अध्याय आठवा
आतां इयेचि शरीरग्रामीं । जो शरीरभावातें उपशमी । तो अधियज्ञु एथ गा मी । पंडुकुमरा ॥37॥ येर अधिदैवाधिभूत । तेहि मीचि कीर समस्त । परि पंधरें किडाळा मिळत । काय सांके नोहे ॥38॥ तरि ते पंधरेपण न मैळे । आणि किडाचियाही अंशा न मिळे । परि जंव असे तयाचेनि मेळें । तंव सांकेंचि म्हणिजे ॥39॥ तैसें अधिभूतादि आघवें । हें अविद्येचेनि पालवें । झांकलें तंव मानावें । वेगळें ऐसें ॥40॥ तेचि अविद्येची जवनिक फिटे । आणि भेदभावाची अवघि तुटे । मग म्हणों एक होऊनि जरी आटे । तरी काय दोनी होती ॥41॥ पैं केशांचा गुंडाळा । ठेविली स्फटिकशिळा । ते वरी पाहिली डोळां । तवं भेदिली गमली ॥42॥ पाठीं केश परौते नेले । आणि भेदलेपण काय नेणों जाहालें । तरि डांक देऊनि सांदिलें । शिळेतें काई ॥43॥ ना ते अखंडचि आयती । परि संगें भिन्न गमली होती । ते सारिलिया मागौती । जैसी कां तैसी ।।44॥ तेवी अहंभावो जाय । तरी ऐक्य तें आधींचि आहे । हेंचि साचें जेथ होये । तो अधियज्ञु मी ॥45॥ पैं गा आम्हीं तुज । सकळ यज्ञ कर्मज । सांगितलें कां जें काज । मनी धरूनि ॥46॥ तो हा सकळ जीवांचा विसांवा । नैष्कर्म्यसुखाचा ठेवा । परि उघड करूनि पांडवा । दाविजत असे ॥47॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐशिया आपुलियाची सहजस्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती…
अर्थ
आता याच शरीररूपी गावामध्ये जो शरीरभावाला (देहाहंकारादिकांना) नाहीसे करतो, तो या शरीरातील अधियज्ञ, अर्जुना मी आहे. ॥37॥ इतर अधिदैव, अधिभूत तेही खरोखर मीच आहे. परंतु अस्सल सोने डाकाला मिळाले तर ते हिणकस होत नाही काय? ॥38॥ वास्तविक या सोन्याचा उत्तमपणा मळत नाही आणि ते सोने किडाच्या भागाबरोबर तद्रूप होत नाही, पण जोपर्यंत उत्तम सोने किडाच्या मिलाफाने असते, तोपर्यंत त्याला हिणकसच म्हटले जाते. ॥39॥ त्याप्रमाणे अधिभूत वगैरे हे सर्व जोपर्यंत अविद्येच्या पदराने झाकलेले आहेत, तोपर्यंत वेगळे असे समजावेत. ॥40॥ तोच अविद्येचा पडदा काढला म्हणजे द्वैतभावाची हद्द संपते. मग हे एकमेकांना मिळून तद्रूप झाले असे जर म्हणावे तर, पहिल्याप्रथम ते का दोन होते? ॥41॥ केसांचा गुंडाळा आहे (आणि त्यावर) स्फटिकाची शिळा ठेवली तर, ती वरून डोळ्याने पाहिली असता (फुटलेली) दिसते. ॥42॥ नंतर केस त्या स्फटिक-शिळेपासून दूर काढले, मग त्या शिळेचा फुटकेपणा कोठे गेला, ते कळत नाही. तर डाग देऊन त्या शिळेला जोडले काय? ॥43॥ तर नाही. ती मूळची अखंड होती, तशीच आहे. परंतु केसांच्या संगतीने भंगलेली दिसत होती. ते केस दूर केल्यावर पुन्हा ती मूळची अखंड होती तशीच आहे. ॥44॥ त्याप्रमाणे अहंकार गेला तर ऐक्य मूळचेच आहे. हा प्रकार खरोखर जेथे घडतो, तो अधियज्ञ मी आहे. ॥45॥ अरे, आम्ही जो हेतू मनात धरून सर्व यज्ञकर्मापासून झाले आहेत, असे (चौथ्या अध्यायात) तुला सांगितले ॥46॥ तो हा अधियज्ञ सर्व जीवांचा विसावा आहे आणि नैष्कर्म्य सुखाचा ठेवा आहे. पण तुला तो मी उघड करून दाखवीत आहे. ॥47॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जो परमात्माचि परि दुसरा, जो अहंकारनिद्रा निदसुरा…


