कोबी डोलमासाठी साहित्य
- कोबी – 1 किलो
- तांदूळ – 1 वाटी
- कांदे – पाव किलो
- बेदाणा आणि काजूचे काप – प्रत्येकी पाव वाटी
- मिरे – 1 चमचा
- बडीशेप – अर्धा चमचा
- गरम मसाला – 1 चमचा
- तेल – 1 वाटी
- मीठ – चवीनुसार
कृती
- तांदूळ धुऊन ठेवावेत आणि कांदे बारीक चिरावेत.
- पाव वाटी तेलावर चिरलेला कांदा आणि मिरे टाकून परतून घ्यावे.
- नंतर त्यात तांदूळ घालून परतून घ्यावे.
- तांदूळ थोडे परतल्यावर काजूचे काप, बेदाणा, बडीशेप, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि प्रमाणात पाणी घालून भात शिजण्यास ठेवावा.
- भात शिजल्यावर बाजूला काढून ठेवावा.
- नंतर उकळत्या पाण्यात कोबीचा गड्डा घालून 15 मिनिटे उकळत ठेवावा.
- नंतर कोबी बाहेर काढून, थोडा थंड झाल्यावर कोबीची पाने सुटी करून घ्यावी.
- या कोबीच्या पानांची मधली शीर तासून काढावी.
- अशा प्रत्येक पानावर शिजवून ठेवलेल्या भातापैकी थोडा भात घालून, पानाची गुंडाळी करावी.
- सर्व गुंडाळ्या झाल्यावर त्या एका भांड्यात उभ्या ठेवून, त्यांवर पाव वाटी तेल पसरून घालावे. भांडे नंतर मंद आचेवर ठेवून चांगली वाफ आणावी.
- या गुंडाळ्या म्हणजेच डोलमा होय, डोलमा खावयास देण्यापूर्वी त्यावर अर्धी वाटी तेलाची फोडणी करून घालावी.
हेही वाचा – Recipe : कोकमाचे सार आणि वाफाळता भात…
टीप
- कोबीच्या पानांच्या गुंडाळ्या करण्याऐवजी उकडून घेतलेल्या पानांवर भात घालून त्यांच्या आकर्षक आकाराच्या पुड्या केल्या, तर सजावटीस चांगले दिसते.
संत्र्याच्या भातासाठी साहित्य
- चांगल्या रंगाची मोठी संत्री – 6
- साखर – 3 वाट्या
- तांदूळ – 2 वाट्या
- तूप – 8 चमचे
- मीठ – चवीनुसार
- ऑरेंज कलर – आवश्यकतेनुसार
- ऑरेंज इसेन्स – आवश्यकतेनुसार
हेही वाचा – Recipe : खमंग कोबी, मटार वडी (पानगा)
कृती
- सर्व संत्री मधोमध आडवी कापावी. साल मोडणार नाही, याची काळजी घेऊन संत्र्यांच्या आतील फोडी बाहेर काढाव्या.
- संत्र्याच्या साली बाजूला ठेवून द्याव्यात. त्यांचा उपयोग सजावटीसाठी नंतर करावयाचा आहे.
- काढलेल्या फोडींपैकी काही फोडींचा रस काढावा. रस एक वाटीभर होईल, इतक्याच फोडींचा रस काढावा. बाकीच्या फोडींच्या पाकळ्या हलक्या हाताने काढून घ्याव्यात.
- संत्र्याच्या रसात तीन वाट्या पाणी घालावे. या रसात चार चमचे साजूक तूप आणि चव मोडण्यापुरते मीठ घालावे.
- तांदूळ धुऊन, कोरडे करून ठेवावेत.
- संत्र्याच्या रसाच्या पाण्याचे मिश्रण उकळण्यास ठेवावे. त्यात तांदूळ घालून मऊ मोकळा भात शिजवून घ्यावा.
- भात फार मोकळा झाल्यास थोडे पाणी शिंपडून 2-3 मिनिटे मंद आचेवर ठेवावा.
- तयार भात ताटात पसरून गार करावा.
- साखरेत अर्धी वाटी पाणी घालून पाक करावा. पाकामध्ये ऑरेंज कलर आणि इसेन्स घालावा.
- गार झालेला भात या पाकात घालून मंद आचेवर ठेवावा. 4 चमचे साजूक तूप घालून चांगली वाफ आणावी.
- भाताला संत्र्याच्या फोडींप्रमाणे रंग यावयास हवा. वाटल्यास थोडा ऑरेंज रंग टाकावा.
- भाताला शेवटी वाफ येताना त्यात संत्र्याच्या साली ठेवल्यास संत्र्याचा चांगला वास येतो.
(‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


