गो. नी. दांडेकर यांच्या ‘पवनाकांठचा धोंडी’ या कादंबरीची पहिली आवृत्ती 1955 साली प्रसिद्ध झाली आणि 2022मध्ये चौदावी आवृत्ती आली, यावरून तिची लोकप्रियता लक्षात येते. वाचकांच्या हृदयाला स्पर्शून गेलेली ही कादंबरी आहे. मुखपृष्ठावर मुंडासे बांधलेल्या, पिळदार मिशा अन् करारी चेहरा असलेल्या पुरुषाचा चेहरा आहे. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या त्याचे वय आणि अनुभव दोन्ही सांगत आहेत. हिरव्या रंगातल्या मुखपृष्ठावर बैलही दाखवला आहे. बैल, ती व्यक्ती आणि हिरवा निसर्ग यातून चित्रकार कथानक सांगायला सुरुवात करतो आहे, असे वाटते. पुस्तक वाचून झाल्यावर खात्री पटते, धोंडी असाच दिसत असावा. मलपृष्ठावर धोंडी हवालदार या तुंगी गडाच्या रक्षकाच्या वंशजाची ही कहाणी आहे, असे लिहिले आहे. ‘दोन पिढ्यांतला संघर्ष’ हे या कादंबरीचे सार असे म्हटले आहे. माळवी मराठी भाषा इथे वाचायला मिळते, जी आपल्याला परिचित नाही. पण तरीही तिच्यातला गोडवा जाणवतो.
‘पवनाकांठचा धोंडी’ ही बलिदानाची कथा आहे. पवन मावळात तुंगीगड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी धोंडी हवालदाराच्या पूर्वजांना मर्दुमकी गाजवल्याबद्दल हा गड बहाल केला होता. ती परंपरा जीवापाड जपणारा धोंडी हा साधा भोळा, कर्तव्यनिष्ठ, निर्मळ माणूस. त्याची पत्नी सारजा. या दाम्पत्याला झालेले मूल लगेच मृत्युमुखी पडते, त्यानंतर अनाथ झालेल्या दीराला, कोंडीला सारजा मुलगा मानते. या दोघांचे मायलेकाचे प्रेम आहे. कोंडीला दुधाचा व्यापार करून पैसे कमवायचे आहेत आणि धोंडीला हे मान्य नाही. तुंगीच्या हवालदाराने इभ्रतीने, आपल्या घराण्याच्या कीर्तीला साजेलसे वागावे, असे त्याला वाटत असते. पण शेवटी कोंडीच्या हट्टापुढे त्याला नमावे लागते, जे त्याच्या जिव्हारी लागते. धोंडीसाठी घराण्याची इभ्रत सर्वतोपरी आहे आणि कोंडीसाठी धनदौलत!
धोंडीसाठी त्याची जमीन, गाईगुरे हे सुद्धा त्याच्या कुटुंबाचा भाग आहेत. गावातले सगळे लोक त्याचेच आहेत… त्यांची जबाबदारी धोंडीवर आहे. तो आपलं प्रत्येक कर्तव्य निभावतो आहे. सारजाचे धोंडीवर जीवापाड प्रेम आहे. त्यांना ‘विठ्ठल रखमाईचा जोडा’च म्हणत असत. कोंडीच्या दूध विकून मिळालेल्या पैशांचा वापर माझ्या घरात होणार नाही, असे तो निक्षून सांगतो. कोंडीला पैसे घरासाठीच कमवायचे असतात. पैसे कमवून वाहिनीला सोन्याची अंगठी करेन, असं स्वप्न तो बाळगत असतो. तो मित्रांच्या बोलण्यात येऊन वाहत जातो; पण तो मनाने प्रेमळच आहे. त्याच्या वहिनीवर त्याचे आईसारखे प्रेम आहे आणि धोंडीचा धाक आहे. धोंडीचे कोंडीवर अव्यक्त प्रेम आहे. तो त्याच्या फार मोठ्या चुका पदरात घेतो.
