत साहित्यिक त्यांच्यापाठी खंबीर उभे राहिले.
संसारिक व्यापाचा ताण वाढल्याने मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाला तोही त्यांनी निसंकोच सांगितला आहे. आपल्या मुलांच्या चुका, व्यसने प्रांजळपणे लिहिली आहेत. माझ्या मुलांचे एकमेकांवर प्रेम नाही, याची खंत त्यांना होती. नातवंडेही त्यांनीच वाढवली. मुलांचे आणि पतीचे कौतुकही केले आहे, पण सौम्य शब्दांत. मास्तरांची प्रतिमा त्यांनी Largrer than life केलेली नसल्यामुळे ते सर्वगुणसंपन्न नायक वगैरे न वाटता अत्यंत बुद्धिमान, सहृदय हाडामासाचा माणूस आहेत, हेच लक्षात राहते.
हेही वाचा – Bookshelf : मनात खोलवर प्रभाव पाडणाऱ्या ‘चौघीजणी’
त्यांना अशिक्षित, थोराड असण्याचा न्यूनगंड असल्याने त्या मास्तरांबरोबर कुठेच सत्कार समारंभांना गेल्या नाहीत. कारण त्यामुळे मास्तरांना कमीपणा येईल, असे वाटत असे. पण खरंच ही स्त्री अशिक्षित होती का? स्वत:चे लग्न लागताना ‘’काळी पोत, कुंकू कशाला हवे?, प्रेम आहे न” म्हणणारी ती, मुलगा गेल्यावर सुनेला मंगळसूत्र काढू नको, कुंकू लाव सांगते ते तिचे मनोधैर्य वाढावे म्हणून! लोक नावे ठेवतात, तेव्हा तिच्या बाजूने उभी राहते. नातवाने ख्रिश्चन मुलीबरोबर लग्न ठरवल्यावर आनंदाने होकार देते. मोठ्या कवीची पत्नी असूनही शिपायाचे काम करताना मुलांची शी-शू धुते, स्वत:कडे चणचण असताना शेजार्याच्या मुलीला वाढवते, तिचे लग्न करून देते आणि सर्वात शेवटी जे मला आश्चर्य चकित करून गेले ते म्हणजे ती म्हणते, “मास्तर माझ्या आधी जायला हवेत. त्यांचे सगळे करून त्यांना आनंदाने निरोप देईन. त्यांना संसारात मी आणले, मीच त्यांचे करीन. त्यांनी दुसर्याच्या दारात उभे राहावे, हे मला आवडणार नाहीत!” किती मोठे मन. हे खरे समर्पण.
हे चरित्र अगदी पारदर्शक आहे. अनाथपण, माहेरी टोमणे, अत्यंत गरिबी, पुरात झोपडी वाहून जाणे, उपास घडणे, मुलाचा- सुनेचा मृत्यू, नातवाचे अपंगत्व, मास्तरांची आजारपणे… अनेक प्रसंग आले, खूप दु:ख झेलले, पण कटुता आली नाही. त्या शेवटी म्हणतात की, “आज आम्ही दोघे कृतार्थ आहोत.” त्या खऱ्या अर्थाने सुसंस्कारित होत्या असेच वाटते. त्यांचे मोठेपण तोलता येईल, असा काटाच उपलब्ध नाही. पतीवर निष्ठा, प्रेम असे की गुण-दोषांसकट त्यांना आपलेसे केले होते. खऱ्या अर्थाने सावली, अंधारात सुद्धा गडप न होणारी! नारायण सुर्वेंकडे जन्मजात प्रतिभा होतीच, पण ती फुलवणाऱ्या कृष्णाबाई होत्या. हे पुस्तक वाचायला हवे, कारण अशीही नि:स्वार्थी, निर्मळ मनाची माणसे या दुनियेत आहेत, असे प्रेम करण्याची ताकद माणसांत आहे, हे समजते आणि माणुसकीवरचा विश्वास दृढ होतो. अशी ही एक विलक्षण प्रेमकहाणी आहे, जी आपल्याला वाचायला मिळाली, हे भाग्यच.


