मागील लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील हस्त व्यवसाय या विषयाची शिशुगट या वर्गासंबंधित सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील हस्त व्यवसाय या विषयाची बालगट या वर्गासंबंधित जाणून घेणार आहोत.
बालगटातील मुलं आता थोडी मोठी झालेली असतात. बाई आपल्याला काय सांगतात, कशी कृती करायला सांगतात, याकडे मुलं आता लक्ष देऊन ऐकतात. मुलांना आता तेवढी समज आलेली असते. म्हणून मुलांना जरा अवघड स्वरुपाचा हस्त व्यवसाय देण्यात येतो. हस्त व्यवसायात कागदकाम, ठसेकाम आणि चित्रकला या तीन प्रमुख उपक्रमांचा समावेश करण्यात येतो. आता आपण या उपक्रमांबद्दल माहिती घेऊयात –
कागदकाम
फाडकाम आणि चुरगाळाकाम
सुरुवातीला मुलांकडून फाडकाम आणि चुरगाळाकाम याची उजळणी करून घ्यावी. मुलं आता ही कामे सफाईने करू लागतात.
चिकटकाम
कागदाचे केलेले छोटे तुकडे आणि घट्ट चुरगाळे हस्त व्यवसाय वहीत चिकटवायला मुलांना सांगितले जाते. शिक्षिकेने मार्गदर्शन करण्याऐवजी फक्त देखरेख करावी. बहुतेक सर्व मुले थोड्या प्रमाणात डिंक वापरून रंगसंगती साधून स्वतःच्या मनाने एखादे डिझाइन ठरवून चिकटकाम करतात.
घडीकाम
शिशुगटात शिकवलेली चौरस कागदाची रुमालाची घडी, आयताकृती कागदाची पंख्याची घडी याची मुलांकडून उजळणी करून घ्यावी. मुलं आता चौरस आणि आयत या आकारांनुसार वर्गीकरण करतात का? याचे शिक्षिकेने निरीक्षण करून नोंद करून ठेवावी. चौरस आणि आयत या आकृतींची माहिती हा गणित विषयाचा भाग आहे.
यानंतर मुलांना कागदाच्या घड्या घालून कपबशी, घर, कुत्र्याचे कान असे आकार करायला शिकवले जाते. मुलांकडून केलेल्या कागदांच्या अशा घड्या त्यांची नावे घालून हस्त व्यवसाय वहीत चिकटवून घेतल्या जातात.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटासाठी हस्त व्यवसाय
ठसेकाम
मुलांना भेंडी, हाताची बोटे, कापसाचे बोळे, झाडांची छोटी-छोटी पाने यांचे ठसे द्यायला सांगावे. मुलं आता सरावाने आकर्षक रंगसंगती आणि डिझाइन स्वतःच्या मनाने करून ठसेकाम करतात.
चित्रकला
चित्र काढणे
- शिशुगटात मुलं गोलातील तसेच चौकोनातील चित्रे काढण्यास शिकतात. आता स्थुलातून सूक्ष्माकडे या तत्वानुसार मुलांना अवघड चित्रे काढण्यास शिकवावे. यासाठी फळ्यावर चित्रे अवश्य काढावीत.
- यानंतर मुलांना गोल, चौकोन, सरळ रेषा यांचा उपयोग करून माणसाची आकृती आणि इतर चित्रे काढण्यास शिकवतात.
- यानंतर मुलांना देखावा प्रकारात डोंगर, त्याच्यामागून उगवणारा सूर्य, आकाशात पक्षी, डोंगराच्या पायथ्याशी वाहणारी नदी, नदीकाठची घरे अशी चित्रे काढून देखावा पूर्ण करण्यास शिकवले जाते.
- मुलांकडून नंतर झाडं, फुलं, पानं, घसरगुंडी, झोपाळा इत्यादी चित्रे काढून बागेच्या देखाव्याचे चित्र काढण्यास शिकवतात.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटासाठी हस्तव्यवसाय
चित्र रंगवणे
बालगटातील मुलांना थोडी अवघड चित्रे रंगविण्यास देता येतात. चित्र रंगविण्यासाठी खूप पुस्तके बाजारात उपलब्ध असतात. या पुस्तकांत देखील स्थुलातून सूक्ष्माकडे याच तत्वाचा अवलंब केलेला दिसून येतो. मुलांना फुलं, पाकळ्या, आकाशकंदिल, सोपी रांगोळी, फुग्यांचा गुच्छ अशा प्रकारची चित्रे रंगविण्यास देतात. चित्रं खूप मोठी असू नयेत, ही काळजी मात्र अवश्य घ्यावी.
बालगटातील हस्त व्यवसायातून स्नायू नियंत्रण, रेषाकृतींचा परिचय, रंग ओळख, नीटनेटकेपणा, कल्पकता, एकाग्रता अशा अनेक गोष्टी साधल्या जातात.
थोडक्यात सांगायचे झाल्यास, बालगटातील मुलांची हस्त व्यवसायाच्या विविध उपक्रमांतून अधिकाधिक प्रगती होते आणि यातूनच मुलांना शिक्षण मिळत राहते.
पुढील लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील ‘भाषा’ या विषयाबाबत जाणून घेणार आहोत.
क्रमश:


