Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स
स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनविण्याच्या टिप्स पाहूयात.
- मटार घालून पुलाव किंवा पोहे करताना मटार कधीही तेलावर परतू नयेत. तसे केल्यास मटारचे दाणे आकसतात किंवा फुटतात. म्हणून अशा वेळी मटार गरम पाण्यात घालून त्यात चिमूटभर हळद घालावी आणि पाच मिनिटे उकळावे. मटार छान टप्पोरे आणि हिरवेगार राहतात. याच प्रकारे पुलाव आणि सलाडसाठी लागणाऱ्या हिरव्या भाज्या (फरसबी, ढोबळी मिरची) हळद घालून 2 मिनिटे उकडाव्यात. उकडताना चवीपुरते मीठ घालावे. हळद घालून उकडल्यामुळे भाज्यांचे रंग छान हिरवेगार राहतात.
हेही वाचा – Kitchen Tips : लहान वांग्याचे भरीत अन् बटाट्याची भाजी करताना…
- शाही पनीर किंवा कोफ्ताकरीकरिता ग्रेव्ही भरपूर असावी लागते. कांदा, आले, लसूण जास्त वापरावे लागते. हा मसाला परतणे त्रासाचे काम असते. त्याकरिता सोपी पद्धत. प्रेशर कुकरच्या भांड्यात रश्शाला लागणारे तेल घालून गॅसवर ठेवा. तेल तापताच त्यात अर्धा टीस्पून साखर घाला, ती तपकिरी झाल्यावर कुकर खाली उतरवा. (साखर तपकिरी झाल्यामुळे रश्शाला चव आणि रंग सुरेख येतो.) त्यात किसलेला कांदा आणि त्याच्या रसासह आले, लसूण पेस्ट, किंचित हळद, मीठ आणि बारीक कापलेला टोमॅटो (पल्प वापरला तर अर्धी वाटी पाणी घालावे) सर्व मिसळून झाकण लावून गॅसवर ठेवा. प्रेशर आल्यावर गॅस बारीक करून 10 मिनिटे शिजवावे, झाकण निघाल्यावर दोन मिनिटे मसाला परतावा.
हेही वाचा – Kitchen Tips : लिंबं, टोमॅटोचा रस आणि मटारची साठवणूक कशी कराल?
- आपण चाकवताची भाजी करताना पुढील शेंडे तसेच कोवळी देठे घेतो आणि उरलेली टाकून देतो. ती न टाकता छोटे तुकडे करून वाळवून ठेवावीत आणि तुरीचे वरण शिजवताना डाळीत छोटे तुकडे टाकावेत. न शिजणारी डाळही लवकर शिजते आणि देठातील सत्त्व पण मिळते.
- एखाद्या वेळी भाजी किंवा आमटीत आपल्या हातून तिखट किंवा गोडा मसाला जास्त पडतो. अशा वेळी दोन टेबलस्पून दुधावरची साय (अर्थात भाजी किंवा आमटी जास्त असेल तर त्या प्रमाणात जास्त घ्यावी लागेल) घेऊन ती चमच्याने ढवळून एकजीव करावी आणि भाजी किंवा आमटी गॅसवर ठेवून कढ आला की, साय घालून चांगले ढवळावे. आणखी एक कढ द्यावा. भाजीचा किंवा आमटीचा जहालपणा कमी होऊन ती सौम्य होते तसेच चवीला आणि रंगाला छान दिसते.


