कामिनी व्यवहारे
भारतात सर्वत्र सुरणाची भाजी केली जाते. सुरणाच्या औषधी गुणांमुळे ‘सर्वेषा कन्दशाकाना सुरण: श्रेष्ठ: उच्चते।’असे भावप्रकाशात म्हटले आहे. याचा अर्थ सर्व कंदवर्गीय भाज्यांमध्ये सुरण श्रेष्ठ आहे. त्याची ‘कन्दनायक’ अशी सुद्धा ओळख आहे. सुरणात अ, ब तसेच क ही जीवनसत्त्वे आहेत. त्याच्या कंदाची आणि पानांची भाजी तसेच काप-कटलेटस सुद्धा करतात. सुरणाचे फूल, कंद, पाने आणि दांडा या सर्वांचा आहारात वापर करतात. त्याच्या कंदात कॅल्शियम ऑक्झॅलेट असल्याने खाज येते. हा खाजरेपणा घालविण्यासाठी त्याचे तुकडे चिंच किंवा आमसुलाच्या पाण्यात भिजत ठेवतात किंवा उकडतात.
पुरवठा संख्या – 4 ते 5 व्यक्तींसाठी
साहित्य
- सुरण – अर्धा किलो
- टोमॅटो – पाव किलो
- कांदे – पाव किलो
- धणे – 1 चमचा
- जिरे – अर्धा चमचा
- काश्मिरी मिरच्या – 5 ते 6
- आले – 1 लहान तुकडा
- लसूण – 5 ते 6 पाकळ्या
- जायपत्री – थोडीशी
- जायफळ पूड – चिमूट भर
- तूप – 2 चमचे
- मीठ – चवीपुरते
तयारीसाठी लागणारा वेळ – 20 मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ – 20 मिनिटे
एकूण कालावधी – 40 मिनिटे
हेही वाचा – Recipe : केळफुलाचे वडे ट्राय केले आहेत का?
कृती
- सुरणाचे मोठ्या आकाराचे चौकोनी तुकडे करावेत आणि थोड्या मिठाच्या पाण्यात वाफवून घ्यावेत.
- कांदा बारीक चिरून घ्यावा आणि मिरच्यांच्या बिया काढून टाकाव्यात.
- मिरच्या, आले, लसूण, धणे, जिरे आणि थोडासा कांदा बारीक वाटून घ्यावा.
- टोमॅटो मिनिटभर उकळत्या पाण्यात टाकून लगेच गार पाण्यात टाकावेत आणि साल काढून बारीक चिरून ठेवावेत.
- गॅसवर भांडे ठेऊन, त्यात तूप टाकून मंद आचेवर कांदा बदामी रंगावर परतून घ्यावा.
- नंतर त्यात वाटलेला मसाला घालून परतून घ्यावे, पाण्याचा एक शिपका द्यावा.
- मसाल्याचा खमंग वास आल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्यावे.
- चवीपुरते मीठ घालून त्यात वाफवलेला सुरण आणि थोडे पाणी घालावे.
- त्यात जायपत्री आणि जायफळाची पूड घालून एक मिनिट वाफ येऊ द्यावी.
- आवडत असेल तर त्यात 2 थेंब लाल रंग टाकू शकतो.
हेही वाचा – Recipe : खमंग मटार करंजी
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
तथापि, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.


