माधवी जोशी माहुलकर
मला साबुदाण्याच्या उसळीसोबत / खिचडीसोबत उपवासाची बटाट्याची भाजी आवडते. माझी आई ही भाजी नेहमी एक तर बटाट्यांच्या पातळ चकत्या तर कधी उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी करून तुपाच्या फोडणीत हिरवी मिरची आणि दाण्याचे कूट, थोडं तिखट, चवीपुरती साखर आणि मीठ, लिंबाचा रस घालून चकत्या किंवा बटाट्याच्या फोडी खमंग होईपर्यंत परतून घ्यायची. मीपण आईप्रमाणेच ही भाजी नेहमी करत असते, परंतु आज बेबी पोटॅटोची दह्यातली ही भाजी करून पाहिली आणि या उपवासाच्या भाजीतला हा ट्विस्ट मस्त जमला. बेबी पोटॅटो दह्यात मॅरिनेट करून ते खमंग शिजवल्यानंतर त्यांची चव आणि रुपडेच पालटले! साबुदाण्याच्या उसळीसोबत छोटा बटाटा खायला मजा येत होती!
साहित्य
- बेबी पोटॅटो – पाव किलो
- शेंगदाण्याचे जाडसर कूट – अर्धी वाटी
- तेल – एक छोटी पळी (बटाटे तळायचे असतील तर तेल जास्त लागेल नाहीतर फ्राइंग पॅनमध्ये शॅलो फ्राय करता येतात.)
- जिरेपुड – एक चमचा
- काळीमिरी पावडर – एक चमचा
- तिखट – एक चमचा
- हिरव्या मिरच्या – चार (उभे कापलेले तुकडे)
- गोड दही – एक वाटी
- चाट मसाला – आवडीनुसार
- मीठ – चवीनुसार
- साखर – आवडीनुसार
- कोथिंबीर – आवडीनुसार
हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट लिटिल मिलेट्स कटलेट्स!
कृती
- बेबी पोटॅटोची साले काढून त्यांना काट्याने सर्व बाजूंनी छिद्रे करून ते मिठाच्या पाण्यात दहा मिनिटे बुडवून ठेवावे. मिठाच्या पाण्यामुळे बटाटे काळे पडत नाहीत.
- एका बाऊलमध्ये एक वाटी गोड दही घेऊन ते फेटुन घ्यावे. नंतर त्यामध्या मिरपूड, जिरेपूड, मीठ आणि साखर टाकून ते चांगले मिक्स करून बाजूला ठेवावे.
- बटाटे पाण्यातून काढून कोरड्या कपड्यावर पाचेक मिनिटे सुकत ठेवावे म्हणजे त्यातील अतिरिक्त पाणी निघून जाईल.
- पाच मिनिटांनी सर्व बटाटे दह्याच्या मिश्रणात मॅरिनेट करायला ठेवावे.
- एका कढईत थोडे तेल टाकून ते चांगले तापवून घ्यावे. ते तापल्यावर त्यामध्ये बटाटे शॅलोफ्राय करून शिजवून घ्यावे.
- बटाटे लालसर होत आल्यावर ते आतून शिजले आहेत की, नाही ते सुरीने मधे टोचून चेक करावे. कच्चे वाटत असतील तर मंद आचेवर अजून थोडे शिजू द्यावे. बटाटे पूर्ण शिजले की, ते पॅनमधून बाजूला काढावे.
- नंतर कढईत अगदी थोडे तेल टाकून ते तडतडल्यावर त्यामध्ये जिरे घालावे. नंतर मिरच्यांचे उभे काप टाकून त्यात एक चमचा लाल तिखट तसेच मीठ, साखर टाकून ते मिक्स करून गॅसच्या मंद आचेवर एक सारखे करावे.
- त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचे जाडसर कूट टाकून तेपण चांगले मिक्स करावे.
- नंतर लगेच या मिश्रणात आधी शॅलोफ्राय केलेले बटाटे टाकून ते या मसाल्यात व्यवस्थित मिसळून घ्यावे, नंतर यावर उरलेले मॅरीनेट केलेले दही टाकून परत एकदा सर्व बटाटे चांगले घोळवून घ्यावे, पाचेक मिनिटे ही प्रक्रिया मंद आचेवर होऊ द्यावी.
- दह्यातील सर्व मसाले बटाट्यांना टोचे दिल्यामुळे त्यामध्ये मुरतात आणि टेस्टही खूप छान येते.
हेही वाचा – थंडी अन् विदर्भातील रोडगे पार्टी!
एकूण कालावधी – साधारणपणे 30 ते 40 मिनिटे
टिप्स
- सर्व्ह करताना हे बेबी पोटॅटो एका बाऊलमध्ये काढून त्यावर चाट मसाला भुरभुरवून टाकावा आणि गरज वाटल्यास काळीमिरी पावडर आणि कोथिंबीर टाकून हे दहीवाले उपवासाचे आलू साबुदाणा उसळीसोबत / खिचडीसोबत किंवा साइड डिश म्हणून खायला द्यावे.
- वरून जाडसर दाण्याच्या कुटाचा क्रन्चिनेस आणि मिरचीचे तुकडे टाकून याची लज्जत अजून वाढवत येते.
- तोंडी लावणे किंवा स्नॅक्स म्हणून देखील दहीवाले आलू खाता येतात.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


