विदर्भ काही खास कारणांसाठी प्रसिद्ध आहे. खवय्येगिरी करणाऱ्यांना काही रेसिपींनी नवनवीन वैदर्भीय पदार्थांची वेळोवेळी ओळख करून दिलेली आहे. कोल्हापूरचा जसा तांबडा पांढरा रस्सा, सोलापूरची शेंगा चटणी, पुण्याचा मिसळपाव, मुंबईचा वडापाव आणि पावभाजी, कोकणातीस मासे, तांदळाची भाकरी आणि सोलकढी हे लोकांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत, तसे मिरचीची भाजी, सांबार वडी, पाटवडी रस्सा, डाळकांदा हे आम्हा विदर्भवासीयांचे मनपसंद मेन्यू आहेत.
गाव-खेड्यांमधून काही परंपरागत पदार्थांची मेजवानी हमखास वैशिष्ट्यपूर्ण ठरते. सुगीच्या दिवसांत पिके तरारून वर आलेली असतात. त्या काळ्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच तयार झालेली पिकं आपापसांत वाटून खाण्यासाठी शेतांमधून विविध प्रकारची गावजेवणं घालण्यात येतात. कोणी काही नवस बोललेले असतात, त्याकरिताही अशा जेवणाची मेजवानी ठेवून तो नवस पूर्ण केला जातो. शेतामध्ये जर विहीर बांधली असेल तर त्या विहिरीच्या पूजेनिमित्त गावपंगत देण्याची प्रथा आजही जवळपास सर्वच खेड्यांमध्ये आढळते. याकरिता प्रामुख्याने रोडगे पार्टी, मिरची भाजी अन् भाकरी यांचे खास आयोजन केले जाते. रोडगे पार्टीला कुठलाही नियम किंवा विशिष्ट ऋतू लागत नाही. फक्त निमित्त मात्र हवे!
हिवाळा सुरू झाला की, दुपारचे ऊन अंगावर घेत शेतामध्ये हिरव्यागार वातावरणात या रोडगे पार्ट्या अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जातात… ज्या पार एप्रिलपर्यंत चालतात! आम्ही वर्धेला असताना एकपाळ्याचा मारुती, सेवेचा मारुती, खडकीचा मारूती अशा जागृत देवस्थानांच्या ठिकाणी या महाप्रसादाचा कित्येक वेळा आस्वाद घेतला आहे. बुलढाण्याला वारीचा हनुमान मंदिर हे नदीकाठी आहे आणि त्यामुळे तिथेदेखील या रोडग्याचे जेवण द्यायची पद्धत आहे. बुलढाणा जिल्ह्यात मिरचीची भाजी, भाकरीची पार्टी या दिवसांमध्ये शेतांमधून आयोजित केल्या जातात.
हेही वाचा – आठवडी बाजारातील भातकं!
वर्धा जिल्ह्यात आजनसरा नावाचे संत भोजाजी महाराजांचे संस्थान आहे, तिथे तर फक्त पुरणाचाच नैवेद्य असतो. विशेष म्हणजे, पुरण तिथेच जाऊन शिजवावे लागतं आणि त्याकरिता तिथे असंख्य पुरणाची यंत्र आणि मातीच्या चुली ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिले आहेत. तेथील पुरणाला एक वेगळीच चव असते, अशी सर्व भाविकांची धारणा आहे! याप्रमाणेच मारुतीला रोडग्याचा नैवेद्य आवडतो म्हणून बहुदा या रोडग्याचे जेवण हे जिथे मारुतीचे देवस्थान असेल, त्या ठिकाणी जास्त आयोजित केले जातं. रोडग्यांना सुमारे 200 वर्षांचा इतिहास आहे, असं म्हणतात. म्हणजे इतक्या वर्षांपासून आजतागायत या पदार्थांचे आकर्षण पूर्वी इतकेच जनमानसात टिकून आहे!
रोडगे तयार करण्याकरता गहू जाडसर दळून आणले जातात. रोडगा तयार करताना या पीठामध्ये मीठ आणि तेल टाकून कणिक चांगली तिंबून घेतात आणि नंतर त्याचे गोळे तयार केले जातात. हातावर या कणकेच्या जाडसर पाऱ्या तयार केल्या जातात आणि त्यानंतर हा चार-पाच जाड्या लेयरच्या पुरीसारख्या आकारांच्या पोळ्या एकावर एक ठेवून त्यांचा एक मोठा गोळा तयार करून त्याला वाटोळा आकार दिला जातो. जमिनीमध्ये एखाद फूटाचा चर तयार करून त्यावर रानातील पाला पाचोळा तसेच गोवऱ्या रचल्या जातात आणि पेटवतात. या गोवऱ्या चांगल्या लालबुंद झाल्या की, आगीची धग कमी होते आणि नंतर या गोवऱ्याच्या निखाऱ्यांमध्ये हे रोडगे टाकले जातात. खाली-वर करत हे रोडगे खरपूस भाजले जातात. ते चांगले भाजले गेले तरच खाण्याची मजा घेता येते!
हेही वाचा – नागपूरची प्रसिद्ध काळी पिवळी मारबत!
हे ऐऱ्यागैऱ्याचे काम नव्हे… याकरिता रोडगे तयार करणारी खास माणसे गावांमध्ये असतात. रोडगे आणि सोबत वांगे, बटाट्यांची म्हणजेच आलू-वांग्याची आलं, लसूण, कांद्याची पेस्ट आणि झणझणीत गरम मसाले असलेली तर्रीदार भाजी… हे एक भन्नाट कॉम्बिनेशन आहे. सोबतच गावरान तूरडाळीचे साधं वरण, गूळ आणि तूप हेसुद्धा चवीला अप्रतिम लागतं.
साध्या वरणात रोडग्याच्या आतला मऊसर भाग कुस्करायचा आणि त्यावर भरपूर तूप घेऊन ते खायचं… या खाण्याला तोड नाही! तसचं गूळ आणि तुपात या रोडग्यांचा चुरमा करायचा. हा चुरमा एकदा खाल्ला की, तो वारंवार खाण्याची इच्छा होणार, हे निश्चित! ज्यांचे दात चांगले आहेत त्यांनी रोडग्यांचा वरच्या आवरणाचा कडक खरपूस भाग वांग्याच्या भाजीच्या रश्शात बुडवून खावा! अहाहा! केवळ स्वर्गसुखच!
विदर्भातील लोकांना हा पदार्थ नवीन नाही, परंतु रोडग्यांवर मनापासून प्रेम करणारे वैदर्भीय लोकांसारखे कोणीच नाही!


