स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये कोथिंबीर वडी, केक, अळुवडी अन् दहीवडे बनवतानाच्या काही टीप्स पाहूयात –
- केकमध्ये घालायचे मिल्कमेड घरात नसल्यास, ज्या प्रमाणात मिल्कमेड पाहिजे त्या प्रमाणात दूध घ्यावे आणि खव्याच्या आधीच्या अवस्थेपर्यंत ते उकळावे. केकमध्ये जेवढी साखर सांगितली असेल त्यापेक्षा दोन चमचे जास्त साखर घालावी.
- केक करताना ओव्हन असण्याची आवश्यकता नाही. घरातील कुठलाही प्रेशर कुकर घेऊन तो पूर्णपणे कोरडा करावा आणि झाकणाची रिंग काढून ठेवावी. केकपात्राला अगर कुकरच्या डब्याला तुपाचा हात लावून मैदा भुरभुरावा आणि त्यात मिश्रण ओतावे. कुकरमध्ये खाली छोटी ताटली ठेवून त्यावर केकपात्र ठेवावे. साधारण एक तासात उत्तम केक तयार होतो. पाणी नसले तरी कुकर खराब होत नाही अगर व्हॉल्व पण जात नाही.
- दहीवडे करताना जर घोळ (वड्याचे मिश्रण) जास्त वाटले तर, वडे तळून पाण्यात न टाकता घट्ट झाकण असलेल्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे. सात-आठ दिवस चांगले राहतात. आलेल्या पाहुण्यांना ऐनवेळी गरम पाण्यात वडे भिजवून दहीवडे सादर करू शकतो. तसेच, वडे पाण्यातून काढल्यावर त्या पाण्यात बरेच तेल राहाते ते पाणी रश्शाच्या भाजीत किंवा कणीक भिजवण्यास वापरू शकतो. अशा वेळी भाजीसाठीच्या फोडणीत थोडे तेल कमी घालावे.
हेही वाचा – Kitchen Tips : एकसारखी गोल आणि झटपट बटाटाभजी, लज्जतदार पराठे!
- कोथिंबिरीची वडी करताना भाजलेले तीळ, खसखस, ओले किंवा सुके खोबरे, मिरची वगैरे मसाला साहित्य आपण मिक्सरमधून काढतोच. त्यातच चिरलेल्या कोथिंबिरीचा अर्धा भाग टाकून मिक्सर पुन्हा थोडा वेळ फिरवावा. नंतर हे मिश्रण, अर्धी उरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर, डाळीचे पीठ, थोडेसे कॉर्नफ्लोअर (डाळीच्या पिठाचा आठवा हिस्सा), थोडे तांदळाचे पीठ, मीठ, हळद टाकून सर्व भिजवून त्यांचा रोल (वळकटी) करावा. नंतर तो कुकरमध्ये उकडून घ्यावा. गार झाल्यावर सारख्या आकाराच्या वड्या कापून तव्यावर थोड्या तेलात परताव्यात. त्यामुळे तेलाची बचत होते. वड्या तेलकट लागत नाहीत.
- वड्या करण्याकरिता अळूची वेगळी पाने मिळतात. तशाच पानांवर ढोकळ्याचे मिश्रण घालून प्रत्येक पान गरम पाण्यावर चाळणी ठेवून उकडून घ्यावे. अशी उकडलेली पाने एकावर एक ठेवून त्याचे रोल करून घ्यावेत. रोलच्या चकत्या कापून तळून काढाव्यात. वेगळ्या प्रकारच्या अळूच्या वड्या करता येतात. चवीला छान लागतात.
हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसा, छोले भटुरे, सॉफ्ट इडली, खमंग धिरडी…
- दमट हवेमुळे पातळ पोह्याचा चिवडा आकसतो. अशा वेळी उन्हाळ्यातच तीन-चार किलो पोहे कडक उन्हात वाळवून प्लास्टिकच्या पिशव्यांत भरून हवाबंद करून ठेवावेत आणि आवश्यकतेनुसार फोडणीवर पोहे परतावेत. नेहमीप्रमाणे सुरेख चिवडा होतो.


