मागील तीन लेखांत आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील हस्त व्यवसाय या विषयाची
सविस्तर माहिती घेतली. आता या आणि पुढील लेखांत आपण बालशाळेतील अभ्यासक्रमातील भाषा शिक्षण या अत्यंत महत्त्वाचा विषयासंबंधी जाणून घेणार आहोत. यात मातृभाषा शिक्षण गृहीत धरले आहे.
मनातील भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे भाषा. सगळ्यांशी संवाद साधण्याचे हे साधन आहे. यातूनच भाषा शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित होते या लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील भाषा शिक्षण या विषयाची खेळगट या वर्गासंबंधित जाणून घेणार आहोत.
वास्तविक, मुलांचे भाषा शिक्षण जन्मापासूनच सुरू होते. आई आपल्या बाळाशी सतत बोलण्यातून संवाद साधत असते. तसेच, घरातील कुटुंबीय देखील बाळाशी बोलत असतात. यातूनच मुलाच्या भाषा शिक्षणाचा श्रीगणेशा होतो. काही मुलं लवकर बोलायला सुरुवात करतात, तर काही उशिरा. मुलं त्यांच्याशी बोललेलं सगळं ऐकत असतात आणि मनात साठवत असतात, याची नोंद मुलांच्या मेंदूत होत असते. यातूनच मग मुलं भाषेद्वारे बोलायला लागतात. यावरून मुलांशी सतत बोलत राहण्याचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटासाठी हस्त व्यवसाय
खेळगटात आलेली बहुतांशी मुलं बोलू शकतात. मुलांचा शब्दसंग्रह वाढवण्यासाठी खेळगटात विविध उपाय योजना अमलात आणल्या जातात.
- बडबडगीते
- गप्पागोष्टी
- मुलांना माहीत असलेल्या गोष्टींविषयी संवाद
मुलांना नवीन गोष्टी माहीत करून देण्यासाठी संवाद
या उपाय योजनांबद्दल आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात.
- वर्ग सुरू झाल्यावर मुलांना हात जोडून ‘नमस्ते’ म्हणणे आणि मुलांना तसे करायला शिकवणे. यातूनच मुलं शब्द आणि कृती यांचा समन्वय साधण्यास शिकतात.
- खेळगटातील मुलांना सतत बोलण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागते. मुलांना बडबडगीतातील ताल आणि लय आवडते, म्हणून मुलं बडबडगीते आवडीने म्हणतात. हळूहळू मुलांना बडबडगीतातील शब्दांचे अर्थ समजावून सांगितले जातात. तसेच, तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा आले की, मुलांचा मेंदू त्यांची नोंद घेत असतो.
- रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी गप्पागोष्टींचा तास नक्की घ्यावा. मुलांनी सुट्टीच्या दिवशी काय-काय केलं, असं विचारून बोलण्यास उद्युक्त करावे.
- मुलांचा काल, आज आणि उद्या यात गोधळ होतो. मुलांकडून ते सुधारून परत म्हणून घ्यावे. मुलं मग हळूहळू समजून घेऊन तयार होतात.
- मुलांना माहीत असलेल्या विषयांबद्दल त्यांच्याशी बोलावे. उदाहरणार्थ, घर, घरातील सदस्य इत्यादी. यासाठी मुलांबरोबर वैयक्तिक संवाद साधावा. जिथे मुलांना सांगता येत नसेल, तिथे त्यांना प्रेरित करून बोलते करावे.
- मुलांना खेळायला दिलेल्या साधनांची आणि खेळांची नावे प्रत्येक वेळेस आवर्जून सांगावीत. यातूनच मुलांना समजायला लागेल.
- मुलांना बाग आवडते आणि ती बागेत नेहमीच जातात. मुलांशी बागेतील झाडं, फुलं, वेली, विविध खेळणी याविषयी बोलावे.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटासाठी हस्त व्यवसाय
थोडक्यात, मुलांना माहीत असलेल्या तसेच माहीत करून दिलेल्या विविध गोष्टींबद्दल वारंवार प्रश्न विचारून उत्तरे देण्यास शिकवावे. असे केल्यास मुलांचा शब्दसंग्रह वाढत जाऊन त्यांची आकलन शक्ती देखील वृद्धिंगत होईल.
पुढील लेखात आपण शिशुगटातील भाषा शिक्षण या विषयाबाबत जाणून घेणार आहोत.
क्रमश:


