नितीन फलटणकर
छान मंद आवाजामध्ये किशोरीताईंचा ‘या पंढरीचे सूख पहाता डोळा, उभा तो जिव्हाळा योगीयांचा…’ हा अभंग सुरू होता. मंदाताई खुर्चीवर बसून अभंग ऐकत होत्या. सकाळचे 6 वाजले होते. चिमणरावांच्या समोरच्या बागेत गुळण्या सुरू होत्या. छोटंसं पण टुमदार असं ते घर. घरासमोर मोठी बाग. मंदाताईंना आवडतात म्हणून बागेत बटनरोजपासून मोगऱ्यापर्यंतची झाडं. रात्री पाऊस झाल्याने रातराणीच्या फुलांचा हलकासा चट् चट् असा गोंधळ चाललेला. बागेला तारांचं छानसं कुंपण. घरात प्रवेश करताना मोठा व्हरांडा. येणाऱ्याच्या उजव्या बाजूला केनचे सोफे. डाव्या बाजूला वाऱ्याने एकटाच झुलणारा झोपाळा. त्याचा कुंई… कुंईं… असा आवाज. आजू-बाजूला असलेल्या सिमेंटच्या जंगलात हे एकमेव टुमदार घर, कॉलनीत वेगळी ओळख टिकवून होतं. गावाकडचा फिल येण्यासाठी चिमणरावांनी घराला कौलारू केलं होतं.
चिमणरावांच्या गुळण्या झाल्या तसे ते आत आले. तोंडावरून टॉवेल फिरवला. तितक्यात मंदाताईंनी टेबलावर चहा अन् खारी आणून ठेवली होती. चिमणरावांनी आपल्या कवळ्या शाधण्यासाठी म्हणून डोळ्यांवर चष्मा चढवला. आज गोळ्यांच्या टेबलावर कवळ्यांचा डबा नव्हता. तसे ते मंदाताईंकडे वळले. मंदाताईंनी स्मितहास्य करत, टाळी वाजवत… त्यांना वाकुल्या दाखवत हातातील कवळ्यांचा डबा दाखवला. चिमणरावही मिष्किलपणे हासत टेबलाजवळ गेले.
टेपचा आवाज त्यांनी जरासा मोठा केला. आता त्यावर किशोरीताईंचा ‘जनी म्हणे पांडुरंगा, माझ्या जिवींच्या जीवलगा…’ हा अभंग लागला होता. “रोज सकाळी किशोरीताईंचे हे अभंग ऐकल्याशिवाय पहाटेची मजाच येत नाही, किनै?” मंदाताईंनी चिमणरावांकडे पाहात प्रश्न केला. त्यांनी मानेनेच होकार दिला.
“आजचा काय बेत? केतनचा वाढदिवस ना आज?” मंदाताईंना चिमणरावांची प्रश्न केला.
“हो तर.. आज मी छान बेत आखला आहे. त्याला आवडते म्हणून आज छान तिखटा-मिठाच्या पुऱ्या अन् गुलाबजाम करणारेय… भाजी बघू वांग्याची करावी म्हणतेय. तसाही तो घाईत असतो. आवरावं लागेल लवकर. तू एक काम कर.. पटकन समोरून भाजी घेऊन ये. तोपर्यंत मी इतर कामांचं बघते… आणि हो, आज डॉक्टर नेने येणारेत पुन्हा एकदा ब्लड आणि युरिन घ्यायला… सध्या जाम चिडलेत हां ते तुझ्यावर! बायपास झाल्यापासून तू तब्येतीकडे फार दुर्लक्ष करतोय, असे म्हणत होते मला काल फोनवर…” बोलणं संपवून मंदाताई किचनकडे वळल्या.
मोठ्या खिडक्या असल्याने किचनमध्ये भरपूर हवा येत होती. मंदाताईंच्या मागे जात चिमणरावांनी त्यांना शाल पांघरली… “काय कळतेय त्या नेन्याला. काहीतरी सांगून तुझं नुसतं टेन्शन वाढवायचं असतं त्याला. त्याला म्हणाव आपण दोघेही डॉक्टर आहोत. हे विसरू नको अन् नको ते सल्ले देऊ नकोस! तुला सांगतो… तुला पटवता आली नाही ना म्हणून माझ्याबद्दल काहीतरी सांगत असतो तो तुझ्याकडे…” चिमणराव मंदाताईंकडे बघून म्हणाले. तशा त्या लाजल्या, “मी बरी त्याला पटेल तू असताना? तू काय कमी प्रयत्न केले होतेस? पण खरं सांगू, तू जर मला त्या दिवशी जास्वंदीची फुलं आणून दिली नसतीस ना, तर मी तुलाही हो म्हणाले नसते… मुलाचं नाव चिमणराव ऐकूनच कुणीही नकार दिला असता…” दोघेही जुन्या आठवणीत रमले.
हेही वाचा – कन्फेशन कॉल…
“जो मुलगा एखाद्या तरुण मुलीला जास्वंदीची फुलं आणून देतो, तो किती वेंधळा असेल? त्याला जर कुणी सांभाळले नाही तर, त्याचे काय होईल या विचारानेच मी तुला हो म्हणाले…” मंदाताई पुन्हा एकदा गोड लाजल्या.
