स्नेहा सुतार
भाग – 2
संध्याकाळचे 4:50 वाजले. आजचं सगळं काम तर आवरलंय. आता स्वतःला पण आवरूया म्हणून ती उठली. दुपारपासूनची मीटिंग चांगली झाली. कितीतरी नोट्स झाले मीटिंगमधून. सतत डोकं कामात राहिलं की, बरं असतं. तो थोडावेळ तरी डोक्यातून बाजूला राहतो! अधूनमधून डोकावला तरी पुन्हा कामावर फोकस करता येतो. माणसात असली की, तिला हे जमतं आणि म्हणूनच कदाचित ती माणसात जात नसावी जास्त! तिला सवय झालीये आता त्याच्या विचारात विरघळून जायची. ‘त्याने असं का म्हटलं?’, ‘तो असा का वागला…?’ आणि गम्मत म्हणजे सगळं ठीक असलं त्यांच्यात की, हा त्रास नसतो जाणवत. उलट, आता सगळं बस! हा असाच वागणार, याला माझं काहीच कळत नाही दुखणं, त्यामुळे आता मी याच्याशी बोलून काही उपयोग नाही, असं म्हणून तिने ठरवलेलं असतं… तेव्हा हे जास्तच उफाळून येत असतंय. त्याचे विचार, त्याचं बोलणं, सगळं आठवत बसणं. दिवसभर कापूस पिंजत बसल्यासारखा ती त्याला पिंजत राहाते. तिचा दिवस मग भिजलेल्या कापसागत जड जड जड होत जातो. “ओव्हरथिंकिंग करतेस तू!” बरोबर होतं त्याचं… आहे ती ओव्हरथिंकर… आणि अजून कुणाचा नाही, तर त्याचाच विचार करणारी… तेच नडत होतं तिचं तिला!
सगळं आवरून होईस्तोवर 5 वाजले तशी ती बॅग घेऊन निघाली. सर्वांना हसून बाय केलं. पायऱ्या उतरू लागली, तेव्हा तिला पुन्हा ते स्वप्न आठवलं! उगाच वाटून पण गेलं, तो म्हापशाला राहिला तर नसेल वाट बघत? उगीचच स्वत:चे हे विचार आवरून, स्वतःलाच एक टपलीत देऊन तिने पायऱ्या उतरायला सुरुवात केली. दुसऱ्या मजल्यावरून खाली येईपर्यंत तिने त्याला कितीतरी आठवून घेतलं… आज तिसरा दिवस. फोन, मेसेज काहीच केला नाही मी. त्याने एकदा ‘Hi’ आणि एकदा “बोल” असं लिहून पाठवलं. पण याचा अर्थ काय? हे असं लिहायचं आणि काही आपण मेसेज केला की, एक तास, दोन तास तो तसाच पडून असणार इनबॉक्समध्ये त्याच्या! ना हा ढुंकून बघणार… बघतच नाही तर, रिप्लाय कुठून करणार? 30 सेकंद नसतात याच्याकडे? ‘बोल गं काय म्हणतेयस? काय करतेस? कशी आहेस? मी कामात आहे गं. जरा समजून घे. मी तुझ्याच सोबत आहे. काळजी घे गं.’ एवढं एकदा तिने लिहून बघितलं मोबाईलवर. 30 सेकंदांपेक्षा कमीच वेळ लागला. म्हणजे हा नक्की काय सांगतो कारणं आपल्याला? आणि महत्त्वाचं म्हणजे हा आपल्याला कारणं सांगतो? मला? हे प्रचंड जिव्हारी लागलेलं तिचं दुःख होतं. तो तिला टाळतोय हे त्याहून जिव्हारी लागलेलं दुःख.
ती खाली आली, तेव्हा आताच पाऊस पडून गेलेला वाटत होता. ऑफिसमध्ये वर, आत कुठला पाऊस आणि कुठलं ऊन कळतंय? सगळं एसी एसी एसीच! बाहेर आल्यावर कसं पृथ्वीवर असल्यासारखं… वर ऑफिसच्या आत गेल्यावर कुठल्यातरी स्पेसशीपमध्ये असल्यासारखं. सदानकदा गारठलेलं. ना बाहेरचं काही बघायची फुरसत. खिडक्यांचे पडदे ओढून, ब्लाईंड ओढून काय एवढं महत्त्वाचं खोदकाम चालू असतंय डोक्याचं!
हेही वाचा – स्वप्न : खोल… खोल… न संपणारा जिना!
