वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
जेथ अमृताचेनि पाडें । मुळेंहीसकट गोडें । जोडती दाटें झाडें । सदा फळतीं ॥173॥ पाउला पाउला उदकें । परि वर्षाकाळींही चोखें । निर्झरें कां विशेखें । सुलभे जेथ ॥174॥ हा आतपुही अळुमाळु । जाणिजे तरी शीतळु । पवनु अति निश्चळु । मंद झुळके ॥175॥ बहुतकरूनि निःशब्द । दाट न रिगे श्वापद । शुक हन षट्पद । तेउतें नाहीं ॥176॥ पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें । कवणें एके वेळे बैसे । तरी कोकिळही हो ॥177॥ निरंतर नाहीं । तरि आलीं गेलीं कांहीं । होतु कां मयुरेंही । आम्ही ना न म्हणों ॥178॥ परि आवश्यक पांडवा । ऐसा ठावो जोडावा । तेथ निगूढ मठ होआवा । कां शिवालय ॥179॥ दोन्हीं माजी आवडे तें । जें मानलें होय चित्तें । बहुतकरूनि एकांते । बैसिजे गा ॥180॥ म्हणोनि तैसें तें जाणावें । मन राहतें पाहावें । राहेल तेथ रचावें । आसन ऐसें ।।181 वरी चोखट मृगसेवडी । माजी धूतवस्त्राची घडी । तळवटीं अमोडी । कुशांकुर ॥182॥ सकोमळ सरिसे । सुबद्ध राहती आपैसे । एकें पाडें तैसे । वोजा घालीं ॥183॥ परि सावियाचि उंच होईल । तरि आंग हन डोलेल । नीच तरी पावेल । भूमिदोषु ॥184॥ म्हणौनि तैसें न करावें । समभावें धरावें । हें बहु असो होआवें । आसन ऐसें ॥185॥
हेही वाचा – Dnyaneshwari : चालतां पाऊल जेथ पडे, तेथ अपवर्गाची खाणी उघडे…
अर्थ
जेथे अमृताच्या सारखी मुळासकट गोड असलेली आणि नेहेमी फळणारी अशी दाट झाडे आहेत, ॥173॥ ज्या ठिकाणी पावलोपावली पाणी आहे, पण ते पावसाळ्यातही निर्मळ असते, आणि जेथे विशेषकरून पाण्याचे झरे सहज आढळतात, ॥174॥ हे ऊन देखील जेथे सौम्य भासते आणि जेथे वारा अतिशय शांत असून त्याच्या मंद झुळुका येत असतात, ॥175॥ जे स्थान बहुतेक नि:शब्द असावे आणि ज्या ठिकाणी श्वापदांची गर्दी असू नये तसेच, राघू आणि भ्रमर हे नसावेत, ॥176॥ ज्या ठिकाणी पाण्याच्या जवळ असणारे हंस, दोन चार चक्रवाक, कधी एखाद्या वेळेला कोकिळही असला तरी चालेल, ॥177॥ (जेथे) नेहेमी जरी नाही तरी, येऊन जाऊन असणारे काही मोरही असले तर, त्यास आमची ना नाही. ॥178॥ परंतु अर्जुना, असे स्थान जरूर शोधून ठेवावे. त्या ठिकाणी सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावे. ॥179॥ या दोहोंतील जे मनाला पसंत पडेल असे एक स्थान असावे. बहुतकरून एकांतात बसावे. ॥180॥ म्हणून ते स्थान तसे आहे की नाही, हे समजून घ्यावे. आपले मन तेथे स्थिर रहाते की नाही, ते पाहावे आणि राहात असेल तर, तेथे असे आसन लावावे. ॥181॥ तळास साग्र दर्भ घालून त्यावर शुद्ध कृष्णाजिन घालून, त्यावर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी. ॥182॥ ते दर्भ कोवळे असून सारखे आणि सहजच एकमेकाला लागलेले रहातील, असे व्यवस्थेने घालावेत. ॥183॥ परंतु ते (आसन) कदाचित जर उंच होईल तर, शरीर डोलेल आणि सखल होईल तर, जमिनीचे (गारवा वगैरे) दोष (त्याला) प्राप्त होतील. ॥184॥ म्हणून आसन उंच अथवा सखल होऊ देऊ नये, तर ते समांतर (उंचसखल न होईल असे) घालावे. आता हे फार वर्णन करणे पुरे. अशा प्रकारचे आसन असावे. ॥185॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जया आड जातां पार्था, तपश्चर्या मनोरथा…