“हो… हो… सारखं ते फुलांचं उदाहरण द्यायला नको. मी काही वेंधळा वगैरै नव्हतो. काहीच दिसलं नाही अन् नेन्याने मला चॅलेंज केलं होतं, म्हणून घाईघाईत आईच्या पूजेच्या परडीतून मी ती फुलं उचलून आणली होती…” थोड्या लडीवाळ आवाजात चिमणराव म्हणाले.
“बरं, जातोय मी भाजी आणायला,” असं म्हणत चिमणराव बाहेर पडले. पिशवी घरातच बघून मंदाताई त्यांच्यामागे धावल्या खऱ्या पण, तोपर्यंत चिमणरावांनी कुंपण ओलांडलं होतं. “वेडा चिमण्या…” असं पुटपुटत त्या तशाच किचनमध्ये आल्या. इतक्यात फोनची रिंग वाजली. त्यांनी फोन उचलला. “हॅलो…” तिकडून आवाज आला, “आहे का गं चिमण्या घरी? येऊ का मी?” मंदाताई एकदम म्हणाल्या, “नेन्या त्याला चिमण्या म्हणू नको… तो भाजी आणायला गेलाय… आणि हो येताना गुलाबजाम घेऊन ये… आज केतनचा वाढदिवस आहे…” डॉ. नेने एकदम शांत झाले… “आणतो बाई म्हणत,” त्यांनी मोठा उसासा सोडला. इतक्यात मंदाताई म्हणाल्या, “ऐक. तू जरा दुपारी ये, आज इथेच जेवण कर…” नेनेंनी, ‘दुपारी 2 वाजता येतो,’ असे सांगत फोन ठेवला.
इतक्यात सदऱ्यात वांगी घेऊन चिमणराव घरी परतले. “आज पुन्हा पिशवी विसरलो…” म्हणत त्यांनी किचनच्या ओट्यावर वांगी ओतली आणि मंदाताईंना प्रश्न केला, “आला होता का त्या नेन्याचा फोन?” मंदाताई हसल्या… “भाजी आणायला गेला होतात की, घराबाहेरूनच माझ्यावर नजर ठेऊन होतात?”
हेही वाचा – निखळ मैत्रीचा ‘दीप’
पाहता पाहता सकाळचे 11 वाजले होते. चिमणरावांनी देवपूजा आटोपून घेतली. मंदाताईंनीही आंघोळ करून पूर्ण स्वयंपाक केला. किचनमधून तो बाहेर आणून हॉलमधल्या तसबिरीखालच्या टेबलावर ठेवला. गुलाबजाम वगळता ताटात सारे काही होते…! एका बाजूला मीठ, दह्यात भिजवलेली चटणी, वाटीभर भात त्यावर साधं वरण अन् या दोघांना एकसंध करणारी तुपाची चंद्रकोर, जवळच त्यात उडी मारायला आतूर असलेली लिंबाची फोड… वाटीत डोळे मोठे करून पहाणारी वांग्याची तर्री आलेली भाजी, ओळीने ताटात शिस्तीत बसलेल्या चार पुऱ्या आणि थोडी साखर… ते ताट टेबलावर पाहिल्यावर चिमणराव म्हणाले, “अगं, आधी देवाला दाखव मगच केतनला दे…”
“असू द्या हो! मुलं देवाघरचीच फुलं… काही होत नाही. नाही रागावणार तुमचा देव…”
“चिमणरावांनी मंदाताईंचा हात धरला… थोडावेळ बसू या का इथे? या पलंगावर… केतनचा आवडता पलंग हा…” दोघेही हसले. मंदाताईंना त्यांनी पलंगावर भिंतीला टेकून बसवले. चिमणराव खाली त्यांच्या पायाशी बसले आणि म्हणाले, “जरा मालिश कर ना डोक्याची…”
अभंग संपून आता किशोरीताईंची भैरवी ‘बाबुल मोरा नैहर छुटोही जाए…’ लागली होती. 5 मिनिटे झाली असतील… दारातून कुणीतरी आत आले. हातात गुलाबजामचा डबा होता… डोक्यावर बर्थ डे कॅप, तोंडाने जोरात पुंगी वाजवत ‘हॅप्पी बर्थ डे टू यू…’ असं गात नेने आत आले…. मागे भैरवीचा स्वर अधिक गंभीर झाला होता… नेने घाबरले… त्यांनी आपल्या बॅगेतून स्टेथो काढला… दोघांनाही तपासले… दोघांचीही कोणतीही हालचाल होत नव्हती… चिमणराव तसेच बसून होते. त्यांची मान खाली झुकली होती तर मंदाताईंचे डोळे सताड उघडे… छताकडे लागलेले. टेबलावर केतनच्या तसबिरीखाली एक ताट ठेवलेलं… चिमणरावांच्या हातात एक जुने, पाच वर्षांपूर्वीचे वर्तमानपत्र होते… डॉ. नेनेंनी ते काढून पाहिले. हेडलाइन होती…. ‘ट्रक-कार अपघातात प्रसिद्ध डॉ. चिमणराव नाडकर्णी यांचा तरुण मुलगा ठार…’ 13 मिनिटांची भैरवी संपली होती… गुलाबजाम जमिनीवर पडलेले…


