मयुरेश गोखले
एका सुंदर संध्याकाळी मी फेसबुकवर ऑनलाइन होतो. दुपारी जोरदार पाऊस पडून गेल्याने हवेत छान गारवा होता. घराबाजूची हिरवीगार झाडे वाऱ्याने डोलत होती आणि अशा रोमँटिक वातावरणात ‘mutual friends’ मध्ये तिचा सुंदर फोटो मला दिसला. लगेच पाठवली मग रिक्वेस्ट.आणि तिने ती accept सुद्धा केली! तिच्या ‘भिंती’वर तिने आज एक पोस्ट टाकली होती “डॅड से नो लेट नाइट पार्टी!” तिच्या बहुतेक पोस्ट इंग्लिशमध्येच असायच्या. पिक्स पण एकदम मॉडर्न असायचे. पाउट केलेले फोटो असायचे. एक सुंदर मैत्रीण मिळाल्याचा जरा गर्व झाला होता मला…
एकदा बोलून पाहावं म्हणून मेसेज पाठवला आणि तिने पण छान रिप्लाय केला. हळूहळू आमचे ऑनलाइन बोलणे वाढले… मैत्री वाढली… मग एक दिवस मी तिला भेटायचे ठरवले. ती सुद्धा तयार झाली भेटायला! एका कॉफी शॉपमध्ये आमची डेट ठरली. संध्याकाळी 6 वाजता भेटायचे ठरले…
हेही वाचा – मैं जिंदगी का साथ निभाता चला गया…
भेटायचा दिवस उजाडला. दुपारी जोरदार पाऊस पडून गेल्याने हवेत छान गारवा होता. घराबाजूची हिरवीगार झाडे वाऱ्याने डोलत होती. ‘मित्राकडे जातोय,’ असे सांगून छान तयार होऊन बाईक काढली. एकदम रोमँटिक वातावरण होते… कॉफी शॉपमध्ये ती आधीच पोहोचली होती. सुंदर दिसत होती. मी समोरच्या खुर्चीवर जाऊन बसलो. ती गोड हसली. तिचे हसणे पाहून काळजात तीर खोल रुतला! मी म्हणालो, “आता पावणेसहाच वाजले आहेत, तू इतक्या लवकर कशी आलीस?”
मला वाटलं की, ती मला भेटायला आतुर झाली असेल! पण…
ती म्हणाली, “माये पप्पा ऊसिर झाला त मले रागवेन. 7 ले आमाले वास्तुकला जाचे हाय, मनून लौकर युन बसली.”
एक मिनिट शांतता…
ते गोड हसणं आता मला डायनासोरचं हसणं वाटू लागलं… सर्वात स्वस्त कॉफी, ती पण वन बाय टूमध्ये ऑर्डर केली. संपवली. बिल देताना ती म्हणे, “तू मले आवडला. माया पप्पाले बी आवडन तुला भेटायला.” मी फक्त हसलो… तिला साडेसहाला ‘टाटा बाय बाय’ केले.
हेही वाचा – Love story : उलटून रात्र गेली…
‘डॅड से नो लेट नाइट पार्टी’ या पोस्टचा आणि तिचा कुठेच ताळमेळ बसत नव्हता! यानंतर अशा इंग्लिश पोस्ट आणि मॉडर्न फोटो पाहून हुरळून जायचे नाही, हे मनाशी पक्के ठरवले आणि तो मगाशी काळजात घुसलेला तीर बाहेर काढून फेकला…
मित्रांनो, फेसबुकवर असणाऱ्या तुमच्या मैत्रिणींपैकी कोणी असे नाही ना!! काळजी घ्या.
मोबाइल – 9423100151


