आराधना जोशी
साहित्य
- खसखस – 2 टीस्पून
- डाळं – 2 टेबलस्पून (चिवड्यात घालतात ते)
- बडीशोप – 2 टीस्पून
- तीळ – 2 टीस्पून
- धणे पावडर – 1 टेबलस्पून
- चक्र फूल – 2 (Star Anise)
- सुक्या खोबऱ्याचा कीस – अर्धा कप
- काळी मिरी – 2 टीस्पून
- लवंग – 4
- तमालपत्र – 3
- दालचिनीचा तुकडा – 2 इंच
- जिरं – 1 टेबलस्पून
- लाल सुक्या मिरच्या – 9 (शक्यतो कमी तिखट असणारी मिरची घ्या)
- कांदे – 2 मोठे (किंवा कांदा चिरून अंदाजे 2 वाट्या)
- लसूण – 4 पाकळ्या (किंवा चिरलेला लसूण 2 टीस्पून)
- आलं – अर्धा इंच
- तेल – 1/3 वाटी (या भाजीला तेल जरा जास्त लागते)
- मीठ – चवीनुसार
- बारीक चिरलेली कोथिंबीर – पाव वाटी
- तिखट जाड शेव – 2 वाट्या
पुरवठा संख्या : 4 व्यक्तींसाठी
तयारीस लागणारा वेळ : 30 मिनिटे
शिजवण्याचा वेळ : 30 मिनिटे
एकूण वेळ : 60 मिनिटे
हेही वाचा – Recipe : पालकाचे थालिपीठ
कृती
- साहित्यात सांगितलेले सगळे मसाल्याचे पदार्थ मंद आचेवर कोरडे भाजून गार करायला ठेवा.
- कढईत एक टेबलस्पून तेल गरम झाले की, त्यात चिरलेला कांदा घाला. कांदा तेलात चांगला परतवून ब्राऊन रंगाचा करून घ्या. नंतर तो पण गार करायला बाजूला ठेवा.
- आता मिक्सरच्या भांड्यात आधी कोरडे मसाले एकत्र करून पावडर करून घ्या. मग त्यात तेलावर परतलेला कांदा, आलं, लसूण घालून सगळा मसाला फिरवून घ्या.
- पाण्याचा वापर करू नका. मसाला नीट वाटला जात नसेल तरच एखादा लहान चमचा पाणी घालून मसाला गुळगुळीत होईपर्यंत वाटून घ्या.
- आता कढईत उरलेले तेल घ्या. तेल तापले की, त्यात हिंग, मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात वाटलेला मसाला घाला.
- मसाला तेलात चांगला परतवून घ्या. हळूहळू मसाल्यातून तेल वेगळे होताना दिसायला लागेल. साधारणपणे मंद आचेवर मसाला भाजायला 15 ते 20 मिनिटे लागतात.
- आता या मसाल्यात हळूहळू 4 ते 5 वाट्या गरम पाणी घालून मसाला एकजीव करून घ्या. नंतर चवीनुसार मीठ घाला.
- झाकण न ठेवता हा रस्सा मंद आचेवर उकळी येईपर्यंत ठेवा.
- मसाल्यातील तेल आता रश्शयावर दिसायला लागेल. आता गॅस बंद करा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
- सर्व्ह करताना एका वाटीत किंवा बाऊलमधे आधी 2 टेबलस्पून तिखट शेव घाला. नंतर त्यावर गरम रस्सा, थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू पिळा.
- गरमागरम भाकरीसोबत किंवा पोळीबरोबर छान लागते ही भाजी.
हेही वाचा – Recipe : इन्स्टंट बन डोसा
विशेष आहार माहिती : शाकाहारी
विशेष सूचना
- मसाल्याचा तिखटपणा कमी करायचा असेल तर दोन मोठे टोमॅटो चिरून कांद्याप्रमाणे परतून थोडेसे मऊ करा आणि मग मिक्सरमध्ये इतर मसाल्यांबरोबर वाटून घ्या.


