अध्याय आठवा
श्रीभगवानुवाच – अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते । भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञित: ॥3॥
मग म्हणितले सर्वेश्वरें । जें आकारी इये खोंकरें । कोंदलें असत न खिरे । कवणे काळीं ॥15॥ एऱ्हवीं सपूरपण तयाचें पहावें । तरि शून्यचि नव्हे स्वभावें । परि गगनाचेनि पालवें । गाळूनि घेतलें ॥16॥ जें ऐसेंही परि विरूळें । इये विज्ञानाचिये खोळे । हालवलेंही न गळे । ते परब्रह्म ॥17॥ आणि आकाराचेनि जालेपणें । जन्मधर्मातें नेणे । आकारलोपीं निमणें । नाहीं कहीं ॥18॥ ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती । तया नाम सुभद्रापति । अध्यात्म गा ॥19॥ मग गगनी जेविं निर्मळे । नेणों कैंची एक वेळे । उठती घनपटळें । नानावर्णे ॥20॥ तैसें अमूर्तीं तिये विशुद्धे । महदादि भूतभेदें । ब्रह्मांडाचे बांधे । होंचि लागती ॥21॥ पैं निर्विकल्पाचिये बरडी । कीं आदिसंकल्पाची फुटे विरूढी । आणि ते सवेंचि मोडोनि ये ढोंढी । ब्रह्मगोळकांची ॥22॥ तया एकैकाचे भीतरीं पाहिजे । तंव बीजाचाचि भरिला देखिजे । माजीं होतियां जातियां नेणिजे । लेख जीवां ॥23॥ मग तया गोळकांचे अंशांश । प्रसवती आदिसंकल्प असमसहास । हें असो ऐसी बहुवस । सृष्टि वाढे ॥24॥ परि दुजेनविण एकला । परब्रह्मचि संचला । अनेकत्वाचा आला । पूर जैसा ॥25॥ तैसें समविषमत्व नेणों कैचें । वायांचि चराचर रचे । पाहतां प्रसवतिया योनींचे । लक्ष दिसती ॥26॥
हेही वाचा – Dnyaneshwari : कैसी पुसती पाहें पां जाणिव, भिडेचि तरी लंघों नेदी शिंव…
अर्थ
श्रीकृष्ण म्हणाले – जे परम अविनाशी आहे, ते ब्रह्म. ब्रह्माची (आकाराच्या उत्पत्तिनाशांबरोबर उत्पन्न आणि नष्ट न होणे ही) जी सहज स्वरूपस्थिती तिला अध्यात्म असे म्हणतात. (अक्षर ब्रह्मापासून) भूतमात्रादी (चराचर) पदार्थांची उत्पत्ती करणारा जो सृष्टिव्यापार, त्याचे नाव कर्म. ॥3॥
मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, जे या सर्व फुटक्या (नाशिवंत) आकारामात्रात गच्च भरले असताही कोणत्याही वेळी गळत नाही ॥15॥ एरवी त्याचा सूक्ष्मपणा पाहू गेले तर, ते शून्यच वाटेल; पण ते स्वभावाने शून्य नाही. (कारण, ते मूळचे सत् आहे). शिवाय ते इतके सूक्ष्म आहे की, सूक्ष्मात सूक्ष्म जे आकाश त्याच्या पदरातून ते गाळून घेतले आहे ॥16॥ जे इतकेही सूक्ष्म असून झिरझिरीत असलेल्या या प्रपंचरूप वस्त्राच्या गाळणीतून हलवले तरी गळत नाही, ते परब्रह्म होय. ॥17॥ आणि आकाराला आलेल्या पदार्थांच्या उत्पत्तीबरोबर जे जन्मरूपी विकाराला जाणत नाही आणि आकारवान पदार्थ नाहीसे झाले तरी, जे केव्हाही नाश पावत नाही ॥18॥ अर्जुना याप्रमाणे आपल्या स्थितीने असणार्या ब्रह्माचे जे अखंडत्व, त्या अखंडत्वास अध्यात्म हे नाव आहे. ॥19॥ मग ज्याप्रमाणे निर्मळ आकाशात एकदम निरनिराळ्या रंगाच्या मेघांच्या फळ्या कशा येतात, हे कळत नाही ॥20॥ त्याप्रमाणे त्या विशेष शुद्ध आणि निराकार अशा ब्रह्माचे ठिकाणी महत्-तत्व वगैरे भूतभेदाने ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न व्हावयासच लागतात. ॥21॥ निर्विकल्प परब्रह्मरूपी माळ जमिनीवर मूळ संकल्प – (एकोऽहं बहु: स्याम्) रूपी अंकुर फुटतो आणि त्याबरोबर ब्रह्मगोळकांचे आकार दाट येतात. ॥22॥ त्या एकेक ब्रह्मांडामध्ये पाहावे, तो ते ब्रह्मांड बीजांनीच (मूळ संकल्पांनीच) भरलेले दिसते आणि एकेका ब्रह्मांडामध्ये होणार्या जाणार्या जीवांची (तर) गणतीही नाही. ॥23॥ मग त्या गोळकांमधील अंशरूपी एकेक जीव असंख्य आदिसंकल्प करावयास लागले. हे असो. याप्रमाणे सृष्टि फार वाढावयास लागली. ॥24॥ पण दुसर्याशिवाय एक परब्रह्मच सर्वत्र भरलेले आहे आणि त्याच्या ठिकाणी अनेकत्वाचा जसा पूर आला आहे ॥25॥ याप्रमाणे त्या ब्रह्माच्या ठिकाणी समविषमत्व कोठून आले, हे कळत नाही. तेथे उगीचच स्थावर जंगम पदार्थ उत्पन्न होतात. ते पाहिले असता प्रसवणार्या योनींचे लक्षावधी प्रकार दिसतात. ॥26॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : देवा आधियज्ञ तो काई, कवण पां इये देहीं…


