भाग – 7
प्राजक्ता (आराध्याची आई) सासरी आल्यानंतर अगदी घरात मिसळून गेली. कामांची रेलचेल, नणंदेचा हट्ट, मोठ्या वहिनीच्या नाजूक मनाचा समतोल… या साऱ्याचा भार तिच्या खांद्यावर अलगदपणे टाकला गेला. शांताबाई (सासू) तिचं कौतुक करत असल्या तरी, मुलीच्या वाढत्या अस्वस्थतेचा त्यांना अंदाज येत होता. पण मग एक दिवस, मोठ्या भावाने आपला संसार वेगळा केला. मुळातच त्याच्या बायकोला एकत्र कुटुंब नको होतं. भांड्याला भांडं लागत होतंच, हे निमित्त ठरलं.
दुसरीकडे नणंद, सुमती. तिच्याही मनात ‘आपलं वेगळं घर’ हे स्वप्न होतंच. ती सतत कुरकुर करत होती. “मुलीचं घर असायला हवं… वडिलांकडे तर मी राहणार नाही.”
शांताबाईंना तिच्या बाळांची तगमग पाहवत नव्हती. पैशांची चणचण होतीच, म्हणून त्यांनी प्राजक्ताकडचे दागिने मागितले, “सध्या दे. परत करू.” प्राजक्ताने काहीही न बोलता दागिने दिले. पण सुमतीने ते दागिने विकले… आणि स्वतःचं घर घेतलं.
प्राजक्ताच्या अंगावरचं फक्त मंगळसूत्र, कानातली कुडी राहिली. बाकी सगळं सोनं तिच्याकडे राहिलं नाही. ती मात्र, शांत राहिली. तिच्या अंतर्मन काहीसं दुखावलं होतं… पण अजूनही तिला वाटत होतं, हे सगळं ‘घरासाठी’ आहे.
याच सुमारास सुशांतच्या (वडील) दुसऱ्या भावाचं, प्रसादचं लग्न ठरलं. तिथं पुन्हा एक नवीन वहिनी घरात आली. पुन्हा एकदा प्राजक्ताची सासरची वसुंधरा हलली. ती घरात रुळली होती, पण आता रोज नवं काहीतरी, नवा ताण, नवा अहंकार… यात ती गुदमरायला लागली.
लग्नाला तीन वर्षं झाली होती… आणि अजूनही तिच्या पोटात जीव नव्हता. पण तिचं “आई होणं” ही गोष्ट आता केवळ तिची खासगी बाब उरली नव्हती. आता ती घराची चर्चा, कुटुंबाची चिंता आणि समाजाची खिल्ली बनली होती. तिची भावजय, निशाला दिवस गेले आणि प्राजक्ताचं दुःख अधिकच गहिरं झालं. सासरचं अंगण ज्यात तिच्या पावलांनी स्वप्नं पेरली होती, तिथं आता निशाच्या बाळंतपणाच्या तयारीचा गोंधळ सुरू झाला होता. बायकांची चर्चा, नणंदेच्या कौतुकाच्या गोष्टी आणि प्रत्येक वाक्यात लपलेला एक टोकदार टोमणा — हे सारं प्राजक्ताच्या काळजाला रोज जखमा करत होतं.
निशा, बोलण्यात मधाळ, वागण्यात शिताफी — सगळ्यांवर गारूड करत होती. तिचा नवरा तिच्या इशाऱ्यावर चालणारा… नणंद तर तिची ‘ताई’ झालेली. आणि प्राजक्ताचं? तिचं अस्तित्व जणू घरात केवळ कामासाठी होतं. डोहाळ जेवणाच्या दिवशी तर कहरच झाला. आरास सजली होती, घर बायकांनी भरलं होतं, पण प्राजक्ताकडे पाहात एक बाई पुटपुटली, “वांझोटी आहे ही… तिच्याकडून ओटी भरू नकोस!”
…आणि त्या एका वाक्यानं प्राजक्ता आतून तुटून गेली. डोळ्यातून पाणी आलं, पण तिनं पुसलं नाही. तिला वाटलं, मी इतकं काय पाप केलं? किती नवस, किती डॉक्टर, किती अंगारे धुपारे केले… पण काहीच झालं नाही.
शेवटी सुशांतचं मनही डळमळलं. एक मित्र त्याला म्हणाला, “आमच्या गावी विश्वेश्वराचं एक प्राचीन मंदिर आहे. नवस केल्यावर तिथं पाळणा हललेले मी पाहिलेत.”
हेही वाचा – आराध्या या जंगलात का आली होती?
