स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये इडली आणि डोशाबरोबरच कटलेट आणि केक बनविण्याच्या टिप्स पाहुयात.
- व्हेजिटेबल कटलेट बनवताना, प्रथम कणकेत घोळवून मग ‘ताज्या ब्रेडक्रम्स’मध्ये घोळवा. कटलेट खूप सुंदर होतील.
- केक टिनला तेलाऐवजी लोणी लावून त्यावर ब्रेडक्रंप बारीक चाळणीने चाळून घाला. मग मिश्रण घातल्यास केक झटकन निघतो.
- केकसाठी कोको कमी असल्यास थोडे शिंगाड्याचे पीठ वापरा. रंग चांगला येईल.
- भाजणीची उकड काढून चकल्या केल्यास त्या हलक्या, आरपार कुरकुरीत होतात.
- चिवड्याच्या फोडणीत आले किसून घालावे. वेगळी मजेदार चव येते.
हेही वाचा – Kitchen Tips : बटाटा वेफर्स, ब्रेडरोल अन् दहिवडे करताना या टिप्स वापरा
- पेपर डोसा किंवा मसाला डोसा करताना तव्यावर पीठ पसरल्यानंतर वाफ येऊ लागल्यावर धारदार उलथण्याने कडेला, किंवा मध्यावर जाड थर झाला असेल, तेथील पीठ घासून काढावे. डोसा पातळ आणि कुरकुरीत होतो (वाटी फिरवताना काही ठिकाणी जाड थर येतो), तसेच जाडी सर्वत्र सारखी होते.
- डोशाचे डाळ-तांदळाचे मिश्रण तीन वाट्या असल्यास आंबवताना त्यात मोठी वाटी भरून चुरमुरे घालावे. डोसे पातळ आणि चांगले निघतात.
- इडलीचे पीठ साच्यात घालण्यापूर्वी अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि थोडे पाणी मिसळून पिठात घाला. इडल्या एकदम हलक्या होतील.
- इडली करताना आदल्या दिवशी तांदूळ धुऊन पूर्ण निथळल्यावर कुकरमध्ये पातेल्यात घालून दोन-तीन शिट्ट्या करा आणि वाफवून घ्यावे. नंतर नेहमीप्रमाणे ते तांदूळ आणि उडीदडाळ भिजत घालून नंतर सात-आठ तासांनी मिक्सरमधून जाडसर काढावी. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे इडली तयार करावी. याप्रमाणे इडली तयार केल्यास खूपच हलकी आणि पांढरी होते. त्यात सोडा वगैरे काही घालावे लागत नाही. रेशनचे तांदूळ किंवा कुठलेही तांदूळ चालतात. त्यामुळे इडली रवा आणणे आणि तो स्वच्छ करण्याचे श्रम वाचतात.
हेही वाचा – Kitchen Tips : बटाटेवडे, सामोसे, उडीदवडे बनवताय, मग हे वाचा!
- इडल्या करताना इडलीपात्राला तेल लावू नये. त्याऐवजी स्वच्छ धोतर किंवा जुन्या कॉटन साडीचे छोटे चौकोनी तुकडे कापून ओले करून घट्ट पिळून प्रत्येक साच्यात एक याप्रमाणे घालावेत. इडली अजिबात चिकटत नाहीत व काढायला सोपी जाते. इडलीपात्र स्वच्छ राहते. तेलाचा एक थेंबही लागत नाही. त्यामुळे तेल-तूप वर्ज्य असणाऱ्यांनाही चालते. बचतही होते.


