शोभा भडके
भाग – 2
“ए नकटेSS… उठ… घर आलं,” पवनने तिला आवाज दिला. राम आणि त्याने गाडीतून सामान खाली घेतलं.
आरू आळस देत खाली उतरली आणि त्या दोघांच्या पाठोपाठ गेली. दारातच आत्या उभी होती. आत्याला पाहून आरूने पुढे होऊन पाया पडली, त्यावर ‘सुखी राहा’, असा आशीर्वाद देत आत्याने तिच्या गालावरून हात फिरवून, बोटे मोडून तिची दृष्ट काढली.
“कसा झाला प्रवास?” आत आल्यावर आत्याने त्या दोघांना विचारलं.
“छान झाला…” दोघांनी सोबतच सांगितलं.
“बरं… थकला असाल तर जाऊन फ्रेश होऊन या, मी चहा टाकते दोघांसाठी.”
“मला आत्ता नको आत्या… मी थोडावेळ झोपतो, प्रवासात नीट झोप झाली नाही,” राम म्हणाला.
“बरं. तू पवनच्या रूममध्ये जाऊन आराम कर…” असं रामला सांगून सांगून आत्या किचनमध्ये गेली.
“ए नकटे! तू काय आता इथ लोळत पडणार आहेस का?” पवन तिला चिडवत म्हणाला.
“काय ओ दाजी… काय लावलंय तुम्ही आल्यापासून नकटी नकटी… किती छान नाव आहे माझं!” ती लटक्या रागात म्हणाली.
“हां, मग नकटीला नकटी नाही तर काय म्हणणार?” पवन तिच्या डोक्यात टपली मारत म्हणाला.
“काय चाललंय इथं? … आणि काय रे का चिडवतोयस तिला?” मामा बाहेर येऊन त्याचा कान धरत म्हणाले.
“बघा ना मामा कसा चिडवतो मला ते!” अगदी नाटकीपणे तोंडावर हिरमुसल्याचा भाव आणत तिने तक्रार केली आणि मामाने त्याचा कान अजून जोरात पिरगळला.
“आSSS बाबा दुखतंय… सोडा ना…” पवन कळवळत ओरडला आणि तिने त्याला जीभ काढून वाकुल्या दाखवल्या. त्यानेही “बघून घेईन तुला” असा लूक देत खुन्नस दिली. त्यावर तिने तोंड वाकडं करून दाखवलं.
“अहो, काय गोंधळ लावलाय हा,” आत्या चहाचा ट्रे हातात घेऊन येतं म्हणाली.
ती आली तसं सगळे शांत झाले. मामाने पवनला सोडलं आणि चहाचा कप उचलला. आरुनेही चहा घेतला. पवनला जॉबवर जायचं होतं, त्यामुळे त्याचं आवरायला रूममध्ये निघून गेला.
मामा आणि आत्याने आरुची तसेच घरच्यांची चौकशी केली. थोडा वेळ बसून आरूही भावाच्या रूममध्ये निघून गेली.
“बरं, भावना कधी येणार आहे?” मामाने विचारलं.
“आज येईल संध्याकाळपर्यंत…” आत्या.
थोडावेळ बोलून दोघे आपापल्या कामाला लागले.
“कायSSS? हा काय मूर्खपणा आहे आता!” शिव फोनवर मोठ्याने ओरडत होता.
” ….. ……” समोरून काहीतरी बोलणं झालं. त्यावर शिवनं, “हं… येतोय,” एवढंच म्हणून फोन कट केला आणि रागात समोरच्या टेबलवरचा फ्लॉवरपॉट उचलून जमिनीवर आदळला!
“अरे ए… कोणाचा राग त्या बिचाऱ्या फ्लॉवरपॉटवर काढतोयस?” असं केबिनचं दार उघडून आत येतं आकाशनं विचारलं.
शिवने डोळे बंद करून शांत होण्याचा प्रयत्न केला… एक दीर्घ श्वास घेत डोळे उघडले आणि टेबलवर ठेवलेला मोबाइल आणि ब्लेझर घेऊन “मी घरी जातोय…” एवढं म्हणून निघून गेला.
आकाश त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात राहिला. मान हलवत त्याने पूर्ण केबिनवर नजर फिरवली आणि पिऊनला बोलवून काही गोष्टी आवरायला लावल्या आणि तो आपल्या केबिनमध्ये निघून गेला.
आकाश हा शिवचा मित्र आणि मॅनेजर, पीए… सर्व काही होता! शिवनंतर तोच सगळं ऑफिस सांभाळायचा.