शेवटचा प्रयत्न म्हणून सुशांत आणि प्राजक्ता त्या गावात गेले. त्या लहानशा पण पवित्र वाटणाऱ्या देवळात, दोघांनी दोन्ही हात जोडले… “हे विश्वेश्वरा, आम्हाला मूल झालं, तर त्या बाळाच्या वजनाच्या इतकी घंटा मी तुझ्या देवळात बांधीन.” त्या संकल्पाच्या क्षणी, प्राजक्ताच्या डोळ्यात पाण्याऐवजी आशेचा किरण होता… शेवटी तिनं देवासमोर हात जोडले…
विश्वेश्वराच्या देवळात मागितलेला नवस खरा ठरला! काही दिवसातच प्राजक्ताच्या आयुष्यात नवीन जीवाची चाहूल लागली.
“प्राजक्ता आई होणार!” हे शब्द तिच्या कानात वाऱ्यासारखे घुमले आणि एक क्षणात तिचं आयुष्य उजळून गेलं… आजवर जिच्यावर वांझोटीचा शिक्का लावला होता, तिच्यासाठी आता लोक डोहाळे पुरवायला घरी येऊ लागले. ओळखीपाळखीच्या बायका खास तिच्यासाठी पदार्थ, वेगवेगळ्या फळांचे ताट घेऊन यायच्या. त्या त्या क्षणाला प्राजक्ताच्या डोळ्यात नकळत पाणी साठायचं… हे सगळं माझ्यासाठी?
तिच्या डोहाळ जेवणाला फार मोठा थाट नव्हता. नणंदेला एक शब्दही बोलायचा नव्हता, ती फक्त भावजय म्हणून हसत उभी होती. सासूबाई काही वेळा थोड्या काळजीने तिला हात लावत होत्या, तेवढाच आधार होता.
तो क्षण आला… प्राजक्ताचं ऑपरेशन झालं. बाळाच्या पहिल्या रडण्याचा आवाज आला, आणि त्या रडण्याने ती सगळं विसरली… दुःख, टोमणे, अंगारे धुपारे, नवस, अपमान…
नर्सनं बाळ दाखवलं. ती मुलगी होती… पण तिला बघताच प्राजक्ताच्या मनात काहीसं हललं… त्या नवजात बाळाचा रंग, हलकासा राखाडी! …आणि डोकं इतर शरीराच्या मानाने किंचित मोठं. एक आई म्हणून तिच्या हृदयात जो पहिलाच आनंद उसळला होता, त्यावर शंकेचा पडदा पसरला. प्राजक्ताच्या डोळ्यांत एक अनाम भीती भरली… ‘हे असं का? सगळं ठीक आहे ना?’
सगळे सावरत होते, पण तिच्या मनात एक विचित्र ओझं घर करत होतं.
प्राजक्ताच्या हातात ती लहानशी मुलगी आली आणि एक क्षणासाठी तिचं काळीज थांबलं. नव्या आयुष्याचा तो सुगंध, त्या पंखासारख्या बोटांनी तिला स्पर्श करणारी ती गोजिरी जाणीव… पण त्या राखाडी वर्णावरून आणि डोक्याच्या आकारावरून मन कातरणारी भीतीही पसरली… “ही… ही माझीच मुलगी आहे?” प्राजक्ताने स्वतःला विचारलं.
ती अजूनही तंद्रीत होती. बाहेर सगळे “अभिनंदन, मुलगी झाली!” असं म्हणत होते, पण तिच्या मनात एक वादळ उठलं होतं… तिच्या मनातलं शांत आकाश ढगांनी भरून आलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं, “बाळ सुदृढ आहे, काळजीचं काही नाही.” पण समाजाचं, घरच्यांचं आणि स्वतःच्या मनाचं – या तिन्ही आघाड्यांवर प्राजक्ताचं मन तुटायला लागलं.
ती बाळाला घट्ट कवेत घेते… “तू वेगळी आहेस, पण तू माझीच आहेस. आता तूच माझं सर्वस्व आहेस!”
त्या क्षणी तिने ठरवलं – ती आराध्याला इतकं प्रेम देईल… असं घडवेल की, कुठल्याही सावलीत तिचं तेज लपणार नाही.
आराध्याच्या मनात तो प्रत्येक क्षण खोलवर कोरलेला होता — जणू तिच्या अस्तित्वावर कायमचं व्रण उमटवून गेला होता. ती म्हणत होती, “मी राखाडी रंगाची होते… हे ऐकूनसुद्धा कोणी नॉर्मल रिअॅक्ट केलं असतं का? मी जन्माला आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच लोकांनी मला वेगळं समजायला सुरुवात केली होती. कुणी ‘चुकून आली’ असं म्हटलं, कुणी ‘कसली विघटित रचना’ असं… आणि मग सुरू झाला माझा प्रवास – एकटेपणाचा, तिरस्काराचा, आणि एका वेगळ्या अस्तित्वाचा.”