तिला आता खाली आल्यावर पुन्हा माणसं दिसू लागली असंबद्ध. इकडून तिकडे जाणारी. बिल्डिंगच्या गेटच्या बाजूला असलेला म्हातारा बाबा आज पाय वाकडा टाकून अजूनच दिनवाणी पहुडला होता. कित्येकदा त्याला तिथून हलवलं होतं पण पुन्हा तिथेच हजर. कोण जाणे कुणाची वाट पाहतोय इथेच बसून, की ही जागाच त्याला आवडलीये? काय आहे काय पण जागेत या? खडबडीत पेव्हर्स, एक जाड बुंध्याचं पिवळ्या छोट्या फुलांचं कसलंसं झाड… ज्याचं नाव पण तिला माहीत नाही आणि कधी जाणून घ्यायचा प्रयत्नही तिने केला नाही. या झाडाच्या खोडाशी एका खिळ्याला लावलेली याची फाटकी कसलीशी कापडी पिशवी आणि पाय तसाच वाकडा टाकून पहुडलेला हा! या असल्या परिस्थितीत पण हसतोय, येणाऱ्या जाणाऱ्याकडे बघून! भीक तर हा मागत असलेला कधी दिसला नाही. काय करत असेल हा? घर कुठे असेल याचं? वाकड्या पायाला काय झालं असेल याच्या? पोलिओ की ॲक्सिडेन्ट? आणि या असल्या पोत्यावर पहुडतो कसला आरामात! चेहऱ्यावर ना कसलं दुःख ना कसली परिस्थितीची किचकिच!! अगदी मऊ मऊ गादीवर झोपल्यासारखा आरामात असतोय. बाजूला चाकांची खुर्ची. वाटेल तेव्हा त्यात बसलेला, वाटेल तेव्हा खाली! काय असेल हा माणूस? कोण असेल हा माणूस? कुणाचा कोण असेल हा? जेवत-खात कुठे असेल? झोपत इथेच असेल? रात्री? सण, धर्म काही आहे की नाही याला? आपलं असं कुणी आहे की, नाही? काहीही झालं तरी सदानकदा हसतो!!! काय दिलंय काय याला देवाने? एवढं कसलं हसू येत असेल याला? परिस्थितीवर हसतोय, अशा परिस्थितीत आनंदी असल्यामुळे देवावर हसतोय? स्वतःच्या नशिबावर हसतोय की, स्वतःवर हसतोय???
रस्त्यावर चिखल नसला तरी, ते चिकचिक पाणी होतं, जिरत चाललेलं. तिला आवडत नसायचं असलं. तोंड वेडंवाकडं करत ती चालत होती. एकवेळ पाऊस पडतोय, तेव्हा चालायला बरं. पायाखालचं वाहून तरी जात असतं. पण असलेली चिकचिक म्हणजे… शी! भराभरा पावलं पडतायत तशी हिच्या डोक्याची चक्रं वेगाने चालू लागली. एक गेटच्या शेजारी बसणारा माणूस तो काय! बसस्टॅण्डवर पोहोचताच ती भानावर आली. “तू ना ओव्हरथिंकर आहेस!” त्याचे शब्द पुन्हा डोक्यात वाजले. ‘च्यायला नकोच काही विचार!’ तिने बॅगमधून इअरफोन काढले, मोबाइलला कनेक्ट केले आणि स्वतःच्या कानाला लावून तिने प्ले-लिस्ट ऑन केली… ‘जा जा, जा दिले, दिले मन तुला… कर त्याचे तू काही, काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…’ तान घेऊन सलील समेवर आला तशी ती छद्मी हसली. ‘हा सलील म्हणजे ना माझ्या मनातलीच एकेक गाणी गातो. मला जे वाटतं तेच याच्या गाण्यात असतं. कसं ते याला कळतं की, याचं गाणं करायचं?! एरवी किती कविता आहेत जगात… हा बरोब्बर नेमक्याच कशा काय निवडतो!’
हेही वाचा – शिवशी लग्न करायला आरू तयार झाली, पण कारण काय?
आजूबाजूला बघतेय तर सगळेजण कसला ध्यास लागल्यासारखे एका दिशेने जात होते. घराची ओढ सगळ्यांच्या पावलांना जखडून होती आणि त्याच भरात असल्यासारखे सगळे आपापल्या बसच्या दिशेने चालले होते. कुणी सावकाश, कुणी धावत, कुणी तिरमिरीत. कुणी उगीचच रेंगाळतंय, कुणी कुणाच्या प्रतीक्षेत, कुणी कुणाच्या हातात हात घालून, कुणी मोबाइलमध्ये हात घालून, कुणी कानाला मोबाइल लावून… एवढ्यात तिची बस तिला लांबूनच दिसली. “ए डायरेक डायरेक डायरेक बिचोले, डायरेक बिचोलेSSS.” कंडक्टर बसच्या बाहेर इथे तिथे फिरून ओरडत होता. तिची पावलं झपाझप तिच्या बसच्या दिशेने जाऊ लागली तशी तिला जाणीव झाली, पोटात काहीतरी टाइमपास म्हणून ढकलायला पायजे बुवा! बसच्या मागच्या गाळ्यातले पॉपकॉर्न गरमागरम काचेच्या पेटीत उड्या मारताना दिसायच्या आधी त्यांचा वास तिच्या नाकात शिरला. पन्नासची नोट काढून तिने दुकानदाराच्या समोर धरली आणि ‘दोन’ म्हटलं. त्याला समजलं. त्याने दोन पॉपकॉर्नच्या पुड्या काढून तीच्या पुढ्यात ठेवल्या आणि सुट्टे पुढे केले. ते घेऊन तिने पुड्या बॅगमध्ये टाकल्या आणि पैसे तसेच हातात धरून ती बसकडे वळली.
क्रमश:


