स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये खमण ढोकळा, दहिवडे, डोसा, ऑमलेट बनविण्याच्या टिप्स पाहूयात.
- खमण ढोकळा बनवताना त्यात साखर न घालता साखरेचे पाणी वेगळे तयार करून ठेवावे. ढोकळा तयार झाला की, प्लेटमध्ये ढोकळ्यावर सुमारे चमचाभर साखर टाकलेले अर्धी वाटी पाणी टाकून ढोकळापात्र बंद करून ठेवावे. हे पाणी ढोकळ्यात जिरते व ढोकळा कोरडा न होता अलवार आणि नरम होतो.
- नुसत्या उडदाच्या डाळीचा उडीदवडा करण्यापेक्षा उडदाची डाळ भिजत घालताना त्यातच थोडे तांदूळ, हरभराडाळ आणि मुगाची डाळ घालावी. पाच-सहा तास डाळी भिजल्यावर मिक्सरमधून घट्ट वाटावे आणि लगेचच वडे तळावेत. वडे अतिशय हलके, कुरकुरीत तर होतातच, पण तळण्यास तेल अगदी कमी लागते. शिवाय सर्व डाळींच्या मिश्रणामुळे त्यांची पौष्टिकताही वाढते.
- इडली केल्यावर स्टँडला जी थोडी इडली चिकटून बसते, ती दर वेळी हाताने नीट काढून घ्यावी आणि टाकून न देता चटणीमध्ये मिसळावी. अजिबात समजत नाही. तसेच जर चटणी तिखट वाटली, तर एखादी इडली कुस्करून चटणीत टाकावी.
हेही वाचा – Kitchen Tips : केळ्याचे वेफर्स, पपईची भजी, हरभऱ्याची तळलेली डाळ…
- दहीवडे उत्तम आणि स्वादिष्ट होण्याकरिता अर्ध्या नारळाचे दूध काढून ते दहीवड्याच्या दह्यामध्ये मिसळावे. दूध काढलेला नारळाचा चोथा फेकून न देता तो वड्याच्या पिठात मिसळावा. वड्यात जास्त तेल रहात नाही आणि ते रवाळ लागतात.
- डाळ, तांदूळ वाटल्यावर लगेच डोसा करायचा झाल्यास लिंबाएवढी चिंच पाण्यात भिजवा आणि त्याचे पाणी (कोळ) पिठात मिसळा आणि लगेच डोसा करा. अगदी हॉटेलसारखा खरपूस लाल डोसा होतो.
- ब्रेकफास्टसाठी ऑम्लेट करताना चमचाभर दूध घालून अंडे फेसावे आणि चिमूटभर ओवा घालावा. आम्लेट खुसखुशीत आणि चविष्ट लागते.
हेही वाचा – Kitchen Tips : बटाटेवडे, आलू पराठे, ढोकळा, उडीदवडे…
- फ्राईड एग छोट्या फोडणीच्या कढईत बनवा. प्रथम थोडे तेल आणि मीठ, मिरेपूड घाला, त्यावर अंडे फोडून घाला. अगदी गोल अंडे निघेल.
- मेयोनिझ ड्रेसिंग पातळ झाल्यास एक टेबनस्पून उकडलेल्या बटाट्याचा लगदा घालून मिक्सरमध्ये फिरवा.
- सॅण्डविचेस् बनवताना, लोण्यात थोडे जिलेटीनचे पाणी मिसळा. म्हणजे ब्रेड स्लाइस चिकटून राहतील. एक चमचा जिलेटीन आणि 4 चमचे पाणी वापरा.


