स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये खमण ढोकळा, दहिवडे, डोसा, ऑमलेट बनविण्याच्या टिप्स पाहूयात.
- पीठ पेरून भाजी करताना डाळीचे पीठ थोड्या तेलात किंचित हळद टाकून भाजून घ्यावे. मगच भाजीवर पेरावे. भाजी जास्त खमंग आणि मोकळी होते. कढईला चिकटत नाही. रंगही सुरेख येतो.
- कांद्याची कोशिंबीर करताना किंवा काही पदार्थात बारीक चोचवलेला किंवा किसलेला कांदा घालावा लागतो. तेव्हा कांदा चोचवताना किंवा किसताना कांद्याचे जे निमुळते टोक असते, तेच देठ कांद्याचे काढावे. नंतर कांद्याची साले काढावीत, परंतु कांद्याचे मागचे देठ काढू नये. मागचे देठ न काढता कांदा चोचवावा किंवा किसावा, मागचे देठ ठेवल्याने कांद्याचा पाकळ्या सुट्या न होता कांदा चांगला चोचवला जातो. त्या मागच्या देठाचा दाब त्यावर राहून कांदा चांगला चोचवला जातो. मागचे देठ म्हणजे खालची मुळांची चकती काढू नये.
हेही वाचा – Kitchen Tips : खमण ढोकळा, डोसा, ऑम्लेट बनवताना या टिप्स वापरून पाहा
- पावभाजी करताना सर्व भाज्या किसून घ्याव्यात, म्हणजे भाजी एकसंध होऊन चांगली मिळून येते.
- हिरवागार कोबी ताजा असतानाच जाड किसणीने किसून फ्रीजमध्ये ठेवल्यास चार दिवस छान टिकतो. हा कीस आयत्या वेळी दही, मीठ, मिरची घालून कोशिंबीर करण्यास उपयोगी पडतो. थोडा चिंचेचा कोळ, गूळ किंवा साखर, मीठ, मोहरीची डाळ आणि थोडी फोडणी घालून कोबीचे रायतेही खूप छान होते. थोड्या दाण्यांचे कूट, लिंबू, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिऱ्याची फोडणी दिल्यास ही कोशिंबीर खमंग काकडीप्रमाणे छान लागते.
- आहारदृष्ट्या शिजविलेल्या कोबीपेक्षा कच्चा कोबी आरोग्यास फार हितावह आहे. किसणीने किसण्याच्या सोप्या पद्धतीमुळे भरपूर कीस चटकन मिळू शकतो. हा कीस पोहे, उपमा, कडधान्याच्या उसळी, तसेच थालीपिठावर पेरला तर पदार्थांची शोभा वाढते आणि चवही खूप छान लागते आणि पोषणमूल्यही वाढते. पचनास आवश्यक असलेले ‘रफेज’ ही विनासायास मिळते. कोबी किसताना जे पानाचे मोठे तुकडे मोकळे होतील, ते व्यवस्थित कापून त्याने सलाड सजविता येईल.
हेही वाचा – Kitchen Tips : बटाटेवडे, आलू पराठे, ढोकळा, उडीदवडे…
- टोमॅटोचे सूप किंवा सार करण्यासाठी बऱ्याच गृहिणी प्रथम टोमॅटो उकडून घेतात आणि नंतर त्यांचा रस काढून सूप अथवा साराचे साहित्य घालून परत उकळवतात. यामुळे टोमॅटोची बरीच जीवनसत्त्वे नाश पावतात आणि गॅसही जास्त प्रमाणात खर्च होतो. याकरिता पुढील नवीन पद्धतीने सूप अथवा सार केल्यास ते अधिक चवदार, पौष्टिक होईल आणि गॅसही थोड्याफार प्रमाणात वाचेल. टोमॅटोच्या बारीक फोडी कराव्यात आणि मिक्सरमधून थोडे पाणी घालून रस काढून घ्यावा. हा रस बारीक भोकाच्या चाळणीतून अथवा फडक्यामधून गाळून घ्यावा म्हणजे चोथा बिया इत्यादी बाजूला होईल. हा रस सूप अथवा सारासाठी वापरता येईल.