लहानपणीच आराध्या वेगळी ठरली होती – केवळ रंगासाठी. चुलत बहिणींची गोरी त्वचा, त्यांचं उंची राहणीमान ही तिच्याविरोधातली तुलना ठरली.
“आई-बाबा आणि आजी यांनी मला कधी दूर केलं नाही, हे खरंय. पण त्यांचं अबोल असणं, त्यांच्या डोळ्यांतली असहाय्यता, ती अपमान गिळण्याची सवय… हे सगळं मला आतून पोखरत होतं.”
मोठी काकी माझ्यावरचा राग, माझी त्वचा आणि अस्तित्वावर काढायची… आईला तर सततच कामावरून बोलणं, घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी तिची अवस्था होती. पण त्याहून अधिक वेदना मला देणारी होती, ती आईची शांतता. ती विरोध करत नव्हती. तिने हे स्वीकारलं होतं. तिच्या चेहऱ्यावरचा ताण, तिचं आतल्या आत रडणं… हे मला आतून तोडत होतं.
“माझं लग्न होईल का?” या प्रश्नाने आईचं मन सतत बेचैन असायचं.
“कोण स्वीकारेल हिला?” हे शब्द आराध्याने घरात अनेकदा ऐकले होते — कधी थेट, कधी तिला पुसटसे भिडणारे.
शेवटी, तिला वाटलं, “मी नाही राहिले, तर कदाचित आईचं टेन्शन संपेल. लोक काही दिवस बोलतील, पण विसरून जातील. पण माझ्या अस्तित्वाने जर तिचं दुःख वाढत असेल, तर मी निघून जाणंच योग्य… या निर्णयामागे कुठलाही वाईटपणा नव्हता. फक्त एक हळव्या मनाची, वेगळेपणाच्या बोचेतून उगम पावलेली मूक क्रांती होती.”
हेही वाचा – आराध्याने सांगितली, आपल्या आईवडिलांची कहाणी
आराध्याच्या या वेदनांनी शिवा हादरला होता. ही मुलगी बरीच मोठी झाली होती — समाजाच्या घाणेरड्या नजरेने. शिवाच्या मनात आराध्याबद्दलचा आदर अनोख्या पातळीवर पोहोचला होता. जी मुलगी समोर उभी होती, तिच्या डोळ्यांतून झरणाऱ्या वेदना, तिच्या शांत शब्दांमधली तगमग… हे सगळं त्या दिवशी त्याला खूप काही शिकवून गेलं.
त्याने सावधपणे तिच्या शेजारी बसत विचारलं, “पण तू निघालीस… आणि एकटीने इतका मोठा निर्णय घेतलास, त्यावेळी घाबरली नाहीस?”
आराध्याने थोडसं हसून मान हलवली.
“खरं सांगायचं तर, खूप घाबरले होते. पण मग मी एक गोष्ट ठरवली –जगायचं, पण माझ्या अटींवर. मी माणसं परत शोधेन, पण जी मला माझ्या रंगासकट स्वीकारतील. मी घर बनवेन, पण जिथे अस्तित्व लपवावं लागणार नाही.”
शिवा तिच्या या विचारांमध्ये गढून गेला होता. एक मन आराध्याला परत तिच्या आई-वडिलांकडे नेण्याचं म्हणत होतं… तर दुसऱ्या मनात, “तिने जे गमावलंय, ते परत देणं आपल्या हातात नाही… पण जे ती शोधतेय, ते द्यायला मी पुरेसा आहे का?” हा विचार होता.
ते दोघं त्या रात्री अगदी शांत बसून राहिले. गाभ्यात चंद्रप्रकाश, झाडांची सळसळ आणि त्यांच्यामधल्या अव्यक्त पण गहिऱ्या संवादाने भरलेली ती रात्र…
शिवाला हेही कळून चुकलं होतं की, आराध्या ही कोणत्याही सहानुभूतीची भिकारी नव्हती. ती लढलेली होती, आणि अजूनही लढतेय — एकटी. पण कदाचित आता एकटी नसेल!
“आराध्या,” त्याने हलक्याच आवाजात म्हटलं, “आपण उद्या जिथे त्या तळ्यावर बसतो, तिथे तुला काही दाखवायचंय…”
तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं.
“काय?”
तो फक्त हसला, “तुझ्यासारख्या एखाद्या लढवय्याला काय दिलं जाऊ शकतं, ते सांगणं अवघड आहे… पण प्रयत्न करतो.”
…आता ही कहाणी एक नवीन दिशा घेणार होती. नातं, जे दया किंवा सवयीवर नव्हे, तर समजुतीवर उभं राहात होतं.
काय असेल शिवाच्या मनात काय सांगेल तो?
क्रमशः


