वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
तेथ हृदयकोशातळवटीं । जो पवनु भरे किरीटी । तया सगळेयाचि मिठी । देऊनि घाली ॥229॥ मुखींचां ज्वाळीं । तळीं वरी कवळी । मांसाची वडवाळी ।आरोगूं लागे ॥230॥ जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाउस । पाठी एकदोनी घांस । हियाही भरी ॥231॥ मग तळवे तळहात शोधी । ऊर्ध्वीचे खंड भेदी । झाडा घे संधी । प्रत्यंगाचा ॥232॥ आधार तरी न संडी । परि नखींचेंही सत्त्व काढी । त्वचा धुऊनि जडी । पांजरेंशीं ॥233॥ अस्थींचे नळे निरपे । शिरांचे हीर वोरपे । तंव बाहेरी विरूढी करपे । रोमबीजांची ॥234॥ मग सप्तधातूंचां सागरीं । ताहानेली घोट भरी । आणि सवेंचि उन्हाळा करी । खडखडीत ॥235॥ नासापुटौनि वारा । जो जातसे अंगुळे बारा । तो गचिये धरूनि माघारा । आंतु घाली ॥236॥ तेथ अध वरौतें आकुंचे । ऊर्ध्व तळौतें खाचे । जया खेंवामाजि चक्रांचे । पदर उरती ॥237॥ एऱ्हवीं तरी दोन्ही तेव्हांचि मिळती । परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती । ते तयातें म्हणे परौती । तुम्हीचि कायसीं एथें ॥238॥ आइकें पार्थिव धातु आघवी । आरोगितां कांहीं नुरवी । आणि आपातें तंव ठेवी । पुसोनियां ॥239॥ ऐसी दोनी भूतें खाये । ते वेळी संपूर्ण धाये । मग सौम्य होऊनि राहे । सुषुम्नेपाशीं ॥240॥ तेथ तृप्तीचेनि संतोषें । गरळ जें वमी मुखें । तेणें तियेचेचि पीयूषें । प्राणु जिये ॥241॥ तो आगीआंतूनि निघे । परि सबाह्य निववूंचि लागे । ते वेळीं कसु बांधिती आंगें । सांडिला पुढती ॥242॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसी शरीराबाहेरलीकडे, अभ्यासाची पाखर पडे…
अर्थ
अर्जुना, हृदयकोशाच्या खालच्या बाजूस जो वारा भरलेला असतो, त्या सगळ्या वायूस ती (कुंडलिनी शक्ती) खाऊन टाकते. ॥229॥ मुखाच्या ज्वाळांनी खालीवर व्यापते आणि मांसाचे घास खावयास लागते. ॥230॥ जे जे ठिकाण मांसल असेल त्या ठिकाणी वरच्या वरच मोठा लचका तोडते; शिवाय हृदयाच्या ठिकाणचे सुद्धा एक दोन घास काढते. ॥231॥ नंतर तळहात आणि तळपाय यातील रक्त, मांस वगैरे खाऊन वरच्या भागांचे भेदन करते आणि प्रत्येक अंगाच्या सांध्याचा झाडा घेते. ॥232॥ आपला आश्रय तर सोडीत नाही, पण तेथेच राहून नखांचे देखील सत्व काढून घेते आणि त्वचा धुऊन पुसून त्या त्वचेला हाडांच्या सापळ्यास चिकटवून ठेवते. ॥233॥ हाडांच्या नळ्या निरपून घेते आणि शिरांच्या काड्या काड्या ओरपून घेते. त्यावेळी बाहेरच्या केसांच्या बीजांची वाढ होण्याची शक्ती जळून जाते. ॥234॥ मग तहानेने पीडित अशी ती सप्तधातूंचा समुद्र एका घोटात पिऊन टाकते आणि लागलीच शरीरात जिकडे तिकडे खडखडीत उन्हाळा करते. ॥235॥ दोन्ही नाकपुड्यातून बारा बोटे वाहात असलेल्या वायूला गच्च धरून त्यास आत मागे घालते. ॥236॥ तेव्हा खालचा अपानवायू वरती आकुंचित होतो आणि वरचा प्राणवायू खाली खेचतो, त्या प्राणापानांच्या भेटीमध्ये षट्चक्रांचे नुसते पदर तेवढे उरतात. ॥237॥ एर्हवी तरी प्राण आणि अपान या दोहोंचा तेव्हाच मिलाफ झाला असता, परंतु कुंडलिनी तेथे क्षणभर क्षोभलेली असते. म्हणून ती त्यांना म्हणते, तुम्ही येथे कोण? चालते व्हा. ॥238॥ अर्जुना, ऐक. पृथ्वीचे सर्व धातू खाऊन काहीएक शिल्लक ठेवीत नाही आणि पाण्याचा भाग तर तेव्हाच चाटून पुसून टाकते. ॥239॥ याप्रमाणे पृथ्वी आणि जल, ही दोन्ही भूते खाल्ल्यावर तिची संपूर्ण तृप्ती होते आणि मग ती शांत होऊन सुषुम्नेजवळ राहाते. ॥240॥ त्यावेळी तृप्त होऊन समाधान झाल्यावर ती तोंडाने जे गरळ ओकते, त्या गरळांतील अमृताच्या योगाने प्राणवायू जगतो. ॥241॥ तो गरळरूपी अमृताचा अग्नी तिच्या तोंडातून निघतो खरा, परंतु तो अग्नी ज्यावेळस आत आणि बाहेर शांतच करू लागतो, त्यावेळेस सर्व गात्रांची गेलेली शक्ती पुन्हा येऊ लागते. ॥242॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तेथ नक्षत्र जैसें उलंडलें, कीं सूर्याचें आसन मोडलें…