हेही वाचा – कोसला… अस्वस्थ तरुणाईचा क्लोजअप
कोंडीची पत्नी सरस्वती सुजाण, बुद्धिमान मुलगी आहे. तिच्यात धोंडीला त्याची आजी दिसते. त्यामुळे घराण्याची इभ्रत राखायला आजीच आली आहे, असे त्याला वाटते. त्याला तिचे खूप कौतुक वाटते. तीही त्याच्या कौतुकाला पात्र ठरते. धोंडी बारदाना (कारभार) तिला सोपवतो. तो सगळ्या व्यवहारातून मन काढून घेतो, विरक्त होतो; पण कर्तव्य करत राहतो. परिस्थिती शांतपणे स्वीकारतो. धोंडी गीतेचं तत्वज्ञान जगतो, असे वाटत राहते. जेव्हा शेतात नांगरणीसाठी गावकरी मदत घेण्याचा आग्रह करतात, तेव्हा तो ती नाकारतो. हवालदाराच्या इभ्रतीला त्याने बट्टा लागेल म्हणून तो सर्वाना विरोध करतो, कुटुंबीयांवर रागावतो. त्याला स्वत:च्या मेहनतीवर, ताकदीवर अधिक विश्वास असतो. त्याला आपल्या जीवनाचे उद्दिष्ट सापडले आहे आणि तो त्यासाठी काहीही करायला तयार आहे. तन, मन, धन अर्पून कार्य करणे ही उक्ती धोंडीसाठीच आहे. जगण्याचे कारण मिळाले की, त्यापुढे काहीच महत्त्वाचे नसते, अगदी प्राण सुद्धा!
कथेत दोन पिढ्यांचा संघर्ष वाढतो, हिंसक वळण घेतो. दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. दोघेही झुकत नाहीत. नावापुरत्या हवालदारकीचे ओझे कोंडीला वाटत असते, जे धोंडीचा अभिमान असते, प्राण असते. कोंडी अपरिपक्व आहे, त्याला जबाबदारीची जाणीव नाही; तसेच हलक्या कानाचा आहे. त्यामुळे कथानकात धक्कादायक घटना घडतात. करूण प्रसंगांनी डोळे पाणवतात. धोंडीचे कणखर व्यक्तिमत्व दिसते. या सर्व घटनांत माणुसकीचे दर्शन होते. निरागस भाबडेपणा, निर्व्याज प्रेम, समर्पण, निष्ठा हे अमूल्य गुण समोर येतात.
हेही वाचा – एव्हरग्रीन… ‘सारे प्रवासी घडीचे’!
असे असूनही बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि तो अटळ आहे, हे जाणवत राहते. बदल न स्वीकारणारा नामशेष होतो, हाही नियमच! मग धोंडीने बदलायला नकार दिला, हे त्याचे चुकले का? असा प्रश्न कदाचित पडू शकतो. त्याने प्राण पणाला लावायला हवे होते का? या प्रशाचं उत्तर शोधण्यआधी तो शेतकरी आहे, काळ्या आईवर प्रेम करणारा आहे, हे विसरू शकत नाहीत. वसंत बापट यांनी एका कवितेत म्हटलं आहे,
धिक् तुमचे स्वर्गही साती
इथली चुंबिन मी माती
या मातीचे कण लोहाचे, तृणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातून अजुनी वाहतसे लाव्हा सगळा
कादंबरीचा शेवट शोकात्म आहे. ग्रामीण भागातल्या साध्या शेतकऱ्याचं आयुष्य कथेतून दिसतं. कितीतरी माहीत नसलेले शब्द आहेत, पण संदर्भाने अर्थ लागतो. शहरी माणसाला फारसा परिचित नसलेला हा अनुभव आहे. ही कादंबरी पूर्ण वाचायला हवी. अगदी मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत! भारतीय तत्वज्ञानाची झलक यातून अनुभवायला मिळते… म्हणून ही कादंबरी वाचायला हवी.