शिव ताडताड पावलं टाकत ऑफिसमधून बाहेर पडला आणि त्याला पाहताच त्याचा ड्रायवर जीवन त्याच्यासमोर गाडी घेऊन आला… जीवन खाली उतरून दार उघडायच्या अगोदरच शिवने दार उघडलं आणि मागे जाऊन बसत त्याला गाडी घराकडे घ्यायला सांगितली. तो मागे सीटला डोके टेकवून डोळे मिटून शांत पडला… त्याबरोबर सियाचा रडवेला चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला… आणि आता तो विचार करू लागला… “का बाबा तुम्ही असं वागलात? का? आज फक्त आणि फक्त तुमच्यामुळे तिचं आयुष्य बरबाद झालं… मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही… आणि सिया ताई तू… तुझ्यासोबत एवढं सगळं घडलं आणि तुला मला सांगावंस नाही वाटलं? मग मला राग येणार नाही का? मला रागवण्याचाही अधिकार नाही का?… पण किती रागावणार तू तिच्यावर? ती रोज तुला मनवण्याचा प्रयत्न करते…” त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर उठलं होतं… किती तरी वेळ तो तिचाच विचार करत होता! बंद डोळ्यांच्या कडेने पाणी आलं होतं आणि त्याचंही त्याला भान नव्हतं…
हेही वाचा – शिव आणि आराधना… एक अनोखी प्रेम कहाणी
शिवराज सरपोतदार… सरपोतदार इंडस्ट्रीजचा सर्वेसर्वा. परदेशात जाऊन शिक्षण घेऊन नुकताच दोन महिन्यांपूर्वी भारतात परत आला. रंगाने सावळा, पण दिसायला एकदम राजबिंडा… उंचपुरा. व्यायामाने तयार केलेलं पिळदार शरीर… कोणीही पाहताच क्षणी त्याच्याकडे ओढला जाईल, असे व्यक्तिमत्व! स्वभावाने रागीट असला तरी मनाने चांगला आहे. कोणावरही पटकन विश्वास ठेवणं म्हणजे त्याच्या मते मूर्खपणा आहे. त्याचं आपल्या फॅमिलीवर खूप प्रेम… मग त्यांच्या सुखासाठी कुठल्याही थराला तो जाऊ शकतो… त्याच्या अत्यंत जवळची व्यक्ती म्हणजे त्याची सिया ताई त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी… पण तिच्या आयुष्यात असं काही वादळ आलं आणि तिचं आयुष्य बरबाद झालं! त्याला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती… आणि त्याचमुळे तो सध्या ताईवर आणि बाबांवर रागावला होता… आणि म्हणूनच आल्याबरोबर त्याने स्वतःला कामात झोकून दिलं होतं.
अचानक गाडी थांबल्यामुळे तो त्याच्या विचारातून बाहेर आला… त्याला त्याच्या गालावर गार असं काहीतरी जाणवलं आणि त्याने हात फिरवून पाहिलं तर, हाताला पाणी लागलं… त्याला आता जाणवलं आपण रडत आहोत हे! त्याने तोंडावर हात फिरवून गलावरचं पाणी पुसलं आणि डोळेही… आणि बाहेर पाहिलं तर घर अजून आलं नव्हतं…
जीवन ड्रायव्हिंग सीटवर नव्हता… पुढे गर्दी जमा झाली होती आणि जीवन कोणाशी तरी बोलत होता… ती व्यक्ती जीवनच्या एकदम समोर असल्याने शिवला ती दिसली नाही… त्याने खिशातला ब्लॅक गॉगल काढून डोळ्यांवर घातला आणि तो गाडीतून खाली उतरला. अचानक त्याच्या कानावर एका मुलीचा मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज आला! जीवन सोबत वाद घालणारी तीच होती.
पण तो आवाज ऐकून का कोण जाणे, पण शिवचं अस्वस्थ मन एकदम शांत झालं… ती मुलगी जरी ओरडत असली तरी, तिचा आवाज खूप नाजूक आणि गोड होता! जणू ऐकणाऱ्याला वाटेल, तिला ओरडता, रागावता किंवा भांडता येत नाही, तरीही ती समोरच्या सोबत वाद घालण्याचा प्रयत्न करतेय किंवा आपलं म्हणणं त्याला पटवून देतेय. तिचा आवाज ऐकून नकळत का होईना, बोलण्यासाठी त्याच्या ओठांच्या कडा रुंदावल्या, पण काही क्षणासाठी! परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याने जीवनला आवाज दिला… तसा जीवन मागे वळला… आणि शिवची नजर त्या मुलीवर पडली.
त्याच वेळी इकडे राम एका बागेत येऊन तिथल्या एका झाडाखाली बसला होता… काहीसा उदास… आणि कसल्याशा विचारात… तो जिथे बसलेला होता ते झाड त्या बागेच्या एका कोपऱ्यात होतं त्यामुळे तिथे शांतता होती. त्या बागेत खेळणारी लहान लहान मुले होती. त्या मुलांसोबत त्यांचे आईबाबाही असावेत… जे तिथल्या खुर्च्यांवर बसून आपल्या मुलांना खेळताना पाहत होती… एकंदरीत सगळीकडे लहान मुलांचा कल्ला सुरू होता… आणि राम त्या मुलांना पाहात शांत बसून होता. “तिलाही लहान मुले खूप आवडायची…” तो स्वतःशीच पुटपुटला. नकळत डोळ्यांच्या कडेतून अश्रूचा एक थेंब बाहेर आला… त्याने एक दीर्घ श्वास घेऊन डोळे मिटले. डोळे मिटताच तिचा चेहरा डोळ्यांसमोर आला… तिच्या आठवणीने त्याला गलबलून येत होतं…
“आय ॲम सॉरी सिया… माझंही तुझ्यावर खूप प्रेम होतं गं… नाही, आहे! आजही मी तुझ्यावर खूप प्रेम करतो… खूप आठवण येतेय तुझी… नाही विसरू शकलो तुला मी! मला माहीत आहे, मी तुला खूप त्रास दिलाय… माफ कर मला .. करशील मला माफ?” तो मनातल्या मनातच तिची माफी मागत होता.
तो तिच्या विचारात हरवून गेला होता, तोच त्याच्या फोनची रिंग वाजली आणि तो विचारातून बाहेर आला… त्याने फोन उचलला आणि कानाला लावला आत्याचा फोन होता… “आलो…” असं म्हणून फोन कट केला आणि उठून निघून गेला.
तिला पाहताच शिवची नजर तिच्यावर स्थिरावली… तिने गोल घेर असलेला हलक्या गुलाबी रंगाचा अनारकली सूट घातला होता, त्यावर पांढऱ्या रंगाची ओढणी गळ्याभोवती घेतली होती… केस मागे क्लचरमध्ये अर्धे अडकवून अर्धे मोकळे सोडले होते… शरीराने अगदीच सडपातळ आणि नाजूक होती. रंगाने गोरी पान… चेहऱ्यावर मेकप अजिबात नव्हता! कदाचित नुसती पावडर लावली असेल… दोन भुवयांच्या मधे नाजूक पांढऱ्या खड्यांची टिकली… ओठ नैसर्गिकच गुलाबी असावेत, कारण त्यावर लिपस्टिक लावली असेल असं वाटतं नव्हतं! मात्र तिने मोठाले लटकनचे कानातले घातले होते… एका हातात ब्रेसलेट घातलं होतं आणि एक रिकामाच होता…
काही क्षणांतच शिवने तिचं संपूर्ण निरीक्षण केलं होतं… त्याने आजपर्यंत कोणत्याही मुलीकडे वळूनसुद्धा पाहिलं नव्हतं आणि आज तो तिच्याकडे पापणी न लवता एकटक पाहत होता… त्याची तंद्री भंगली ते तिच्या आवाजाने!
“ओ काळा चष्मावाले ही गाडी तुमची आहे ना? हे बघा तुमच्या गाडीने या छोट्या पिल्लाला धक्का दिलाय, त्याला जास्त नाही लागलं पण पायातून रक्त येतंय… त्यामुळे तुम्ही त्याला दवाखान्यात घेऊन जा आणि त्याचा नीट इलाज करा… मी घेऊन गेले असते, पण मी नवीन आहे इथे आणि मला दवाखाना माहीत नाही. तुम्ही घेऊन जा आणि परत त्याला जिथे अशा कुत्र्यांना किंवा त्यांच्या पिल्लांना ठेवतात त्याचं नाव मला माहीत नाही… तुम्हाला माहीत असेल तिथे सोडा… मी जाते आत्या माझी मंदिरात वाट पाहात असेल… “
ती त्याच्यासमोर येऊन एका दमात सगळं बोलून त्या कुत्र्याच्या पिल्लाला त्याच्या हातात जबरदस्ती देऊन वाऱ्याच्या वेगाने निघूनही गेली…
तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहातच राहिला… नेमकं काय झालं ते काहीवेळ त्याला कळलंच नाही! जीवन त्याच्या बाजूला उभाच होता… आधी तर तो तिचं बोलणं ऐकून शॉक झाला होता, पण आता त्याला शिवचा राग आठवून घाम फुटला होता…
आता त्याचा बॉस काय करेल? ती तर निघून गेली, आता आपलं काही खरं नाही… कोणाचीही त्याच्यापुढे बोलायची हिम्मत होत नसे तर, त्याला असं काम सांगणं तर लांबच राहीलं आणि ही एवढीशी मुलगी (आराधना) त्याला सरळ सरळ ऑर्डर देऊन गेली होती!
“स… स… सर ” जीवनने त्याला घाबरतच आवाज दिला, त्यावर शिवने थंड नजरेने त्याच्याकडे पाहिलं. त्याची ती थंड नजर पाहूनच जीवनची भीतीने गाळण उडाली आणि पुढे काय बोलावं ते सुचेना…
“हं… हे घे याला घेऊन जा आणि याची योग्य ट्रीटमेंट करून त्याला घरी घेऊन ये” त्याच्या हातात ते पिल्लू देऊन शिव गाडी घेऊन निघून गेला… इकडे जीवन आश्चर्याने गाडी गेली त्या दिशेने पाहातच राहिला! कारण आज पहिल्यांदाच त्याचा बॉस रागावला नव्हता…
क्रमश:


