Thursday, January 15, 2026

banner 468x60

Homeललितकोसला… अस्वस्थ तरुणाईचा क्लोजअप

कोसला… अस्वस्थ तरुणाईचा क्लोजअप

वाचनाची आवड असलेल्याने भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’ वाचली नाही, याची शक्यता कमीच! वाचली नसेल तरी ऐकलं तरी असेलच!! मराठी कादंबरी म्हटली की, या कादंबरीचा संदर्भ येतोच. या कादंबरीची अनेकदा समीक्षा झाली आहे. अनेकांनी मत व्यक्त केले आहे… इतकी की, त्यावरच एक पुस्तक होऊ शकेल! असेल सुद्धा… मराठी वाचकांच्या मनावर अजूनही या कादंबरीचे गारूड आहे. पु.लं.नी म्हटलं होत की, ‘या कादंबरीने साहित्यिकांना खडबडून जागं केलं.’ मीही ही कादंबरी वाचली, कारण घरात इतरांना वाचताना पाहिलं आणि चर्चा करताना ऐकलं म्हणून. आठवी, नववीत असताना वाचली असेन. त्यावेळी मला ती अपूर्ण वाटली होती. बाबांना मी म्हटलं होतं की, यात शेवट काही होतच नाही, अर्धवट राहिली आहे. यावर पुरेसं हसून झाल्यावर त्यांनी मला कोसला समजावून सांगितली होती.

नंतर ही कादंबरी अनेकदा वाचली, आवडत गेली. Gen z नी, नव्या पिढीने ही कादंबरी वाचली तर त्यांना त्यात नाविन्यपूर्ण काही वाटणार नाही, कारण अशा प्रकारचं लेखन नंतर झालं. पण या कादंबरीचं मोठेपण काळाच्या चौकटीत तपासून पाहायला हवं. कोसला आधीच्या कादंबऱ्या कालिदासी पद्धतीच्या होत्या. प्रेमकथा… धक्कादायक शेवट, प्रारंभ, मध्य, समारोप… किंवा समस्या आणि उकल वगैरे प्रकारात लेखन होत होते. कोसला याहून अगदी वेगळी आहे.

मुखपृष्ठ काळ्या पांढऱ्या रंगात असून खुर्चीवरचा शर्ट मळक्या पिवळ्या रंगाचा आहे, जो नजरेत भरतो. होस्टेलची खोली, मोठी खिडकी, समोर निष्पर्ण खराटे झालेलं जाड बुंध्याचं झाड, टेबल खुर्ची, दौत, कागद, पेन, भिंतीवर हाताचे निळ्या रंगाचे ठसे आणि खुर्चीखाली पिवळट चिंध्या चित्रात दिसतात…

अर्पण पत्रिकेपासून मनात प्रश्न निर्माण व्हायला सुरवात होते. पहिले वाक्यच ‘मी उदाहरणार्थ पंचवीस वर्षांचा झालो. उदाहरणार्थ, थोर, वगैरे असे शब्द त्यांनी वारंवार वापरले आहेत… ज्यामुळे वाक्याच्या अर्थाची छटा बदलते. विशेषणांचे अर्थ बदलतात!

‘बाई मृताचे धर्म : जिवतां प्रति : कैसे निरूपावे॥‘ श्रीचक्रधर स्वामींचे सुक्त लिहून ते भूतांना म्हणतात की, हे भटकत्या भूता, तू ये म्हणजे माझी सुटका होईल आणि तू मार्गस्थ होशील. हे वाचल्यावर कादंबरी आपल्याला कळेल की नाही, याची शंका येते आणि उत्सुकताही वाटू लागते.

पांडुरंग सांगवीकर हा खेड्यातला तरुण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकायला येतो. घरून संपन्न, पण कंजूष शेतकऱ्याच्या या मुलाने भरपूर शिकावे, अशी पालकांची इच्छा असते. वडील नेहमी घालून पाडून बोलत असल्यामुळे त्यांच्यावर राग असतो आणि आईवर प्रेम असते. कॉलेजात आल्यावर त्याला खेडवळ असल्याचा न्यूनगंड होतो. त्यावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांत भाग घेऊ लागतो. निवडणुकीत दणदणीत विजयी होतो. वक्तृत्व मंडळाचा सेक्रेटरी होतो. स्वतःला सिद्ध करण्याची धडपड करताना पैशांची तंगी होते. सरळ स्वभावामुळे पैसे बुडतात. त्याला काही खास मित्र मिळतात. मुलींना घाबरणारा तो हळूहळू मुलींशी बोलायला लागतो. जे होस्टेलवर राहिले आहेत, त्यांना कोसलातले विनोद, विशेषत: खाण्याबद्दलचे अधिक कळत असतील. कॉलेजमधल्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात वेळ गेल्यामुळे शेवटचा महिनाभर अभ्यासाला उरतो, तेव्हा पांडुरंग झटून अभ्यास करतो.

हेही वाचा – एव्हरग्रीन… ‘सारे प्रवासी घडीचे’!

“परंतु सध्या उपलब्ध माहितीनुसार महामहोपाध्याय गिरीजाशंकर मार्तंड यांचे असे मत आहे, की, हे लोक वर्षभर विद्यापीठात अभ्यास करीत… ते कशासाठी? तर शेवटी एक परीक्षा नावाची एकत्र जमून सर्वांनी एकाच प्रश्नपत्रिकेची उत्तरे द्यावयाची वस्तू, जी सर्व अभ्यासू गृहस्थ नीट देत… पाच वर्षांपूर्वी महामहोपाध्यायांनी हे मत जनतेसमोर मांडले, तेव्हा सर्वांनी त्यांना वेड्यात काढले. परंतु आज त्यांचे मत सर्वमान्य झाले आहे…”

इसवी सन नऊ हजार साली लोक सध्याच्या संस्कृतीबद्दल काय बोलतील त्याची कल्पना करून सुरेश आणि पांडुरंग दोघे बोलत असत. कादंबरी वाचताना हा भाग फारच गमतीशीर वाटतो.

धाकटी बहीण मनी, प्लेगने जाते तेव्हा लेखक हळवा होतो. कशावर संतापावे कळत नाही. हा प्रसंग मनाला लागून राहतो. लेखक लिहितो, “तिच्याबरोबरच तिचं इवलंस गर्भाशय गेलं. तिनं एक मोठ्ठीच खानेसुमारीची ओळ वाचवली.” हे वाचून आतून गलबलून जायला होतं.

अजंठा लेण्यातला बुद्ध, सिंहगड पायऱ्यांवरून न उतरता घसरत उतरण्याचा अनुभव, मला भाऊ आहेत म्हणून मी हे साहस करणार, असे म्हणणारा सुरेश, टेकड्यांवर भटकंती, वेताळाचा डोंगर, पोलिसांनी पकडून नेऊन कोठडीत ठेवणे, त्यावेळी भविष्यकाळात इस 9000मध्ये जाऊन ‘’आता सरकार म्हणजे काय? तर प्रत्येक देशाचे एकेक सरकार असे. आठ-दहा म्हातारी मंडळी एकत्र जमून पगार घेऊन देशाचा जमाखर्च वगैरे पाहात, कधीकधी दोनचार सरकारांच्या मारामार्‍या होत, ह्याचा अर्थ असा नव्हे की, ही म्हातारी मंडळी स्वतः मारामारी करीत. अगोदर काही तरी भांडण उकरून हे म्हातारे वेगळ्याच तरुण मजबूत सैनिकांना सरहद्दीवर पाठवून आपण मात्र गच्चीवरून मजा पहात बसत…’ अशी बडबड रात्रभर करून त्यांना जेरीस आणणे अशा प्रसंगांतून लेखक होस्टेलच्या दिवसांबद्दल सांगत राहतो. हे अनुभव जिवंत वाटतात. सगळ्यात चांगली कविता गाणंच असते. कादंबरी म्हणजे फसलेलं महाकाव्य. लघुकथा म्हणजे फसलेली गोष्ट. तशी कविता म्हणजे हल्ली फसलेलं गाणंच, असेही कथेच्या ओघाने सांगतो. सिगरेटचा धूर दिसतो म्हणून सिगरेट पितो, चहा पिवळ्या रंगाचा असता तर प्यायलो नसतो, असे म्हणतो.

त्याने लिहिलेली रोजनिशी पुढे येते. प्रत्येक दिवशी एक दोन ओळीच लिहिल्या आहेत. तो त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाशी वाद घालतो. सगळे मित्र काही न काही कारणाने तोडतो. एक मुलगी त्याच्यात रस घेते तेव्हा तिचा अपमान करतो. पैशांची गरज नसताना नोकरी शोधायला मुंबईला जातो. थोडक्यात स्व‍च्छंद जगतो. कधी सपाटून अभ्यास करतो तर, कधी अजिबात करत नाही. भरपूर वाचन करतो. तो बुद्धिमान आहे, हे जाणवत राहातं.

नंतर तो गावात परत येतो, तेव्हा त्याला वेळ कसा घालवावा, ही समस्या असते. लोकांच्यात न मिसळणारा तो दुकानावर जाऊन उभा राहायला लागतो. लालजी, सुदाम्या, चक्रधर मास्त, दगडू, डॉक्टर, गोमाजी सोनार, सोटम्या, गिरधर, लखम्या, झगडू अशा काही व्यक्तिरेखांचं वर्णन येतं. तेही खास शैलीत. वडिलांचा दरारा असतो. त्यांना सन्मान असतो. वडील त्याला वेडेवाकडे बोलणे बंद करतात, तेही त्याला आवडत नाही. पण हा कुठलेच काम मनापासून करत नाही. चित्रविचित्र सवयी असलेल्या लोकांमध्ये मिसळतो. त्याच्या डोक्यात असंख्य उलटसुलट विचार येतात. पण त्याची वाद घालायची सवय सोडून देऊन तो सर्व गोष्टींना, सर्वांना होय म्हणायला लागतो. एवीतेवी ऐकावे लागणारच आहे तर, उगाच वाद कशाला? इतकी वर्षे काढली तशी पुढची काढू. एक बाबा त्याला सांगतो की, सर्वात नवी गोष्ट मरण असते. त्याच्या मित्राला आणि त्यालाही पटत नसल्याने मित्र वाद घालतो आणि हा बाबाच्या म्हणण्याला संमती देतो. वय गेलं असं हे अवांतर म्हणतात. ते मात्र उदाहरणार्थ बरोबर नाही. आणखी पुढे नाना वर्षं आहेतच. वर्षं नीट असतातच, असं लिहून कादंबरी संपवली आहे.

हेही वाचा – जापनीज वाइफ… अजब प्रेम की गजब कहानी!

खरंतर शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या, अपयशी ठरलेल्या, खेड्यातून शहरात शिकायला गेलेल्या एका मुलाची ही कहाणी आहे. शिक्षण अपूर्ण ठेवून वडिलांचे बरेच पैसे फुकट घालवून खेड्यात परत आल्यावर तिथेही कुठलेच काम धड करू न शकणारा हा मनातून अस्वस्थ झालेला मुलगा आहे. त्याला आयुष्यात काय करायचं आहे, हे माहीत नाही… कशात रस नाही, मुळात काही करायची इच्छा सुद्धा नाही. तो काही प्रश्न विचारतो, काहींची उत्तर आपल्या खास शैलीत देतो… पण मनात खळबळ उडवून देतो! विचार करायला भाग पाडतो. समाजातल्या कुप्रथांवर घाला घालतो. या कादंबरीत अस्वस्थ तरुणाईच्या मनाचा, चेहर्‍याचा क्लोजअप घ्यावा, तसा फोटो काढला आहे.

झालीस तू माझ्या अंगावरची खूण माझी ओळख माझं आडनाव

आता तुझ्याशिवाय मला कोणी ओळखत नाही

बसलीस उरावर.

कैकांच्या कादंबर्‍या,

त्यांच्याबरोबर सती जातात,

तू मात्र मला पुरून ऊर.

असं त्यांनी एका कवितेते कोसलाबद्दल लिहून ठेवलं आहे. असं इतकं काय आहे या कादंबरीत की पन्नास वर्षांहून अधिक काळ मराठी साहित्यात मानाचं स्थान टिकवून आहे? हा प्रश्न पडला असेल… उदाहरणार्थ असा प्रश्न वगैरे पडणे स्वाभाविक आहे त्यासाठी कादंबरी वाचायला हवी. पुन्हा पुन्हा.

डॉ. अस्मिता हवालदार
डॉ. अस्मिता हवालदार
डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!