भाग – 1
सकाळी उठून राजेंद्र पेपर वाचत होता. त्याच्या हातात चहाचा कप देताना सविता म्हणाली, ‘वसुमती ताईंचा मेसेज आलाय, तुम्ही दोघं केव्हा येताय रत्नागिरीला?’ तिच्याकडे पाहात राजेंद्र उत्तरला ‘हो, जायला पाहिजे. एकदाचे हे रिटर्न्स भरून झाले की जाऊ…’
‘त्यांचं म्हणण आहे, या आठ दिवसांत या. नाहीतर आपली भेट होणार नाही एवढ्यात.’
‘का? ताई कुठे बाहेर जात आहेत की काय?’
‘कल्पना नाही. तसं काही बोलल्या नाहीत. पण त्यांचा आवाज निश्चयाचा होता, ठाम होता. काहीतरी असेल त्यांच्या मनात…’
‘उदय सर गेल्यापासून त्या एकट्या झाल्यात. त्यात त्यांची विभा पण ऑस्ट्रेलियाला… मग आता या आठवड्यात जाऊया रत्नागिरीला.’
‘मग, तसं कळवू का मी त्यांना?’
‘हो, गुरुवारी जाऊ आपण. रविवारी परत फिरू.’
‘चालेल, मी कळवते त्यांना.’
मग सविताने वसुमती ताईंना कळविले आम्ही गुरुवारी येतोय म्हणून. मग दुसऱ्या दिवशीपासून सविताची खरेदी सुरू झाली, वसुमती ताईंना काय काय आवडतं त्याची. कोल्हापूरचे कंदी पेढे, सुती साड्या, कोल्हापुरी चिवडा, भडंग इत्यादी… गुरुवारी कारने राजेंद्र आणि सविता रत्नागिरीला जायला निघाली. वसुमती ताईंना पुस्तकांची आवड म्हणून राजेंद्रने नवीन पुस्तके विकत घेतली. आंबा घाट आला आणि राजेंद्रने चहासाठी एका टपरीकडे गाडी थांबविली. हातपाय धुवून त्यानी चहाची ऑर्डर दिली. बरेच दिवस नवऱ्याला विचारायचं विचारायचं म्हणत होते ते सविताने विचारलेच शेवटी… ‘राजेंद्र उदय सर गेले तेव्हा वसुमती ताईंना दु:ख झाल्याचे वाटले नाही, नाही का?’
हेही वाचा – शिक्षण सेवक… खेडेगावात काय किंमत?
‘सध्या सुशिक्षित समाजात दु:ख न दाखवण्याची पद्धत आहे आणि दोन प्रकारची माणसे असतात. काही माणसं ओक्साबोक्सी रडतात, काहीजण बाहेरून दाखवत नसली तरी मनात ठेवतात. ताई या सुशिक्षित पुढारलेल्या विचारांच्या… त्यांनी दु:खाचे प्रदर्शन केले नसेल कदाचित, पण त्या हादरलेल्या दिसत होत्या.’
‘हो तर, उदय सर अचानकच गेले ना! कसलाही आजार नाही. रात्री झोपले ते सकाळी उठलेच नाहीत.’
‘तसे सर बेफिकीर. नॉनव्हेज किती खायचे एकाचवेळेस.’
‘हो ना. त्यांना कोल्हापुरी मटण फार आवडायचे. ते जेवायला असले तर तू दोन किलो मटण आणायचास आणि त्यातील जास्त तेच संपवायचे.’
‘ताई त्यांच्या एकदम विरोधी. एवढेसे जेवण आणि रोज कसला ना कसला उपवास!’
‘दोन वेगवेगळ्या स्वभावाची माणसे एकत्र संसार करत होती. आत सर गेले बाई राहिल्या. विभा मात्र आईवर गेली. शांत, हुशार, सुस्वभावी…’
‘तुला सरांचा किती वर्षे सहवास मिळाला असेल?’
‘किमान दहा वर्षं. रत्नागिरीच्या कॉलेजात मी ज्युनियर प्रोफेसर म्हणून जॉइन झालो तेव्हा सर हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. आमच्या फिजिक्स डिपार्टमेंटची दर शुक्रवारी मीटिंग व्हायची तेव्हा सरांच्या केबिनमध्ये मी जायचोच. मी त्यावेळी बॅचलर त्यामुळे शनिवारी, रविवारी सरांकडे जेवायला जायचो. त्यामुळे ताईंची ओळख झाली. ताई हायस्कूलमध्ये शिक्षिका. संस्कृत शिकवायच्या… विद्यार्थी प्रिय. सर एकदम देखणे तर, ताई सर्वसाधारण.’
‘मग दोघांचा संसार कसा होता?’
‘काही कळायचं नाही, पण ताई नाराज दिसायच्या.’
‘का?’
‘काय होतं, सर हे पुढं पुढं करणारे… सर्वात मिसळणारे, स्त्रियांमध्ये प्रिय… नास्तिक विचारांचे… आणि बाई त्याविरुद्ध! ठराविक मंडळीमध्ये रमणाऱ्या, सतत पुस्तके वाचणाऱ्या, व्रते करणाऱ्या, नोकरी प्रामाणिकपणे करणाऱ्या. म्हटलं तर ही दोन टोक होती.’
राजेंद्रने पुन्हा गाडी सुरू केली. त्याच्या डोक्यात सरांच्या संसाराची चक्रे फिरू लागली. सरांचे मोठ्याने हसणे, नॉनव्हेज जोक्स मारणे, कॉलेजमधील लेडी प्रोफसरस् आणि मुलींमध्ये इंप्रेशन मारणं… राजेंद्रला आठवण झाली. आपल्यानंतर दोन वर्षांनी रत्नागिरीजवळची एक तरुण मुलगी फिजिक्स डेमॉस्ट्रेटर म्हणून जॉइन झाली होती. सरांनी तिची नेमणूक आपल्या सोबतच्या प्रॅक्टिकल्समध्ये केली. राजेंद्रच्या लक्षात यायचं की, ती सरांबरोबर प्रॅक्टिकल करायला नाराज असायची; पण आपण जर प्रॅक्टिकलला असलो तर, खूश असायची.
दोन महिन्यांनंतर एकदा ती त्रासलेल्या चेहऱ्याने आपल्याला म्हणाली, ‘राजेंद्र सर, मी नोकरी सोडतेय. त्रास होतो मला…’ मी म्हटलं, ‘अगं कसला त्रास? मला सांग, मी प्रयत्न करतो त्रास कमी करण्याचा!’ ती म्हणाली, ‘नाही, तुम्हाला शक्य नाही ते. मला प्रिन्सिपलना भेटावं लागेल.’ मग दोन दिवसांनी तिने राजीनामा दिल्याची बातमी आली. पुन्हा कधी ती दिसली नाहीच. तिला सरांकडून काही त्रास झाला होता का? राजेंद्रच्या मनात ती शंका त्यावेळेपासून होती, पण ती परत दिसली नाही, त्यामुळे तो विषय तेथेच संपला.
दुपारी 1च्या सुमारास त्यांची गाडी साळवी स्टॉपजवळील घराजवळ आली. वसुमती ताई वाटच पाहात होत्या. ती दोघं येता क्षणी त्यांना खूप आनंद झाला, असे वाटले. त्यांनी चहा दिला आणि विभाची खोली दाखविली. राजेंद्र आणि सविताने विभाच्या खोलीत आपली बॅग ठेवली.
‘हातपाय धुवा आणि जेवायला या. जेवण तयार आहे.’
‘हो ताई, दहा मिनिटांत येतो.’
राजेंद्र आणि सविताने हातपाय धुतले आणि कपडे बदलून जेवायला बसली. राजेंद्र पूर्वी रत्नागिरीला असताना बऱ्याच वेळा ताईंच्या हातचं जेवला होता. त्यानंतर सुद्धा तो वर्षातून एखाद्या वेळेस रत्नागिरीला सरांना-ताईंना भेटायला यायचा. सविता एक वेळ आली होती. त्यानंतर मागच्या वेळेस सरांच निधन झालं, तेव्हा दोघंही आली होती. दोघांना ताईंच्या हातचं जेवण मनापासून आवडलं. मग ताई भांडी वगैरे आवरायला लागल्या, तेव्हा सविता त्यांच्या मदतीस आली. दोघींनी गप्पा मारत दहा मिनिटांत काम आटोपलं आणि आपल्या खोलीत सविता, राजेंद्र आराम करायला गेली.
हेही वाचा – शिक्षण सेवक वळला आपल्या मूळ व्यवसायाकडे अन्…
साडेचार वाजता कॉफीचा दरवळ घरात पसरला तसे राजेंद्र, सविता उठले. तोंड धुऊन हॉलमध्ये कॉफी प्यायला आले. सविता किचनमध्ये ताईंनी कॉफीचे भरलेले कप आणायला गेली. तिघजण हॉलमध्ये कॉफी पीता पीता गप्पा मारायला लागली.
‘सविता, तुझं माहेर कुठं गं?’
‘निपाणी. निपाणीचे मानवी.’
‘हो का. माझे माहेर बेळगांव. त्यामुळे कोल्हापुरातून बेळगावला जाताना वाटेत निपाणी लागायचं.’
‘तुम्ही बेळगावच्या, मग सर कुठे भेटले?’
‘ते दोन-तीन वर्षे बेळगावच्या कॉलेजात होते. तेव्हाची ओळख!’
‘मग, तुमचा प्रेमविवाह का?’
‘ते जाऊदे, तुम्ही गणपतीपुळ्याला जाणार आहात का?’ बाईंनी सरांचा विषय टाळला हे सविताच्या लक्षात आले.
‘हो, उद्या जाऊ, पण तुम्ही तातडीने आम्हाला का बोलावलं होतं, सहज ना?’
‘ते उद्या बोलू. ‘तुम्ही गणपतीपुळ्याला जाऊन या…’
सायंकाळी राजेंद्र आणि सविता रत्नागिरीत फिरून आले. रत्नागिरीतील आपले कॉलेज, फिजिक्स डिपार्टमेंट, कॅन्टीन वगैरे सर्व राजेंद्रने सविताला दाखविले. दुसऱ्या दिवशी राजेंद्र, सविता पावस गणपतीपुळे फिरून आली. ताईंनी त्यांच्यासाठी चहा भरलेले थर्मास आणि बिस्किटे तयार ठेवली होती. राजेंद्र सविताला म्हणाला, ‘ताईंनी मुद्दाम येऊन जा असे का सांगितले, हे अजून कळले नाही.’
’हो. पण त्या म्हणाल्यात ना मग बोलू म्हणून.’
सायंकाळी 4 वाजेपर्यंत दोघं घरी आले. वाटेत जेवण झाल्याने जेवणाची घाई नव्हती. थोडावेळ विश्रांती घेऊन दोघं पुन्हा ताईंशी गप्पा मारण्याच्या तयारीने हॉलमध्ये आले.
राजेंद्र ताईंना म्हणाला, ‘ताई दोन दिवस राहिलो. आता उद्या दुपारी निघावं म्हणतोय. परवा माझी डेंटिस्टची अपॉइंटमेंट आहे.’
‘हो, तुम्ही आल्याने बरं वाटलं. यावेळी मी तुम्हाला मुद्दाम बोलावलं. सविताला फोन करून तसं सांगितलं होतं.’
‘हो,, म्हणूनच तातडीने आलो. तुम्ही कुठे बाहेरगावी जाताय का? विभाकडे, ऑस्ट्रेलियाला?’ ‘नाही. परदेशी जायला मी फारशी उत्सुक नाही. विभा आणि विघ्नेश यांच बर चाललयं. दोघांनी स्वत: ठरवून लग्न केलयं. दोघंही नोकरी करतात. पैसे मिळतात, खर्चही करतात. मला फोन करतात. हळूहळू सर्व पाशातून मोकळं होणं, हे उत्तम!’
‘मग, कुठे जाताय? बेळगावला माहेरी?’
‘नाही.’
‘मग?’
‘मला तुम्हाला दोघांना काही सांगायच आहे. मी जे सांगणार आहे, ते समजण्याएवढी प्रगल्भता असणारी तुम्ही दोघे आहात, असं माझं मत आहे आणि तुम्ही दोघं मला जवळची पण आहात. विभाचा पण तुम्हा दोघांवर विश्वास आहे. सहा महिन्यांपूर्वी सरांचा मृत्यू झाला त्यावेळी तुम्ही दोघ आला होतात… त्यांच्या अंत्यविधीला तुम्ही होतात…’ एक मिनिट थांबत निश्चयाने ताई पुढे म्हणाल्या…
‘सरांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता…!’
राजेंद्र चित्कारला, ‘काय? …म्हणजे?’
‘म्हणजे, सरांना नैसर्गिक मृत्यू आला नाही. यासाठीच मी तुम्हाला बोलावले. तुम्हाला सर्व मागचा इतिहास सांगायचा आहे.’
क्रमश:
मोबाइल – 9307521152 / 9422381299


